एकनाथी भागवताची पहिल्या ओवीची आणि एकनाथ महाराज यांच्या आंतरिक सद्गुरूमय स्थितीची बैठक आपण जाणून घेतली. या एकाच ओवीचा विचार आपण इतका दीर्घकाळ केला याचं कारण कोणत्या धारणेत स्थित राहून नाथांनी श्रीमद्भागवत महापुराणातील एकादश स्कंधाचं विवेचन केलं आहे, हे काही प्रमाणात तरी का होईना, पण उमगावं. आता ग्रंथ परिपाठानुसार नाथांनी ग्रंथारंभीच्या मंगलाचरणानुसार विविध विभूतींना वंदन केलं आहे. त्यात गणेश, शारदा, संत तसेच ज्यांच्या भक्तीबिजामुळे आपल्यात भक्तीचा वारसा आला ते पणजोबा भानुदास आणि अखेरीस पुन्हा सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कृपेचं त्यांनी स्मरण केलं आहे. पण प्रत्यक्षात, जो अभिन्न शिष्य असतो, तो या सर्वामध्ये केवळ आणि केवळ सद्गुरूंनाच पाहतो! हे रहस्य लक्षात घ्या आपण. म्हणजे आपल्या अंतरंगात भक्तीचं बीज रुजायला, ते अंकुरित व्हायला आणि त्याचं रक्षण, संवर्धन व्हायला जे जे कारणीभूत झाले, ते ते केवळ सद्गुरूंच्या योजनेनुसारच आपल्या जीवनात आले, असं शिष्य मानत असतो. अगदी देव-देवताही सद्गुरूआधारावरच त्यांचे निहित कार्य करीत आहेत, असा त्याचा भाव असतो. त्यामुळे या सर्व वंदनादेखील सद्गुरूस्वरूपाचंच स्मरण ठेवून बाह्य़ आकारातील गणेशाला, शारदेला, संतांना आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हे रहस्य लक्षात ठेवून गणेशवंदनेची ओवी पाहू. नाथ म्हणतात :

नमन श्रीएकदंता। एकपणें तूंचि आतां। एकीं दाविसी अनेकता। परी एकात्मता न मोडे।। २।।

ओवी गणेशवंदनाची आहे, पण यातली सर्व विशेषणं सद्गुरूलाही लागू होतात! तो एकदंत आहे. म्हणजे केवळ शाश्वताकडे वळवणाऱ्या एकाच ज्ञानरूपी दातानं तो समस्त अज्ञान नष्ट करीत आहे. इतकंच नाही, तर नाथ सांगतात की, हाच माझा सद्गुरू एकमेव असूनही आणि एका स्वरूपात सदैव स्थित असूनही मनुष्यमात्रांना अज्ञानबंधातून सोडवून ज्ञानमय करण्यासाठी अनंत रूपं धारण करतो आहे! ही अनंत रूपं घेऊनही त्याचं एकपण काही मोडत नाही! म्हणजेच या चराचरातल्या चांगल्यातही तोच आहे आणि वाईटातदेखील तोच आहे. वाईटपणा नसता, तर चांगुलपणाचं महत्त्व लक्षातच आलं नसतं. अज्ञान नसतं आणि त्या अज्ञानयोगानं दु:खं भोग वाटय़ाला आले नसते, तर ज्ञानाचं मोल उमगून ज्ञानमय जगण्याची इच्छाही कुणाला झाली नसती. तेव्हा जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्या सभोवतालच्या विविध मनोवृत्तीच्या माणसांच्या रूपानं सद्गुरूच आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी देत असतो. आपल्या अंतर्मनात कोणकोणत्या वासनात्मक ओढी अजून शिल्लक आहेत, अपरिपक्तवता किती उरली आहे, आसक्ती, भ्रम आणि मोह किती उरला आहे, हे जाणण्याची, जोखण्याची संधी या प्रत्येक प्रसंगातून सद्गुरू देत असतो. जर ते लक्षात आलं तर मग सद्गुरूबोधानुसार जगण्याइतका आनंद, समाधान आणि तृप्ती अन्य कशातही नाही, हे जाणवू लागतं. जगताना सर्व कर्तव्य नीट आणि प्रेमानं पार पाडत असतानाच कोणत्याही परिस्थितीत, व्यक्तीत आणि वस्तूत मोहबद्ध व्हायचं नाही, हे तोच आपल्या अंत:करणात ठसवत असतो. अनेकदा आपण विकारवश होतो, घसरतो, सद्गुरूंना जे आवडणार नाही तसं वागतो, पण तरीही शिष्याच्या परमहिताची त्यांची कळकळ कधीच नष्ट होत नाही. कारण शिष्य कसाही निघाला, तरी त्यांची ‘एकात्मता न मोडे!’

Story img Loader