एकनाथी भागवताच्या पठणाचं काय फळ आहे, हे आपण पाहिलं. आता या ग्रंथाचा विचारपरीघ काय आहे, याचा थोडा मागोवा घेऊ. सोळाव्या अध्यायात या ग्रंथातील विषयांचा अनुक्रम मांडला आहे. त्यानुसार ही विभागणी चार गटांत जाणवते, असे निरीक्षण दामोदर विष्णु कुलकर्णी यांनी ‘संत एकनाथ दर्शन’ (संपादक- डॉ. हे. वि. इनामदार, कॉन्टिनेन्टल प्रकाशन) या लेखसंग्रहात मांडले आहे. ही अध्याय विभागणी मांडताना ते म्हणतात :
‘‘श्रीएकनाथी भागवतातील संपूर्ण ३१ अध्यायांची विषयविभागणी पाहता, त्यात चार गट दिसून येतात. (१) अध्याय पहिला हा वैराग्योत्पादनार्थ आला आहे. नाथ म्हणतात – ते प्रथमाध्यायी अनुक्रम। वैराग्यउत्पत्तीचा संभ्रम। कुलक्षयासी पुरुषोत्तम। करी उपक्रमे ब्रह्मशापें।। (२) अध्याय दोन ते पाच यात निमिजायंत संवादरूपाने परमतत्त्वाचे निरूपण मांडले आहे. नाथ सांगतात – दुसऱ्यांपासूनि चतुर्थवरी। नारदें वसुदेवाच्या घरीं। निमिजायंतप्रश्नोत्तरीं। पंचाध्यायी खरी संपविली।। (३) अध्याय ६ ते २९ यात श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्यातील संवादरूपाने आत्मज्ञानोपदेश मांडला आहे. नाथ सांगतात – ‘‘महायोग्याचें योग भांडार। परम ज्ञानें ज्ञानगंभीर। निजसुखाचें सुखसार। केवळ चिन्मात्र अठ्ठाविसावा।। एकादशाचा निज कळसू। भक्तिप्रेमाचे अतिविलासू। एकोणतिसावा सुरसरसू। ज्ञानोपदेशू भक्तियुक्त।। (४) अध्याय ३० ते ३१ या पूर्वाधातील शेवटच्या दोन अध्यायात ब्रह्मशापाने कुलनिर्दळण घडल्याचा कथाभाग आला आहे. नाथ सांगतात – पुढील दो अध्याया आंत। स्त्री पुत्रादि कुळाचा घात। होता उंडळींना ज्ञानसमर्थ। हे प्रत्यक्षभूत हरि दावी।।’’ आता यात ६ ते २९ या अध्यायांमध्ये उद्धवाला जो बोध आहे, तो ‘उद्धवगीता’ म्हणूनही ओळखला जातो. या ‘गीते’चा थोडा मागोवा घेऊ. सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अवतारसमाप्ती करून निजधामाला परतणार असल्याची जाणीव उद्धवाला होते. मग इथं माझं काय काम? आपण मलाही सोबत न्यावं, अशी कळकळीची प्रार्थना उद्धव करतो. तेव्हा सातव्या अध्यायापासून श्रीकृष्ण उद्धवाला बोध करू लागतात. ज्ञानमय त्यागयुक्त आचरणाचं महत्त्व प्रथम प्रभू सांगतात. मग श्रद्धा कशी धरावी आणि ज्ञानावर विश्वास कसा राखावा, याचं मार्गदर्शन करू लागतात. अकराव्या अध्यायात भक्तीचं पूर्ण स्वरूप मांडतात. बाराव्या अध्यायात सत्संगाचा महिमा गातात. तेराव्या अध्यायात सत्वशुद्धीचा मार्ग उलगडतात. चौदाव्या अध्यायात विषय आणि चित्ताचा गुंता कसा सोडवावा, याचं मार्गदर्शन करतात. त्यात भक्तीचंच माहात्म्य प्रकाशमान होतं. पंधराव्या अध्यायात भक्तीच्या आड येणाऱ्या सिद्धींबाबत सावध सूचना आहेत. सोळाव्या अध्यायात विभूती वर्णन आहे. सतराव्या आणि अठराव्या अध्यायात वर्णाश्रमकर्माचं विवेचन आहे. एकोणिसाव्या अध्यायात यम-नियमाचं विवेचन, विसाव्या अध्यायापासून ज्ञानचर्चा सुरू होते. २८व्या अध्यायापर्यंत तत्त्वविवेचन, पुरुष आणि प्रकृती, सगुण आणि निर्गुण, भजनाचा विधी आदी विषयांचा उहापोह आहे. २९व्या अध्यायात भक्तीयुक्त ज्ञानाचा उपदेश आहे. त्यानंतर ३०व्या आणि ३१व्या अध्यायात आपल्याच यदुवंशाचा नाश स्वत:च् पाहूनही अविचल राहून निजधामाला जाणाऱ्या श्रीकृष्णाचं चित्रण आहे. ज्ञान ऐकणं सोपं आहे, पण त्याच्या आधारावर परिस्थिती स्वीकारताही कशी येते, याचं हे जणू प्रात्यक्षिक आहे!
– चैतन्य प्रेम