शब्दार्थानं ज्ञान ग्रहण केलं, पण जाण वाढली नाही, तर त्या ज्ञानाला अर्थ नाही.. आणि अध्यात्म मार्गावर तर एखाद्या अडाणी भासणाऱ्या भक्ताचं अंतरंग अशा विशुद्ध जाणिवेनं ओतप्रोत असतं की एखादा शब्दज्ञानी त्याच्यापुढे फिका पडावा! तर, ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या, पण त्या जगण्यात उतरून अनुभवाचा भाग झाल्या नाहीत, तर त्यांना काही अर्थ नाही. परीक्षिती मात्र खऱ्या अर्थानं ज्ञानग्रहणास अत्यंत पात्र होता. याचं कारण आपण मागे पाहिलं की, त्याच्या अंगी विवेक आणि वैराग्य भरून होतं आणि ब्रह्मप्राप्तीसाठी त्यानं सर्वस्वाचा त्याग केला होता. आता स्थूल रीतीनं पाहाता, परीक्षितीनं राज्यपद आपला पुत्र जनमेन्जय याच्याकडे सोपवलं होतं आणि आयुष्यातले उरलेले शेवटचे सात दिवस सार्थकी लावण्यासाठी तो गंगेच्या तटावर येऊन शुकासमोर भागवत श्रवणासाठी बसला होता. तेव्हा त्यानं सर्वस्वाचा त्याग केला होताच, पण इथं अभिप्रेत त्याग हा मनातून झालेलाच त्याग आहे. कारण माणूस बाहेरून कितीतरी गोष्टी सोडील, पण आतून त्या सुटल्या नसतील, तर आतून तो तळमळतच राहील. मग त्या त्यागाला अर्थ नाही. तेव्हा सर्वस्वाचा त्याग म्हणजे ‘मी’सकट ‘माझे’चा मनातून त्याग. कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात सोडली नाही, तरी चालेल, पण मनात तिच्याबाबत आसक्ती आणि दुराग्रह उरता कामा नये! तर तो खरा सर्वस्व त्याग झाला. आता हा त्याग कशाकरिता आहे? तर ‘ब्रह्मप्राप्ती’करिता! ब्रह्म म्हणजेच सद्गुरू आणि सद्गुरू म्हणजे सार्वत्रिकतेचं, व्यापकत्वाचं, विशुद्ध समभावाचंच प्रतीक आहे. तेव्हा ज्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी, असं वाटतं त्याला आपल्या जगण्यातल्या आणि आपल्या मनातल्या सर्व तऱ्हेच्या संकुचितपणाचा त्याग साधलाच पाहिजे. ‘मी’ आणि ‘माझे’च्या बेडय़ांचं जे जखडलेपण आहे ते तुटलंच पाहिजे. परीक्षितीला असा सर्वस्व त्याग साधला आहे. आणि म्हणूनच उदात्त असं भगवंताचं लीलाचरित्र ऐकायला बसल्यावर त्याचं मनही उदात्त विचारांनी भरून आलं आणि पाठोपाठ त्याचा उरही उदात्त भावनेनं भरून आला. शुकदेवांचं मनोज्ञ रूपवर्णन करताना नाथ म्हणतात, ‘‘जो चिदाकाशींचा पूर्णचंद्र। जो योगज्ञाननरेंद्र। तो बोलता झाला शुक योगींद्र। परिसता नरेंद्र परीक्षिती।।१८३।।’’ शुकदेव जणू चिदाकाशातील पूर्णचंद्र आहेत आणि परीक्षितीसारख्या अनन्य भक्ताच्या चित्तातही त्यांच्या बोधकिरणांनी ज्ञानाचा पूर्णचंद्र उगवणार आहे! शुकदेव आता मोक्षाची कथा परीक्षितीला ऐकवणार आहेत आणि त्यामुळे परीक्षितीचं अंत:करण उचंबळून आलं आहे. अशा या अमृतक्षणी प्रत्यक्ष मनानं शुकदेव आणि परीक्षितींच्या समीप असलेल्या एकनाथांचं मन का कोरडं राहाणार? त्यांचंही अंत:करण कृतार्थतेच्या भावनेनं भरून आलं आहे. मग नाथांचं आणि परीक्षितीचं मन एकाच स्वरात एकच भावना व्यक्त करू लागलं.. ‘‘तंव परीक्षिती म्हणे स्वामी। याचिलागीं त्यक्तोदक मी। तेचि कृपा केली तुम्हीं। तरी धन्य आम्ही निजभाग्यें।।१८४।।’’ हे सद्गुरो! माझ्याकडे माझं असं काय होतं? जे आज ना उद्या क्षणार्धात नष्ट होणार, तेच कवटाळून मी जगत होतो. तुमच्याच कृपाबळानं जे सोडावंच लागणार होतं त्याचा सहज त्याग झाला आणि आता खऱ्या अर्थानं मोक्षदायक असा बोध तुम्ही करणार आहात, या निजभाग्यानं मी धन्य झालो!!
– चैतन्य प्रेम

Story img Loader