या जगाचा विस्तार अनंत आहे. ते किती, कुठवर आणि कसं पसरलं, विखुरलं आहे, याची गणना कुणाला करता येणं अशक्य. पण या जगापेक्षाही अधिक पसारा कुठं आहे माहीत आहे? हा पसारा आहे, मनात! मनातला अशाश्वताचा पसारा जोवर आवरला जात नाही, तोवर या विश्वातला अशाश्वताचा पसारा आवरला जाणार नाही. तोवर सुख आणि दु:ख यापासून सुरू होणारा द्वैताचा प्रवाहही परमसुखात विलीन होणार नाही. या चराचराची निर्मिती करणाऱ्या भगवंतालाही हा पसारा आवरणं अशक्य आहे. कारण या पसाऱ्याच्या खेळाचे काही नियम त्यानंच केले आहेत आणि ते मोडणं त्यालाही शक्य नाही. जो जसं करील तो तसं भोगील, हा तो प्रमुख नियम. या चराचरातलं कोणतंही कर्म निष्फळ ठरत नाही. प्रत्येक बऱ्यावाईट कर्माचं बरंवाईट फळ मिळतंच मिळतं. फक्त जीवसृष्टी काळाच्या पकडीत आणि प्रभावाखाली असल्यानं हे फळ कधी प्राप्त होईल, हे सांगता येत नाही. म्हणजे आज मी सत्कर्म करीत असीनही, पण कधीकाळच्या दुष्कर्माचे भोगही माझ्या वाटय़ाला आले असतील, तर असं वाटेल की, ‘मी इतका चांगला असूनही माझ्या वाटय़ाला दु:खं का? माझ्यावर अन्याय का?’ तेव्हा प्रत्येक कर्माचं फळ आहे. नव्हे! मनात येणारा प्रत्येक विचार हा संकल्पच मानला जात असल्यानं मनात येणाऱ्या विचारांची पूर्ती होईपर्यंत माझं या चराचरातलं येणं आणि जाणं आहेच. शारदामाता सांगत की, ‘मिठाईचा अर्धा तुकडा खायची इच्छा जरी शेष राहिली, तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो!’ मग आपल्या मनात तर किती शेकडो ‘संकल्प’ वारंवार उत्पन्न होत असतील, विचार करा! त्यामुळे सृष्टीचा हा खेळ अव्याहत सुरूच आहे आणि जोवर या खेळातल्या अशाश्वतात गुंतणं थांबत नाही, तोवर मनाचे खेळ थांबत नाहीत. हे खेळ थांबत नाहीत तोवर जन्म-मृत्यूचं चक्र थांबत नाही. त्यामुळे मनाचा पसारा आवरणारा कुणीतरी जीवनात यावा लागतो! या विश्वाचा हा पसारा परमात्म्यानं निर्माण केला. त्यामुळे या पसाऱ्याची व्यवस्था लावणं आणि तो आवरून परत आपल्यात विलीन करून घेणं, ही त्याची जबाबदारी आहे. ती त्याला पार पाडता यावी, यासाठीच सद्गुरूचं अवतरण आहे! कारण आधीच सांगितल्याप्रमाणे, बाह्य़ापेक्षा मनातला पसाराच खूप असतो. तो पसारा सद्गुरू कसा आवरतात? तर ते केवळ सांगतात, ‘‘बाबा रे, जे काही भौतिक तुझ्यापाशी आहे, ते देहानं सोडू नकोस, पण मनानं त्याला कवटाळून राहू नकोस. हे सारं रामाचं आहे, हे लक्षात ठेवून कर्तव्यात कुचराई न करता जगात रहा. पण तू या जगाचा नव्हेस, तर एका भगवंताचा आहेस, हे विसरू नकोस!’’ तेव्हा मी श्रीमंतीत असलो, तरी हे ऐश्वर्य त्या भगवंताचं आहे, हे मानून त्यात राहाणं, हेच मनातला आसक्तीचा पसारा आवरणं आहे! जेव्हा मनातला पसारा पूर्ण आवरला जाईल तेव्हा बाहेरच्या पसाऱ्यातलं गुंतणं आपोआप थांबेल. मग तो पसारा असला काय वा नसला काय? तो बाधणार किंवा बंधनकारक ठरणार नाही. सद्गुरूंशी ऐक्यता त्यामुळेच अनिवार्य आहे. सद्गुरूंच्या या विराट कार्याचं रहस्य आणि त्यामुळे परमात्म्याच्या त्यांच्यावरील प्रेमाचं रहस्य एकनाथ महाराजांनी मनोज्ञपणे मांडलं आहे. ते म्हणतात : संत देवाचा लाडका। देव तेणें केला बोडका।।१।। अर्थ पाहतां सखोल असे। बोडका देव पंढरी वसे।।२।। संत लाडका देव बोडका। म्हणे जनार्दन लाडका एका।।३।।
८. अनेकांतून एकाकडे
जेव्हा मनातला पसारा पूर्ण आवरला जाईल तेव्हा बाहेरच्या पसाऱ्यातलं गुंतणं आपोआप थांबेल.
Written by चैतन्य प्रेम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-01-2019 at 02:05 IST
Web Title: Ekatmyog article number