चैतन्य प्रेम
सद्गुरू सांगत आहेत, ‘देह शुद्ध करूनी भजनीं भजावे!’ आता आधी सांगितल्याप्रमाणे जो स्थूल देह आपल्याला लाभला आहे, तो शुद्ध करणं केवळ इथं अभिप्रेत नाही. हा स्थूल देह शुद्ध करायचा म्हणजे रोज स्नान वगैरे करून, साबणानं तो घासून, अत्तरानं चोपडून तो शुद्ध करणं इथं अभिप्रेत नाही. ही सगळी बाह्य़ रंगरंगोटी झाली. देह जर खऱ्या अर्थानं शुद्ध व्हायला हवा असेल, तर तो देह ज्या मनाकडून राबवला जातो, ते मन शुद्ध व्हावं लागेल! आणि ते मन शुद्ध करून मग ‘भजनीं भजावे,’ हे जर करायचं असेल, तर मग ते काही एका जन्मातलं काम नाही, आपल्या आवाक्यातलं काम नाही, असं आपल्याला वाटेल. कारण मन शुद्ध करण्यात किती वर्ष जातील, कोण जाणे! आणि असं ‘शुद्ध’ झालेलं मन कोणत्या क्षणी कोणत्या कारणानं घसरेल आणि भौतिकाच्या आसक्तीत घरंगळेल, हेदेखील काही सांगता येत नाही. मग ‘देह शुद्ध करुनी भजनीं भजावे,’ हे कसं साधावं? आणि मागेच म्हटल्याप्रमाणे केवळ स्थूल देह नव्हे, तर हा स्थूल देह ज्या मनानुसार चालवला जातो, त्या सूक्ष्म मनानं घडलेल्या सूक्ष्म, कारण आणि महाकारण देहापर्यंत ही शुद्धीची प्रक्रिया होत जाणार आहे. पण या टप्प्यावर केवळ हाच विचार करू की, ‘देह शुद्ध करुनी भजनीं भजावे,’ हे कसं साधावं? तर हे साधण्याची प्रक्रियाच पुढील सर्व चरणांमध्ये उलगडली आहे. ‘देह शुद्ध करूनी’चा आणखी एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे. शुद्ध म्हणजे स्वच्छ, पवित्र वगैरे, असं आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं. पण शुद्ध म्हणजे ‘जसा आहेस तसा,’ हा पटकन लक्षात न येणारा अर्थही आहे! आपण म्हणत नाही का? की ‘ही शुद्ध फसवणूक आहे!’ आता फसवणूक कधी शुद्ध असते का? तेव्हा या वाक्यात ‘शुद्ध’ हे फसवणुकीचं विशेषण नव्हे, तर ती किती भीषण आहे, याचं सूचन त्यात आहे. आपण म्हणतो ना? की, ‘अमका माणूस शुद्ध खोटं बोलत आहे!’ आता खोटंही कधी शुद्ध नसतं. तर त्याचप्रमाणे ‘देह शुद्ध करूनी’ म्हणजे जसा आहेस ना, तसाच राहून आधी भजनात स्वत:ला झोकून दे! म्हणजे ‘मी भक्त’, ‘मी ज्ञानी’, ‘मी सच्चा साधक’, ‘मी खरा समर्पित’ किंवा ‘मी खरा लीन’ असे मुखवटे टाकून दे! जसा आहेस तसा भगवंताला सामोरा हो. तू भले ‘पापी’ असशील, भले ‘अडाणी’ असशील, भले विकारवश असशील, पण जसा आहेस तसा भगवंताला सामोरा जाऊन भजनभावात स्वत:ला झोकून दे! आपल्या मनात विकारांची खदखद सुरू असताना आपण स्वत:ला सात्त्विक साधक मानून तो मुखवटा धारण करून भजन करू लागतो, पण त्यात तो आर्त भाव येत नाही कारण पायाच खोटा असतो. पण जेव्हा माझ्याइतका हीनदीन कुणी नाही आणि तरीही मी त्याला आळवू शकतो, हा भाव जागा झाला, तर भजनात माणूस हळहळू स्वत:ला तेवढय़ा वेळापुरतं का होईना, विसरू लागतो. मग त्या भजनात जसजसा सच्चेपणा येऊ लागतो, तसतसा भावही शुद्ध होत जातो. या प्रक्रियेचं वर्णन या अभंगाच्या पुढील चरणांमधून उलगडतं. यातला दुसराच चरण फार विलक्षण आहे, जनार्दन स्वामी एकनाथांना सांगतात, ‘‘देह शुद्ध करुनी भजनीं भजावें। आणिकांचे नाठवावें दोषगुण।।’’ हे शिष्या जसा आहेस तसा भगवंताला सामोरा होऊन भजनात स्वत:ला झोकून दे आणि हे साधण्यासाठी इतरांचे दोषगुण आठवू नकोस! चकवा कळला का? इतरांचे दोषच नव्हे, तर इतरांचे गुणदेखील आठवायचे नाहीयेत!!