चैतन्य प्रेम
आत्मज्ञानी पुरुषाच्या चेहऱ्यावरच त्या ज्ञानाचं तेज जणू विलसत असतं. माणसाचा चेहरा हाच जणू त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं आणि जीवनातील तृप्तीच्या पातळीचं प्रतिबिंब असतो. त्यामुळे जो ज्ञानतृप्त आहे त्याचा चेहराच तेजोमय असतो आणि त्यामुळे त्याच्या अंगावर दागिने जरी असले, तरी ते निष्प्रभ ठरतात. उलट जो ज्ञानविहीन आहे त्याच्या अंगावरील दागिनेही त्याला शोभत नाहीत! नाथ म्हणतात, ‘‘मुगुट कुंडलें कंकण। मूर्खाअंगीं बाणलीं पूर्ण। ते शोभा लोपूनि मूर्खपण। बाहेर संपूर्ण प्रकाशे।। २०८।।’’ मूर्खानं कितीही अलंकार ल्यायले तरी त्याचा मूर्खपणाच त्या दागिन्यांपेक्षा अधिक प्रकाशमान होत असतो! हे नऊजण मात्र ब्रह्मानुभावानं अर्थात परमतत्त्वाच्या अनुभवाने पूर्णत्व प्राप्त केलेले होते. तो अनुभव त्यांच्या इंद्रियांच्या द्वारेही बाहेर पडत होता. निजशांती हेच त्यांचं भूषण होतं आणि त्यापुढे सर्व अलंकार तुच्छ ठरत होते. (ब्रह्मानुभवें पूर्णत्व पूर्ण। इंद्रियद्वारा विराजमान। तें त्यांसी निजशांतिभूषण। मुगुट कंकण तें तुच्छ।।२१०।।) आता पूर्णत्वाचा अनुभव इंद्रियांद्वारे बाहेर पडत होता, म्हणजे काय? तर जो जगात आसक्तीनं अडकला आहे तो अपूर्णत्वात अडकून आहे. त्यामुळे त्याच्या इंद्रियांद्वारे अतृप्तीची तळमळ व्यक्त होत असते. आणि जो पूर्णत्वानं भरून आहे त्याच्या प्रत्येक जीवनव्यवहारात तृप्तीचाच अनुभव येत असतो. तर राजा जनकानं धावत जाऊन या नऊजणांना दण्डवत केला आणि आपला राजमुकुट त्यांच्या चरणीं अर्पण केला. त्यांची स्तुती करीत विरक्त राजा जनक उद्गारले, ‘‘हे ईश्वरस्वरूप कृपावंतहो! जगाच्या कल्याणासाठीच तुमचा सर्वत्र संचार सुरू असतो, पण ज्यांचं भाग्य उजळतं त्यांनाच तुमची भेट घडते! (तुम्ही विचरा विश्वकणवा। परी भेटी होय प्राप्ति तेव्हां।). किती गूढ गोष्ट सांगितली आहे! या पृथ्वीवर सर्वकाळी सर्व देशांत सर्व जातिधर्मात साक्षात्कारी सत्पुरुष असतातच. त्याशिवाय जीवांचा उद्धार केवळ अशक्य आहे. पण म्हणून प्रत्येकाला त्यांची भेट घडतेच आणि ती घडूनही त्यांचं खरं महत्त्व समजतंच असं नाही! त्यासाठी भगवंताची विशेष कृपाच लागते. एकदा सद्गुरूंबरोबर आम्ही काहीजण मुंबईच्या रस्त्यावरून जात होतो. त्यांच्याकडे पाहून प्रत्येकालाच काहीतरी विशेष जाणवत असे, यात शंका नाही. काहीजण मनातून नमस्कार करीत आहेत, असंही जाणवत असे. पण तरीही हजारो लोक ये-जा करीत होते. त्यातल्या कित्येकांचं तर लक्षंही जात नव्हतं. जो-तो आपापल्या तंद्रीत किंवा आपापल्या चिंतेच्या जाळ्यात गुंग होता. तर सांगायचा मुद्दा हा की, विश्वकणव असलेला सत्पुरुष समोर जरी आला, तरी त्याला ओळखता येणं आणि मग त्यांच्या बोधानुसार जगता येणं, हे काही सोपं नाही. ती विशेष प्राप्तीच आहे. राजा मात्र हरखून गेला होता. तो म्हणाला, ‘‘आजि माझें धन्य दैव। आजि माझें धन्य वैभव। आजि धन्य मी सर्वी सर्व। हे चरण अपूर्व पावलों।।२२३।।’’ काय निरागस भाव आहे पहा! इथं दैव आणि वैभव धन्य आहे, म्हणत आहे. राजा असल्याचा अहंकार नाहीच, पण राजा आहे म्हणून हा एवढा मोठा यज्ञसमारंभ या देहानं आयोजित केला आणि त्यामुळेच आपली पावलं या स्थळी वळली, त्यामुळेच माझ्या वैभवाचं चीज झालं. माझं अस्तित्वच धन्य झालं कारण ज्यांच्या प्राप्तीनं भ्रामक विचरण थांबतं असे अपूर्व चरण मला लाभत आहेत, हा भाव आहे!