एकनाथ महाराज हे प्रापंचिक होते. मात्र बाबा बेलसरे म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘नाथांचा गृहस्थाश्रम बाहेरून चारचौघांसारखा दिसला ही गोष्ट खरी, परंतु अंतरंगदृष्टय़ा तो अकर्तात्मबोधाचा सर्वोत्तम आदर्श होता. मुलाबाळांच्या संसारात राहिलेले नाथ बाहेरून गुंतलेले दिसले तरी अंतर्यामी आत्मानंदी रंगलेले होते यात शंका नाही. अकर्तेपणे कर्म करण्याची किंवा ब्रह्मनिष्ठा कायम ठेवून भक्ती करण्याची युक्ती ती हीच.’’ (भावार्थ भागवत, त्रिदल प्रकाशन, पृ. २३) . म्हणजेच आपण अंगावर कपडे घालतो, पण ते कपडय़ांचं आवरण म्हणजे आपण नसतो, त्याप्रमाणे एकनाथ प्रपंचात होते, पण प्रपंच त्यांच्या अंत:करणात नव्हता! प्रपंचातली सर्व कर्तव्यं ते उत्तम पार पाडत होते, पण आपापल्या प्रपंचात आसक्त होऊन सुख-दु:ख, लाभ-हानी, मान-अपमान, अनुकूलता-प्रतिकूलता या द्वंद्वात गुरफटलेल्या सर्वसामान्यांना त्याच प्रपंचात राहून, प्रपंचातली कर्तव्यं पार पाडूनही खरं आंतरिक समाधान मिळवून देण्याची तळमळ त्यांच्या मनात होती. त्यामुळे सद्गुरुकृपेनं ज्या अकर्तेपणानं प्रपंचात राहून परमतत्त्वाशी एकरूप राहण्याची कला आपल्याला साधली तीच कला सर्वसामान्यांनाही लाभावी, या कळकळीतून त्यांनी या एकनाथी भागवताच्या आख्यानास प्रारंभ केला आहे. नाथ स्वत: प्रपंचात होते आणि त्यामुळे प्रपंचातल्या चढउतारांचा सामान्यांच्या मनावर होऊ शकणारा परिणाम त्यांना पूर्णपणे माहीत होता. प्रपंचाचा प्रभाव मनातून पुसणं किंवा कमी करणं ही किती कठीण गोष्ट आहे, हेदेखील ते इतरांच्या जगण्यातून जाणत होते. त्यामुळे अध्यात्मातली तत्त्वं प्रत्यक्ष जगण्यात उतरवता येतात का, याची पडताळणीही नाथांनी केलीच असली पाहिजे. बाबा बेलसरे तर सांगतात की, ‘‘अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत आणि त्यांचा व्यवहार या दोन्हीमध्ये श्रीएकनाथ अतिशय पारंगत होते. स्वत:च्या जीवनावर प्रथम प्रयोग करून त्यांनी अनेक आध्यात्मिक तत्त्वांचा साक्षात् पडताळा पाहिला. नंतर त्याचे शास्त्र बनवले. ते हे नाथभागवत होय. मानवी जीवनाचा खरा अर्थ काय आणि तो नीट समजून घेऊन प्रत्येक माणसाने कसे वागावे हे विस्ताराने सांगण्यासाठी नाथांनी भागवत लिहिले.’’ (भावार्थ भागवत, पृ. ९३). गीता, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत यांचा अनन्य असा जो आंतरिक संबंध आहे तो रामचंद्र कृष्ण कामत, चंदगडकर यांनी ‘एकनाथी भागवता’च्या संपादित ग्रंथात नमूद केला आहे. ते म्हणतात, ‘‘गीतेला ज्ञानेश्वरांनी प्रभूची वाङ्मयी मूर्ती म्हटले आहे. (गीता जाणा हे वाङ्मयी। श्रीमूर्ति प्रभुची।।) श्रीएकनाथ महाराजही गीतेबद्दल म्हणतात – कृष्णनि:श्वासी जन्मले वेद। गीता श्रीकृष्णमुखें प्रगटली शुद्ध। यालागीं गीतार्थ अगाध। घडौते वेद तेणें झाले।। वेद हे कृष्णाच्या श्वासोच्छ्वासांतून जन्माला आले, पण गीता  ही प्रत्यक्ष त्याच्या मुखाने प्रगट झाली..’’ पुढे कामत सांगतात की, ‘‘वेद आणि गीता यांचा जो संबंध वर दाखवला आहे, तोच गीता आणि ज्ञानेश्वरी यांचा आहे आणि तोच ज्ञानेश्वरी व नाथ भागवत यांचा आहे. गीतेच्या काळी गीतेचे ज्ञान ऐकणारे श्रोते फारसे जन्माला आले नव्हते. त्यासाठी श्रीकृष्णाला चार हजार वर्षे वाट पाहावी लागली! शके ११९७मध्ये ज्ञानेश्वररूपाने प्रभू अवतरले. गीतेच्या वेळी पोटातील ज्ञान ओठातून बाहेर काढायला अवसर मिळाला नव्हता, तो यावेळी मिळाला. वेदाचे श्रेष्ठत्व राखूनच गीतेचे महत्त्व ज्ञानेश्वरांनी वाढविले.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा