चैतन्य प्रेम
गणेश, शारदा, संत, कुळदेवता एकवीरा यांचं सद्गुरूरूपातच वंदन करून झाल्यावर आता सद्गुरूचं परत वंदन आहे आणि त्याचबरोबर एकादश स्कंधावर हा ग्रंथ रचण्यामागचं रहस्यही त्यात सांगितलं आहे. या सद्गुरूचं सामर्थ्य मांडताना एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘ज्याचेनि कृपापांगें। देहीं न देखती देहांगें। संसार टवाळ वेगें। केलें वाउगें भवस्वप्न।। ८०।।’’ ज्याच्या कृपेच्या कटाक्षाने साधकाला देहात असूनही देहांगे दिसत नाहीत आणि संसाराची वावटळ हा हा म्हणता स्वप्नवत होऊन जाते! म्हणजे त्यांच्या दृष्टीसारखी आपली दृष्टी झाली ना, म्हणजे ते जसं या नश्वर जगाला नश्वर म्हणूनच पाहातात आणि त्यात सर्व कर्तव्य पूर्ण करीत असतानाही त्या जगाच्या आसक्तीत लेशभरही अडकत नाहीत, तशी आपलीही जीवनदृष्टी जर झाली, तर काय स्थिती होईल? तर, ‘देहीं न देखती देहांगें!’ म्हणजे देहात असूनही देहभान उरलं नसेल! या देहाच्या अवयवांना राबवून वासनात्मक ओढीमागे जाणारं मन मग आपोआप स्थिर होऊ लागेल. म्हणजेच आपल्या या इंद्रियांचा विषयलोलुप जोर इतका असतो की तो सदोदित देहबुद्धीच जागी ठेवत असतो. ही देहबुद्धी देहाला सदैव जपत, जोपासत आणि अनुकूल म्हणजेच सुखकारक अशा वातावरणात कायम राखण्याच्या धडपडीत गुंतली असते. या देहाद्वारे अर्थात देह इंद्रियांद्वारे भौतिक जगातून वासनात्मक लालसा पूर्ण करण्यासाठी ही देहबुद्धीच कार्यरत असते. मात्र सद्गुरूबोधानं देह असूनही देहबुद्धी मात्र ठायीच विरून जाते आणि मग या संसाराचा मनावर जो प्रभाव असतो तोच ओसरू लागतो! या दृश्य संसाराचा प्रभाव, पगडा फार खोलवर असतो. जे काही सुख आहे ते याच जगात मिळेल आणि जे काही दु:खं आहे ते याच जगात भोगावं लागेल, ही जाणीव एवढी पक्की असते की जगात कायम सुखच सुख मिळावं, या अवास्तव अपेक्षेनं आपण जगाचे दासही बनतो, आशाळभूत होऊन आत्मप्रतिष्ठेचेही लचके तोडतो. लाचार होतो. जगानं आपल्या प्रतिकूल होऊ नये, यासाठी लहानसहान गोष्टींतही मिंधेपणानं जगामागे धावत राहतो. अर्थात ज्यांना ‘माझे’पणानं चिकटलो असतो त्यांच्या अपेक्षांचं ओझं पेलत राहतो. मात्र जर देहबुद्धीचाच निरास झाला, तर संसाराचं खरं स्वरूपही लक्षात येतं आणि मग संसाराचं मनावरचं ओझंच उतरतं. मग या संसाराचं जे दडपण मनावर असतं ते उरत नाही. त्या दडपणामुळे जे दु:खकारक, क्लेशकारक चिंतेचं भवस्वप्न जागेपणी जीव पाहात असतो ते भंग पावतं. स्वप्न हे जोवर स्वप्न आहे, हे माहीत नसतं तोवर त्या स्वप्नातल्याप्रमाणे सुख-दु:ख जीव ‘भोगत’ असतो. मग त्या सुखकारक वा दु:खकारक परिस्थितीनुसार तो आनंदून जातो किंवा चिंतेनं भयकंपित होतो. पण एकदा जाग आली आणि आपण आतापर्यंत स्वप्नच अनुभवत होतो, हे जाणवलं की माणसाला त्याचं सुख-दु:ख भिडत नाही. उलट दु:खद प्रसंग हा केवळ स्वप्नातला होता, या जाणिवेनं त्याला हायसंच वाटतं! मग जर जगाचं खरं अशाश्वत स्वरूप लक्षात आलं, तर त्या जगात भवस्वप्न पाहण्यात गुंतलेला आणि त्या स्वप्नाबरोबरच स्वत:ला सुखी किंवा दु:खी मानून हरखणारा किंवा झुरणारा जीव त्या ओझ्यातून मुक्त होईल. दु:खद स्वप्न भंगताच जीव जसा आनंदतो तसाच हे सुख-दु:खमिश्रित आणि म्हणूनच अंतिमत: क्लेशवर्धक असं भवस्वप्न भंगताच आनंदाचाच अनुभव का येणार नाही?