भक्त सद्गुरूकडे जातो, पण ते जाणं खरं मात्र पाहिजे. एकानं निसर्गदत्त महाराजांना विचारलं की, ‘‘मी तुमच्याकडे येतो तरी चिंता का कायम आहे,’’ त्यावर महाराज पटकन म्हणाले, ‘‘तुम्ही अजून माझ्याकडे आलेच नाही आहात!’’ तेव्हा आपण जातो ते नुसतं देहानं आणि म्हणूनच देहबुद्धीनं देहच तेवढा पाहून येतो! इथं एकनाथ महाराज जाणं हे खरं जाणं कसं असतं, ते सांगत आहेत. जो खरा भक्त असतो तो जेव्हा सद्गुरूंकडे जातो तेव्हा काय चित्र असतं? नाथ म्हणतात, ‘‘अभावो भावेंशी गेला। संदेह नि:संदेहेशी निमाला। विस्मयो विस्मयीं बुडाला। वेडावला स्वानंदु।। ८४।।’’ काय सुंदर वर्णन आहे पहा! अभाव जो होता तो भावापाशी गेला. साधक म्हणजे अभाव! ज्ञानाचा अभाव, आकलनाचा अभाव, निश्चयाचा अभाव, दृढ संकल्पाचा अभाव. हा अभाव भावनेनं घेरलेला साधक सद्गुरूंकडे जातो तेव्हा जगण्यातील अनुकूलतेचा अभावही त्याला छळत असतोच. सद्गुरू आधारानं हा अभाव दूर व्हावा, असं त्याला वाटत असतं. सद्गुरू कसा आहे? तो भावभक्तीचा स्रोत आहे. भांडार आहे. समुद्र आहे. हा अभावग्रस्त जीव त्याच्याकडे गेला की भावानं परिपूर्ण होऊ लागतो. जीवनातल्या भौतिकाच्या अभावाचं भानच त्याला उरत नाही. गणेशपुरीचे स्वामी नित्यानंद होते ना? मंगळुरूला त्यांची एक भक्त होती कृष्णाबाई. तिच्या पतीचा सोन्याचा व्यवसाय होता. त्या व्यवसायासाठी त्यानं बँकांची मोठी र्कज घेतली होती. पण ती काही त्याला फेडता येईनात. त्यामुळे व्यवसायाच्या शोधासाठी तो परगावी गेला असताना बँकेची कृष्णाबाईला नोटीस आली. कर्जफेड करणं शक्यच नव्हतं तेव्हा बँकेनं त्यांच्या घरावर जप्ती आणली, जी काही संपत्ती होती तीही ताब्यात घेतली. त्याच गावात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे कृष्णाबाई मुलाबाळांसह आश्रयाला गेली. गावातल्या लोकांना मात्र कुत्सितपणे बोलण्यास आयता विषय मिळाला. कृष्णाबाई मात्र शांत होती. मनातून ती स्वामींना म्हणाली, ‘‘मी तुमचीच. मग माझा मान आणि अपमानही तुमचाच!’’ नंतर काही दिवसांनी ती मुंबईला स्वामींच्या दर्शनाला गेली. स्वामींनी विचारलं, ‘‘काय गं? सर्व गेलं ना तुझं?’’ ती म्हणाली, ‘‘बाबा, तुमचं पहिलं दर्शन घेतलं तेव्हाच सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं आहे. माझं उरलंच काय होतं की ते जावं?’’ तिच्या या उत्तरात विषादाची कणमात्र छटादेखील नव्हती. स्वामी समाधानानं म्हणाले, ‘‘तुझ्या मुलांचं भाग्य तर गेलं नाही ना? तुझ्या पतीचा विवेक तर कुणी हिरावला नाही ना? मग जे गेलं ते जाऊ दे. परत मिळवशील!’’ बघा, काय बोध आहे!  पैशालाच माणूस सर्वस्व मानतो आणि त्यामुळेच पैसा गमावणं म्हणजे सर्वस्व गमावणं, असं तो मानतो. प्रत्यक्षात कर्तृत्वाची क्षमता आणि विवेक हेच मनुष्याचं सर्वस्व असतं आणि ते गमावलं गेलं नसेल, तर प्रयत्न करण्याचा मार्ग तर असतोच ना, हेच स्वामी जणू विचारत आहेत. पैसा आहे, पण कर्तृत्व आणि विवेक नसेल, तर तो पैसा वेगानं संपून जाईल किंवा माणसाला अधोगतीला नेत त्याचा भविष्यकाळ खडतर करील. त्याचप्रमाणे पैसा नसेल, पण कर्तृत्व आणि विवेक असेल, तर तारतम्यानं जगताना तो पैसा कष्टानं परत मिळवताही येईल. तेव्हा अभावाच्या जगातला साधक भावपरिपूर्ण अशा सद्गुरूकडे गेला, तर त्याच्यातली भौतिकाच्या अभावाची जाणीवच कशी लोपते , हे कृष्णाबाईच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

– चैतन्य प्रेम

 

Story img Loader