चैतन्य प्रेम

ज्याची भेट होताच त्या भेटीत खंड पडत नाही. अर्थात क्षणोक्षणी त्याचं अस्तित्व असं कायमचं होऊन जातं की त्या भेटीला विरामच मिळत नाही. अशा त्या कृष्णाशी आत्मिक संवाद सुरू होताच परमार्थ काही वेगळा उरतच नाही. अवघं जगणं हाच परमार्थ होऊन जातो, असं एकनाथ महाराज सांगतात.. आणि मग इथं, ज्याचा उल्लेख काही भागांआधी केला होता तो मोठा गूढ प्रश्न उत्पन्न होतो.. की, यादवकुळाच्या नाशाचा संकेत दिल्यानंतर अचानक कृष्णमाहात्म्य गाणाऱ्या या ओव्या का आल्या आहेत? बरेचदा पारायणाच्या ओघात हा प्रश्न उमटण्याइतकीदेखील मनाला उसंत मिळत नाही. पण खरंच विचार करा, यादव कुळाच्या अंताची व्यवस्था करून मगच कृष्ण आपलं अवतारकार्य संपविण्याचा निश्चय करीत आहेत, हे सांगून झाल्यावर त्या नाशाचा कथाभाग सुरू होण्याआधीच श्रीकृष्णाचं माहात्म्य मांडण्याचं प्रयोजन काय? तर प्रयोजन हेच की, ज्या कृष्णाच्या नुसत्या भेटीनंदेखील त्याच्या अस्तित्व जीवनात पदोपदी राहातं, ज्याला पाहिल्यावर अन्य काही पाहण्याची इच्छाच उरत नाही, ज्याच्या भक्तीप्रेमाची गोडी चाखल्यावर अन्य कोणतीच गोडी उरत नाही, ज्याच्या सहवासानं परमार्थपथावर वाटचाल सहज सुरू होते त्याच कृष्णाचा सहवास आणि स्नेह लाभूनही यादवकुळ अंताच्या दिशेनं का वाटचाल करू लागलं? तर याचं उत्तर एकच, श्रीकृष्णाचं खरं माहात्म्य आणि त्याच्या सहवासाचं खरं मोल त्यांना जाणताच आलं नाही. नाहीतर कित्येक यादव हे कृष्णभक्तीनं भरलेलं जीवन जगत त्याचं कार्य पुढे नेताना दिसले असतेच ना? तेव्हा कृष्णसंगतीनं शक्ती मिळाली, त्या शक्तीनं सत्ता मिळाली, पण त्या सत्ता आणि शक्तीच्या धुंदीत ती ज्याच्यामुळे मिळाली त्याचंच मोल उमगलं नाही, तर मग जे आहे ते नष्ट व्हायला काय वेळ लागणार? साधकाला सावध करणारी ही पाश्र्वभूमी आहे. सद्गुरू आधारावर निर्भय होऊन त्या निर्भयतेनं अहंभाव वाढण्याचा आणि त्यातून आत्मघात आणि आत्मनाश होण्याचा धोका ही पाश्र्वभूमी लक्षात आणून देते. ज्याच्या नुसत्या नामानं सर्व महाभय नष्ट होतं ( ज्याचें घेतांचि नांव। नासे सर्व महाभय।।) त्या कृष्णाच्याच कुळात जन्मलेल्या यादवांच्या पाठीस आता काळाचं भय लागणार होतं! तो साक्षात कृष्णाचाच संकल्प होता आणि कृष्ण कसा आहे? तर नाथ सांगतात, ‘‘सत्यसंकल्प ईश्वरू। स्वलीला सर्वेश्वरु।’’ तो सत्यसंकल्पी आहे. म्हणजे ज्याचा संकल्प सत्यात उतरल्याशिवाय राहात नाही, असा तो ईश्वर आहे. स्वलीलाबळावर तो सर्वेश्वर या जगतात वावरत आहे. तो शारंगधर आता त्वरेनं आपल्या परमधामास जाण्यास निघणार होता. ‘‘ तो सत्यसंकल्प ईश्वरू। स्वलीला सर्वेश्वरु। स्वपदासि शाङ्र्गधरु। अतिसत्वरु निघाला।।२७६।।’’ तो शारंगधर आहे. त्याच्या हातात धनुष्यबाण आहे. लक्ष्यावर त्याचा नेम आहे. त्याचं लक्ष्य आता परमधामी जाण्याआधी या पृथ्वीला भविष्यात भारभूत होतील अशा आपल्याच कुळातील यादवांच्या अंताची सुरुवात करणं हे होतं! या टप्प्यावर परीक्षिती मोठय़ा आदरानं शुक महाराजांना विचारलं की, जे यादव कृष्णाचे आत्मज होते, सखेसोयरे होते, त्याच्या कृपाछत्रछायेखाली नांदत होते त्यांचा नाश कसा काय झाला? नाथ लिहितात : सृष्टि स्रजी पाळी संहारी। हें कृष्ण संकल्पमात्रें करी। तो यदुकुळनिधन निर्धारी। त्याची अवतारथोरी शुक सांगे!!

Story img Loader