चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com
वेदांचं श्रेष्ठत्व राखूनच गीतेचं महत्त्व ज्ञानेश्वरांनी वाढविलं आणि ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व राखून नाथांनी भक्तीतत्त्वाचं सखोल विवेचन केलं. त्यामुळे ‘एकनाथी भागवत’ हा वारकरी संप्रदायातला अर्थात भक्तीपंथातला एक महत्त्वाचा ग्रंथ ठरला. या ग्रंथाचा मागोवा आपण आता सुरू करीत आहोत, पण तो घेण्याआधी काही गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. पहिली गोष्ट म्हणजे या सदरात प्रत्येक ओवीचा मागोवा घेणं कालमर्यादा आणि स्थलमर्यादेमुळे केवळ अशक्य आहे. तेव्हा आपण विषय प्रतिपादनातली संगती कायम राखण्याचा प्रयत्न करीत त्या अनुषंगानं प्रातिनिधिक महत्त्वाच्या ओव्यांचा तेवढा आधार घेणार आहोत. याचाच अर्थ असा की ज्या ओव्यांचा या सदरात मागोवा घेतला जाणार नाही, त्यांचे महत्त्व कमी नाहीच. त्यामुळे या विवेचनाला वाचकांनी शक्य झाल्यास मूळ ‘एकनाथी भागवता’च्या पारायण, मनन आणि चिंतनाचीही जोड द्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे ‘एकनाथी भागवता’च्या प्रतीचं संपादन अनेकांनी केलं आहे. त्यातील कोणतीही प्रकाशित प्रत आपण घेऊ शकता. यातील जे विवेचन स्वीकारार्ह वाटतं ते स्वीकारावं, त्यावर चिंतन करावं आणि आपल्या आंतरिक वाटचालीत त्याचा पडताळाही घ्यावा. तेव्हा आता ग्रंथाच्या मागोव्यास सद्गुरूस्मरणपूर्वक सुरुवात करू..
।। श्रीएकनाथी भागवत ।।
अध्याय पहिला
ॐ नमो जी जनार्दना।
नाहीं भवअभवभावना।
न देखोनि मी तूं पणा।
नमन श्रीचरणा सद्गुरूराया।। १।।
या ओवीचा प्रचलित अर्थ असा आहे की, ‘‘ओंकारस्वरूप श्रीजनार्दनस्वामींना नमस्कार असो. हे सद्गुरो, तुमच्या स्वरूपात आदि आणि अंताची कल्पनाच संभवत नाही. अशा आपल्या श्रीचरणांना ‘मी-तू’पणाचा भाव सोडून नमस्कार करतो!’’ या ओवीवरच कित्येक दिवस विवेचन घडेल हो! पण आपण शक्य तितक्या संक्षेपानं आणि तरीही शक्य तितक्या विस्तृतपणानं या ओवीतील भावस्थितीचा विचार करणार आहोत. हा ग्रंथ ज्या एकनाथांकडून प्रकट झाला त्यांची भावस्थिती काय होती, हे हा चरण सांगतो. या भावस्थितीतून क्षणभरही आणि तसूभरही न ढळता नाथांनी भक्तीतत्त्वाचं हृदयंगम वर्णन या ग्रंथात केलं आहे. इथं जनार्दनस्वामींना ‘ॐ नमो जी जनार्दना’ असं म्हटलं आहे. अर्थात सद्गुरू हा ओंकारस्वरूपच आहे. नाथांनीच म्हटलं आहे ना? ‘ओंकारस्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो!’ तर हे सद्गुरो, अज्ञानाच्याच आधारानं आम्ही आजवर अनंत जन्म जगत आलो आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ‘अनाथ’ होतो. अशा आम्हा अनाथांचा तू नाथ झालास. तुझ्यामुळेच जगण्यातलं अज्ञान निखळलं आणि ज्ञानाच्या प्रकाशात जगणं सुरू झालं. तर हे ओंकारस्वरूप जनार्दना तुला नमन असो! म्हणजे माझं मन ‘न-मन’ होवो. जेव्हा असं न-मन होईल तेव्हाच खरं नमन साधेल. या न-मनानं जी स्थिती प्राप्त झाली ती नाथ पुढील चरणात सांगत आहेत – ‘नाहीं भवअभवभावना’! ‘भव’ म्हणजे असणं आणि ‘अभव’ म्हणजे नसणं.. भव-अभव भावनाच उरली नाही म्हणजे काही असो अथवा नसो, मला त्याचा हर्ष वा खेद उरला नाही!