सद्गुरूशी ऐक्य! हे दोन शब्द ऐकणं सोपं आहे, पण असं ऐक्य वास्तवात येणं महाकठीण आहे. लक्षात घ्या, महाकठीण आहे, पण त्यांच्या कृपेला अशक्य काहीच नाही. ती कृपा त्यांना करावीशी वाटावी, अशी आपली घडवणूक करून घेण्यास आपण आधी तयार आहोत का, हे तपासलं पाहिजे. मुळात अशी ऐक्यता म्हणजे काय आणि तिची गरज काय, याचाही विचार केला पाहिजे. आज आपलं सगळं जगणं हे दृश्याच्या पकडीत असलं, अर्थात भौतिक जीवनाला मनानं पूर्ण खरेपणा दिल्यानं त्या जीवनाला सर्वात महत्त्व दिलं जात असलं, तरी त्या भौतिकाशीही आपण पूर्णपणे ऐक्य पावू शकलेलो नाही! त्या भौतिकातही आपल्याला अधिक-उणं असं काहीतरी भासत आणि डाचत असतंच. त्यामुळे खरी ऐक्यता आणि एकाग्रता आपल्या रोजच्या जगण्यातही आढळत नाही. बरं भौतिक जगातच आपण जन्माला आलो आहोत आणि अखेरचा श्वास घेईपर्यंत या भौतिक जगातच आपल्याला राहायचं आहे, यात काही शंका नाही. भौतिक हे काळाच्या पकडीत असल्यानं त्यात चढउतार अत्यंत स्वाभाविकपणे, पण आपल्याला अपेक्षा नसल्यानं ‘अनपेक्षित’पणे होतच असतात. परिस्थितीतील त्या बदलांनी आपण भांबावून जातो. चांगले बदल झाले, तर आपण त्या बदलामागे आपलं कर्तृत्व जोडतो आणि आनंदून तसंच शेफारूनही जातो, पण बदल जेव्हा प्रतिकूल होतात तेव्हा आपण खचून जातो आणि कधी कधी तर ढासळूनही जातो. त्या बदलांकडे कशाप्रकारे पाहावं, त्या बदलांचा स्वीकार अटळ असल्यानं त्या बदलत्या परिस्थितीत कसं राहावं, हेच आपल्याला उमगत नसतं. त्यामुळे परिस्थितीचा गुंता अनेकदा आपणही वाढवून ठेवतो. मग या भौतिक जगात राहूनच त्या जगाचा मनावरचा प्रभाव, पगडा जर दूर झाला, तर प्रयत्न करूनही मनाची अस्थिरता उरणार नाही. आणि जर मनाची अस्थिरताच संभवत नसेल, तर मग ‘दु:खा’ची शक्यता तरी कुठून उरावी? मग हे कधी शक्य आहे? तर त्या भौतिकापेक्षा अधिक प्रभावी, असं काही असलं तरच ते शक्य आहे. त्याच्या आधारानं जेव्हा भौतिकाचा, अर्थात भौतिकातील बऱ्या-वाईट बदलांचा, म्हणजेच लाभ-हानी, यश-अपयश, सुख-दु:खं, अनुकूलता-प्रतिकूलता अशा समस्त द्वैताचा सहज स्वीकार करून त्यात सकारात्मकतेनं प्रयत्नरत राहूनही त्या प्रयत्नांच्या फळापासून अलिप्त होता येईल, तेव्हाच जीवनाचा प्रवाह अखंड वाहता राहील. तर भौतिकापेक्षाही प्रभावी असं जर काही तत्त्व असेल, तर ते सद्गुरूंच्याच आधारानं उमगणारं आहे आणि म्हणून सद्गुरूंशी ऐक्यता होण्याची गरज आहे. आता ही ऐक्यता म्हणजे काय? तर जसा त्यांचा विचार, तसा माझा विचार होणं! जी त्यांची जीवनदृष्टी, तीच माझी जीवनदृष्टी होणं. जी त्यांची धारणा, तीच माझीही धारणा होणं. ही ऐक्याची प्रक्रिया काही माझ्या ताकदीवर होणारी आणि माझ्या आवाक्यातली नाही. पण जर अशा ऐक्यतेची खरी तळमळ माझ्या मनात असेल, तर ही प्रक्रिया तो सद्गुरूच माझ्या जीवनात घडवून आणतो. त्यासाठी त्यांचा सहवास, त्यांच्या विचारांचा सहवास आणि प्रत्यक्ष आचरणात ते विचार उतरवून त्या विचारांचा कृतीशील सहवास घडला पाहिजे. देहाचा सहवास काळाच्या चौकटीतला असतो, पण बोधाच्या सहवासानं उमलणाऱ्या आंतरिक ऐक्यावर काळाचं कोणतंही नियंत्रण नाही! या आंतरिक ऐक्यतेच्या प्रक्रियेचा चिंतन-मागोवा म्हणजेच एकात्मयोग!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा