चैतन्य प्रेम
ज्यानं नुसत्या संकल्पानं या सृष्टीचं सृजन केलं, तिचं पालन केलं आणि तिचा संहारही केला, त्या कृष्णानं यदुकुळाच्या अंताचा निर्धार केला होता. त्याच्या अवताराची थोरवी आता शुक सांगत आहेत. नाथ सांगतात, ‘‘ सृष्टि स्रजी पाळी संहारी। हें कृष्ण संकल्पमात्रें करी। तो यदुकुळनिधन निर्धारी। त्याची अवतारथोरी शुक सांगे।। २८५।।’’ आता कुलक्षयाच्या विचारात सदोदित गढलेल्या श्रीकृष्णाचं रूपवर्णन आणि गुणवर्णन पुन्हा शुक महाराज करतात आणि त्यानं पुढील काही ओव्यांना दिव्यत्वाचा स्पर्श झाला आहे. या हरिकथेच्या श्रवणानं काय साधतं, त्याचं वर्णन करताना नाथ सांगतात, ‘‘श्रवणें उपजे सद्भावो। सद्भावें प्रकटे देवो। तेणें निर्दळे अहंभावो। ऐशी उदार पहा वो हरिकीर्ति।। ३०५।।’’ हरिकथा म्हणजे काय? हरी म्हणजे जो माझ्या समस्त दु:खाचं मूळ असलेल्या भवदु:खाचं हरण करतो, निवारण करतो, तो हरी म्हणजेच सद्गुरू! त्याच्या कथा काय असतात? त्या काही श्रवणरंजनाच्या नसतात. त्या कथांतून सद्गुरूंचा जीवनबोधच प्रकाशमान होत असतो. हा जीवनबोध आपल्या जगण्यातील विसंगतींचं भान आणून देणारा असतो आणि शाश्वत काय आहे, खरं मोल कशाला आहे, याची जाणीव वाढवणारा असतो. त्यातून मनातला असद्भावच दूर होतो आणि सद्भाव उपजतो. भावनिक परावलंबीपणा ओसरतो आणि आंतरिक दृढनिष्ठेतून येणारी निर्भयता विलसू लागते. मग त्या सद्भावातून अंत:करण शुद्ध होत जातं, दिव्य आणि पवित्र होत जातं. देहभाव विरून जातो आणि देवभावानं अंत:करण भरून जातं. त्या देवभावानं जगताना मग जगण्यातल्या अहंभावाचं निर्दालन होतं. तेव्हा हरीची कीर्ती म्हणजेच त्याच्या कथा, त्याच्या लीलांचं वर्णन ऐकणं ही सामान्य गोष्ट नाही. तिलाही मोठा योग लागतो. नाथ सांगतात, ‘‘जरी केलिया होती पुण्यराशी। तरी अवधान होये हरिकथेसी। येऱ्हवीं ऐकतां येरांसी। लागे अनायासीं अतिनिद्रा।। ३०७।।’’ जर हातून अनंत पुण्यकर्मे घडली असतील तरच हरीकथेकडे अवधानपूर्वक लक्ष लागतं, अन्यथा ती कथा ऐकता ऐकताच अतिशय झोप येऊ लागते! आता पुण्य आणि पाप म्हणजे काय? आपण मागेच पाहिलं की नुसती सत्कर्म म्हणजे खरा पुण्यसंचयाचा मार्ग नव्हे. कारण त्या सत्कर्माच्या जोडीनं अहंकार वाढू लागला, तर मग पापाचाच संचय अधिकाधिक होऊ लागतो. तेव्हा सत्कर्म घडत असतानाही ते करण्याची शक्ती आणि संधी भगवंताच्या कृपेनं लाभली आहे, हे सत्कर्म घडवून घेणारा कुणी अन्य आहे, मी निमित्तमात्र आहे, हा भाव जितका स्थिर होत जाईल तितकं भगवद्शक्तीचं स्मरण राहात जाईल. आणि भगवंताचं विस्मरण, याशिवाय मनुष्यजन्मातलं दुसरं मोठं पाप नाही! कारण या एकाच पापानं अनंत पापांची मालिका सुरू होते. तेव्हा जर जगणं सद्गुरूभावनेनं स्पर्शित असेल, तरच सद्गुरूंच्या लीलाचरित्राचं आणि बोधाचं अवधानपूर्वक श्रवण होऊ लागतं. नाहीतर मग इतरांना लगेच झोप लागते, कारण ही मोहनिद्रा असते! जे ऐकलं जात आहे त्यावर विश्वास बसत नाही, त्याच्यात विकल्पबुद्धीनं अनेक शंकाकुशंका येऊ लागतात आणि मग त्या कथांमागचं बोधप्रदायक असं जे खरं रहस्य आहे ते गवसतच नाही. मग असा जीव त्या कथा केवळ एका कानानं ऐकतो आणि दुसऱ्या कानानं सोडून देत मोहनिद्रेच्या कुशीत पुन्हा पुन्हा डोकं विसावत असतो, अर्थात बुद्धी गहाण ठेवीत असतो!