चैतन्य प्रेम

जनार्दन स्वामींनी शिष्योत्तम एकनाथांची जी जडणघडण केली, तिचा मागोवा आपण त्यांच्याच अभंगाच्या आधारावर घेत आहोत. हा प्रसिद्ध अभंग आहे.. ‘देह शुद्ध करूनी भजनीं भजावे!’ या अभंगाचा पहिला चरण आपण पाहिला.. ‘देह शुद्ध करूनी भजनीं भजावे। आणिकाचे नाठवावें दोषगुण।।’ पुढे जनार्दन स्वामी सांगतात, ‘‘साधनें समाधी नको या उपाधी। सर्व समबुद्धी करी मन।।’’ साधना, समाधी या सर्व उपाधी आहेत! म्हणजे मी योगसाधना करतो, मी कर्मसाधना करतो, मी नामसाधना करतो, मी ज्ञानसाधना करतो.. या मान्यतेतून माझ्यासारखा कर्मसाधक नाही, माझ्यासारखा नामसाधक नाही, माझ्यासारखा ज्ञानसाधक नाही.. असा अहंकार कधी झिरपू लागतो, हे कळतंही नाही. मग हाच अहंकार इतका विस्तारतो की, माझ्यासारखा नामयोगी नाही, माझ्यासारखा कर्मयोगी नाही, ज्ञानयोगी नाही.. असा भ्रम त्यातून वाढू लागतो. तेव्हा साधना ‘करण्याच्या’ फंदात पडण्यापेक्षा, समाधी लावण्याच्या फंदात पडण्यापेक्षा साधना सहज व्हावी, समाधी हीच सहजस्थिती व्हावी. ती कशानं होईल? तर केवळ आणि केवळ सद्गुरू बोधाशी एकरूप होऊन त्या बोधानुरूप जगू लागल्यानंच ते होईल. इथं तुकाराम महाराज यांच्या एका अभंगाचं स्मरण होतं. तुकाराम महाराज सांगतात :

जाणावें ते काय। नेणावें ते काय। ध्यावे तुझे पाय। हेंचि सार।। १।।  करावें तें काय। न करावें तें काय। ध्यावे तुझे पाय। हेंचि सार।। २।। बोलावें तें काय। न बोलावें तें काय। ध्यावे तुझे पाय। हेंचि सार।। ३।। जावें तें कोठें। न जावें तें आतां। बरवें आठविता। नाम तुझें।। ४।। तुका म्हणे तूं करिसी तें सोपें। पुण्यें होती पापें आमुच्या मतें।। ५।।

काय जाणावं आणि काय जाणू नये? हे जाणून घेण्याची धडपड करण्यापेक्षा हे सद्गुरो, तुझे पाय ध्यानात राखावेत, हेच सार आहे! ‘तुझे पाय’ म्हणजे तुझी चाल.. तू ज्या मार्गानं जातोस त्या मार्गानं तुझ्या चालीनं जाणं! दुनियेच्या मार्गानी सुखाचा शोध घेत ठेचकाळत जाणं थांबवणं. काय करावं आणि काय करू नये, या विचारात गुंतण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा तुझ्याच मार्गानं चालण्याची कृती अखंड करावी, हेच खरं. काय बोलावं आणि काय बोलू नये, हे ठरवण्यात व्यर्थ श्रमण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा तू दाखवलेल्या वाटेनंच चालत राहाणं सार्थक आहे. कुठे जावं आणि कुठं जाऊ नये, याचा खल करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा तुझ्या नामस्मरणातच सदोदित राहण्याचा प्रयत्न खरा हितकारक आहे. अखेरचा चरण फार मनोज्ञ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, हे सद्गुरो, तू जे घडवतोस ना माझ्या जीवनात, ते अगदी सोपं आहे. आम्हीच त्यात घोळ घालून जीवन अधिक बिकट करून ठेवतो. कारण आम्ही जी जी पुण्याची कामं समजतो आणि ती करू जातो, ती ती कामं पापामध्येच परावर्तित होतात! म्हणजे अन्नदान हे पुण्याचं काम आहे, पण माझ्यामुळे अनेकांचं पोट भरतं, हा अहंभाव जागा झाला, तर तेच अन्नदान पुण्य न ठरता पाप ठरतं! तेव्हा जी काही सत्र्कम आपण आपल्या मतानुसार पुण्यप्रद म्हणून करू लागतो, त्यात अहंकारही मिसळतो आणि मग ‘पुण्ये होती पापें आमुच्या मते!’ ही गत होते. तेव्हा साधने आणि समाधी, या जर निव्वळ देहबुद्धी वाढवू लागल्या तर त्या उपाधी होतील, ओझं ठरतील. त्यापेक्षा ‘सर्व समबुद्धी करी मन,’ असं सद्गुरू सांगत आहेत.