श्रीमद् भागवताचा पाया असलेलं कृष्णचरित्र एकनाथ महाराज दहा ओव्यांत मांडत आहेत, त्यातल्या सात ओव्यांचा शब्दार्थ आपण पाहिला. उरलेल्या तीन ओव्या आता पाहू. कृष्णानं कर्मठ लोकांना बोध व्हावा यासाठीही कर्मजाडय़ाचे भेद तोडून टाकले आणि भोगातूनही मोक्षाकडे जाता येते, हे दाखवले. भक्ती, भुक्ती आणि मुक्ती या तिन्ही गोष्टी एकाच पंक्तीत बसवून दाखवल्या, अहो! माती खाऊन विश्वरूप दाखवणाऱ्या या कृष्णावताराची महती काय वर्णावी? त्या श्रीकृष्णाचे परमपवित्र आणि उत्तम चरित्र मी आता सांगणार आहे. या पूर्णावतारात निजबोधाचाही पूर्ण विस्तार या कृष्णानं केला आहे, असं नाथ सांगतात. आधीच सांगितल्यानुसार या प्रत्येक ओवीचं चिंतन करताना कृष्णचरित्रातील कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहातात. पण एकतर आपल्याला कालमर्यादा पाळावी लागणार आहे आणि या ना त्या प्रकारे याच लीलांचा आधार या संपूर्ण सदराच्या चिंतनात घेतला जाणार आहेच. त्यामुळे अधिक विस्तार टाळून आपण पुढे जाणार आहोत. त्याआधी या ओव्यांमधील काही महत्त्वाच्या मुद्दय़ांचा थोडा संक्षेपानं विचार करू. सर्वप्रथम हा कृष्णावतार पूर्णावतार आहे, म्हणजे काय, याचा विचार करू. याच विकल्पामुळे राम आणि कृष्ण आणि राम की कृष्ण, असा सूक्ष्म विचारभेदही काहींच्या मनात उद्भवतो. तेव्हा सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की, कृष्णचरित्र हे उत्तररामचरित्रच आहे. अर्थात कृष्णाचं स्वरूप श्रीरामच आहे. श्रीरामांचा अवतार कृष्णावतारात पूर्ण झाल्यानं तो पूर्णावतार आहे. प्रत्येक अवताराचं कार्य ठरलेलं असतं. त्या कार्यासाठी आवश्यक ती शक्ती अवतारात प्रकट होत असते. प्रभु रामांना यज्ञसंरक्षणासाठी राक्षसांशी प्रथम संघर्ष करावा लागला तो बालपण संपल्यावर, पण श्रीकृष्णांच्या जन्माआधीच त्यांना मारण्यासाठी कंसानं व्यूहरचना केली होती, हे लक्षात घेतलं तर या अवतारानं अधिक शक्ती का प्रकट केली, हे लक्षात येईल. पण सकाळचा सूर्य जसा हळुहळू प्रकाशमान होताना भासतो, दुपारचा सूर्य जसा प्रखर तेजानं तळपत असतो आणि सायंकाळचा सूर्य जसा पुन्हा आपलं तेज जणू स्वत:त विलीन करून घेत असल्यासारखा भासतो; पण तरीही सूर्याचं तेज, त्याची क्षमता तेवढीच असते ना? सकाळ, दुपार, संध्याकाळ या प्रत्येक वेळी सूर्याचं दर्शन आपल्याला वेगवेगळं भासत असलं तरी प्रत्यक्षात सूर्य सतत तसाच असतो ना? अगदी त्याचप्रमाणे परमात्मस्वरूप एकसमानच असतं. ते परमदिव्य, परमशक्तीमान, सर्वज्ञ आणि सर्वत्र व्याप्त असतं. तेव्हा राम आणि कृष्णचरित्रातील घटनांकडे या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. रामचरित्रातील अनेक अपूर्ण गोष्टींची पूर्ती या कृष्णचरित्रानं केली म्हणूनही तो पूर्णावतार आहे आणि म्हणूनच या अवतारातील अनेक गोष्टींचं मूळ माहीत नसल्यानं देवांनाही या अवताराचं रहस्य कळलं नाही! ज्या काळी राजाच्या अनेक राण्या असत त्या काळी रामानं एकपत्नीव्रत रूढ केलं. पण प्रभुंचं सीतामाईवरील अद्भुत प्रेम पाहून ज्या ऋषीमुनींना भगवंताच्या त्या दिव्य प्रेमाची गोडी आपल्यालाही लाभावी, असं मनापासून वाटलं त्यांना कृष्णावतारात गोप-गोपींचा जन्म लाभला! याच गोपींनी कृष्णप्रेमाचं इतकं विराट दर्शन घडविलं की, पुढचा जन्म गोकुळात गवताचं पातं व्हावं म्हणजे प्रेममय गोपींची पावलांचा स्पर्श होऊन आपण धन्य होऊ, असं ज्ञानमूर्ती विरक्तयोगी उद्धवालादेखील वाटलं होतं!

– चैतन्य प्रेम