चैतन्य प्रेम
आपण पाहिलं की, यदुकुमार खेळाच्या नादात द्वारकेपासून काही मैलांवरील पिंडारक क्षेत्री गेले. तिथं ऋषींना पाहून त्यांची गंमत करण्याची लहर त्यांच्या मनात आली. मग एका तरुणालाच स्त्रीवेष घालून आणि त्याच्या पोटाला चिंध्या बांधून गर्भवतीचं सोंग वठवलं गेलं आणि हिला पुत्र व्हावा, असा वर त्या ऋषींकडे मागितला गेला. ऋषींनी क्रोधीत होऊन शाप दिला की, ‘‘हे बाळ यादव वंशाचा काळ ठरणार आहे. त्याचं लोखंडाच्या मुसळात रूपांतर होणार आहे.’’ त्याप्रमाणेच झालं. त्या चिंध्यांचं रूपांतर लोखंडी मुसळात झालं आणि ते कसं नष्ट करावं, यासाठी जो खल झाला तो कृष्णापासून लपवून करण्याची विपरीत बुद्धी यादवांच्या मनात निर्माण झाली. त्याप्रमाणे उग्रसेन, वसुदेव, बलराम, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि इतर राजे एकत्र जमले आणि या शापावर उपाय काय, याचा विचार करू लागले! पहा.. कृष्णाला अंधारात ठेवून त्याचे आजोबा, वडील आणि मुलंही जमली आणि यात आपली मोठी फसगत होत आहे, आपला मोठा घात होत आहे, हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. उग्रसेनानं उपाय सांगितला की, या मुसळाचं चूर्ण करून ते समुद्रात फेकून द्यावं! मग लोखंडाच्या घणानं त्या मुसळाचं चूर्ण केलं गेलं. तरीही त्या मुसळाचा जो गाभा होता, जो मध्यभाग होता त्याचं काही चूर्ण होईना. तेव्हा तो त्या चूर्णासकट समुद्राच्या मध्यभागी नेऊन टाकण्यात आला. मात्र तो मध्यभाग समुद्रानं काही स्वीकारला नाही! नाथ लिहितात, ‘‘त्या मुसळाचा मध्यकवळ। चूर्ण नव्हेच अतिप्रबळ। उरळा वज्रप्राय केवळ। तो समुद्रीं तत्काळ झुगारिला।। ३८२।। समुद्रलाटांचे कल्लोळ। तेणें तें लोहचूर्ण सकळ। प्रभासीं लागोनि प्रबळ। उठिलें तत्काळ येरिकारूपें।। ३८३।।’’ समुद्राच्या लाटांनी ते लोहचूर्ण प्रभास तीर्थक्षेत्राच्या किनाऱ्यावर आणून टाकलं. हे प्रभास तीर्थक्षेत्र काठियावाडजवळ आहे. लोहचूर्ण किनाऱ्यापाशी आलं, पण त्या मुसळाचा जो मध्यभाग होता, तो एका मोठय़ा माशानं गिळला. जाळ्यात गावलेल्या या माशाच्या पोटात जेव्हा लोखंड सापडलं तेव्हा ज्याच्या हाती तो मासा होता त्याला आपलं भाग्य उजाडलं असंच वाटलं. कारण त्या काळच्या समजुतींप्रमाणे माशाच्या पोटात जर लोखंड सापडलं तर त्यानं तयार होणारं शस्त्र हे शत्रूचा अचूक वेध सहज घेतं. म्हणून मग त्या लोहानं बाण बनवून मोठी शिकार साधायचा विचार त्याच्या मनात आला. साक्षात प्रभूच त्या बाणाचा स्वीकार करणार होते, ही योजना त्या बिचाऱ्याला कुठून कळावी? नाथ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘कृष्ण कळिकाळासी नियंता’’ होता. अर्थात काळावर त्याचं नियंत्रण होतं आणि म्हणूनच त्याच्या इच्छेनं यदुवंशाचा अंत जवळ आला होता. इथं ‘एकनाथी भागवता’चा पहिला अध्याय संपूर्ण झाला. या पुढच्या अध्यायाबाबत एकनाथ म्हणतात, ‘‘..पुढील अध्यायीं ज्ञानकथा। अतिरसाळ स्वानंदता। अवधान श्रोता मज द्यावें।। ३९७।। जेथें नारद आणि वसुदेवा। संवाद होईल सुहावा। जनक आणि आर्षभदेवां। प्रश्नोत्तरीं जीवा स्वानंदु दाटे।। ३९८।। हे रसाळ ब्रह्मज्ञानामातु। चाखवीन निजपरमार्थू। एका जनार्दना विनवितु। श्रोते कृपा करितु अर्थावबोधें।। ३९९।।’’ पुढील अध्यायात नारद आणि वसुदेव तसेच जनक आणि आर्षभदेव यांचा संवाद आहे आणि त्यातून शुद्ध परमार्थच प्रकट होऊ लागणार आहे!
।। अध्याय प्रथम समाप्त।।