आयुष्याची अखेर अगदी सात दिवसांवर येऊन ठेपल्याचं भान परीक्षितीला आहे. त्यामुळे आयुष्याचा अखेर मोक्षदायक अशा भगवद्कथेच्या श्रवणानं व्हावा, यासाठी तो अगदी आतुर आहे. ही कथा कशी श्रवण केली पाहिजे, हे नाथांनी अगदी मार्मिक शब्दांत नमूद केलं आहे. ते म्हणतात, ‘‘अगा हे साचार मोक्षकथा। ज्यांसि मोक्षाची अवस्था। तिहीं पाव देऊनि मनाचे माथां। रिघावें सर्वथा श्रवणादरीं।। १८५।। भीतरी नेऊनियां कान। कानीं द्यावें निजमन। अवधाना करूनि सावधान। कथानुसंधान धरावें।। १८६।।’’ अहो ही खरोखर मोक्षाची कथा आहे. ज्यांना मोक्षाची आस्था आहे, मोक्षासाठी जे तळमळत आहेत, त्यांनी मनाच्या मस्तकावर पाय देऊन अत्यंत आदरानं अर्थाकडे नीट लक्ष देऊन ही कथा ऐकावी. त्यांनी कान अंतर्मुख करावेत आणि त्या कानात आपलं मन साठवावं आणि अवधानसज्ज होऊन कथेचं अनुसंधान कायम राहील, याकडे लक्ष द्यावं! मोक्ष म्हणजे काय हो? मृत्यूनंतरची ती अवस्था आहे का? ‘आनंदलहरी’ या प्रकरणात एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘ज्यासी सद्गुरूकृपा होय। त्याचें मनपण विरोनि जाय। संकल्पविकल्पां नुरे ठाय। मिरासी होय मोक्षाचा।।’’ म्हणजे ज्याच्यावर सद्गुरूकृपा होते, त्याचं मनपण विरून जातं. म्हणजे काय होतं? तर मनाचे संकल्प आणि विकल्प विरून जातात. मग असा भक्त हा मोक्षाचा वारसदार होतो. याचाच अर्थ जोवर मनाचं मनपण विरून जात नाही, म्हणजेच मनातले संकल्प आणि विकल्प नष्ट होत नाहीत, तोवर मोक्ष नाही. कारण कोणताही संकल्प मनात राहीला आणि मृत्यू आला, तरी त्या संकल्पाच्या पूर्तीच्या अपूर्ण इच्छेतूनच पुन्हा जन्म आहे! मग मोक्ष ही मृत्यूनंतरची नव्हे, तर आधी जगतानाचीच अवस्था झाली पाहिजे. आणि ती कशानं होईल? तर केवळ सद्गुरूबोधानंच होईल. तोच बोध या भागवत कथेचा गाभा आहे आणि तो मनाच्या मस्तकावर पाय देऊन ऐकला पाहिजे, असं नाथ महाराज बजावत आहेत! काय सुंदर शब्दयोजना आहे.. मनाचं मस्तक! अर्थात अहंकारावर पाय देऊन, अहंकाराला दडपून टाकून मोक्षाची ही कथा ऐकायची आहे. मनाच्या मस्तकावर पाय देऊन म्हणजे स्वत:ला मनापेक्षा अधिक उंचीवर नेऊन, मनापलीकडे जाऊन ही कथा ऐकायची आहे. तीसुद्धा कशी ऐकायची आहे? तर सर्वार्थानं. म्हणजे अर्थपूर्वक, अर्थाकडे लक्ष देऊन ती ऐकायची आहे, ऐकण्याची क्रिया सवार्थानं पार पाडायची आहे आणि हे सारं अत्यंत आदरपूर्वक, अग्रक्रमानं करायचं आहे. मग कान आत वळवायला सांगत आहेत! कान अंतर्मुख करायचे आहेत आणि त्या कानांमध्ये मन गोळा करायचं आहे. अवधानाला सावधान करायचं आहे. अर्थात अवधानसज्ज व्हायचं आहे आणि अनुसंधानपूर्वक ही कथा ऐकायची आहे. आता ही कथा ऐकताना जगणं थांबवायचं आहे का हो? तर नाही! याचाच अर्थ जगत असतानाही क्षणोक्षणी त्या कथेचं म्हणजेच त्या कथेतील बोधाचं अनुसंधान राखायचं आहे. पोथी ऐकली, पोथीतली उच्च तत्त्वं ऐकली आणि मग पोथी बंद केल्यावर जणू ते उच्च विचारही पोथीबंद करून टाकले आणि बाहेरच्या जगात आपल्याच मनाच्या आवडी-निवडी आणि सवयींनुसार वाहावत गेलो, तर ते काही खरं ऐकणं नव्हे. जे ऐकलं ते मनात ठसलं पाहिजे आणि त्यानुसार जगताना जे ऐकलं त्याच्या अनुसंधानानं जगण्यातली भ्रामकताही ओसरली पाहिजे. तर ते खरं ऐकणं. तर ही कथा अशी ऐकायची आहे.

– चैतन्य प्रेम

Story img Loader