श्रीगणपती हा ‘लंबोदर’ आहे. या गणेशाच्या पोटातच अवघं चराचर आहे आणि म्हणून तो लंबोदर आहे, असं नाथ म्हणतात. त्याचप्रमाणे यामुळेच तो सर्वाचा सोयरा आहे, असंही सांगतात. ‘एकनाथी भागवता’तल्या या ओव्या अशा : तुजमाजीं वासु चराचरा। म्हणौनि बोलिजे लंबोदरा। यालागीं सकळांचा सोयरा। साचोकारा तूं होसी।। ३।। तुज देखे जो नरु। त्यासी सुखाचा होय संसारु। यालागीं ‘विघ्नहरु’। नामादरु तुज साजे।। ४।।  हे सद्गुरो, आमच्या व्यक्त-अव्यक्त अशा वासनांचा आणि त्यामुळे भगवंताच्या विस्मरणाचं जे पाप पदोपदी घडत असतं, त्या पापाचा पसारा तू भक्षण करीत असतोस आणि म्हणून तुझं पोट मोठं झालं आहे. पण दुसऱ्याच्या पुण्याचा लाभ जर घेता येत असेल, तर तो घेण्यात कोणीही धाव घेईल, पण दुसऱ्याच्या पापाचा वाटा जर भोगावा लागत असेल, तर तो भोगण्याची कुणाचीही इच्छा नसेल. ज्या आप्तस्वकीयांच्या उदरनिर्वाहासाठी वाल्या मनुष्यहत्येचं पापदेखील सहज करीत होता, त्या पापात वाटेकरी व्हायला त्या आप्तांनीच नाकारलं नव्हतं का? एवढंच नाही, तर आम्ही काही तुम्हाला ही पापं करायला सांगितलं नव्हतं, असाही पवित्रा घेतलाच ना? पण हे सद्गुरो, तू आमचं पापही स्वीकारतोस आणि आमचं आत्महितही साधत असतोस. त्यामुळे तूच खरा सोयरा आहेस. आप्त आहेस. परमसुखाचा आधार आहेस. हे सद्गुरो, तुला जो कुणी पाहील ना, त्याचाच संसार सुखाचा होईल! ‘रूप पाहता लोचनी’ या अभंगाच्या निमित्तानं ‘अभंगधारा’ या सदरात या पाहण्याची दीर्घ मांडणी आपण पाहिलीच होती. ती संक्षेपानं मांडतो. आपण डोळे उघडे ठेवून पाहतो, त्याचप्रमाणे डोळे मिटूनही आपल्या प्रिय व्यक्तीला डोळ्याच्या पडद्याआड आणि मनाच्या पटलावर ‘पाहू’ शकतो आणि डोळे उघडे असताना जगात वावरतानाही जेव्हा हृदयस्थ व्यक्तीची आठवण होत असते तेव्हा त्या व्यक्तीबरोबरच्या प्रसंगांच्या आठवणीही आपण ‘पाहात’च असतो! या तीन पातळ्यांवर म्हणजे उघडय़ा डोळ्यांनी, बंद डोळ्यांनी आणि डोळे उघडे असतानाही जगाचं विस्मरण होऊन जेव्हा आपण एका सद्गुरूलाच पाहू लागतो, ते खरं पाहणं! तेव्हा ‘तुज देखे जो नरु’ हे इतकं व्यापक आहे. असं पाहू लागलं की मगच भौतिकाचा संसार जो आहे, तो सुखाचा होतो. कारण सुखाचं आणि दु:खाचं खरं स्वरूपही उकलतं. आपल्या जीवनातील सुखाची आणि दु:खाचीही क्षणभंगूरता लक्षात येते. मग सुखानं हुरळणं आणि दु:खानं खचून जाणं कमी होऊ लागतं. आपला ‘मी’पणा हाच आपल्या जीवनातील अनेक दु:खांचं मूळ असतो. त्या ‘मी’पणाचे घातक परिणाम सद्गुरू बोधाच्या आधारानं लक्षात येऊ लागतात. हा ‘मी’पणा काही नष्ट होत नाही, पण त्याचे खेळ बऱ्याच प्रमाणात कमी होऊ लागतात. त्यायोगे माझ्या जीवनातील अनेक दु:खं, अनेक ‘संकटं’ आपोआप कमी होऊ लागतात. हे जो घडवतो तो हा सद्गुरू म्हणूनच खऱ्या अर्थानं ‘विघ्नहर्ता’ असतो. नाथ महाराज म्हणतात, ‘‘यालागीं ‘विघ्नहरु’। नामादरु तुज साजे।।’’ काय गोडवा आहे पाहा! विघ्नहर हे नाव अतिशय आदरानं तुलाच साजून दिसतं! आता सोळाव्या ओव्यांपर्यंत ही गणेशवंदना आहे. त्या श्लोकांचा अर्थही आपण सद्गुरू कार्याशी ताडून लावू शकता. सतराव्या ओवीपासून सुरू होते ती शारदेची वंदना. हीदेखील प्रज्ञासूर्य सद्गुरूचीच वंदना आहे.

चैतन्य प्रेम

Story img Loader