प्रत्येक जिवाच्या वाटय़ाला प्रारब्ध असतंच. माणसालाही जन्मभर प्रारब्धानुसारची सुख-दु:खं भोगावी लागतात आणि जन्मभर तो जी काही र्कम करतो त्यानुसार त्याचं प्रारब्धही घडत जातं. थोडक्यात जसं कर्म तसं फळ, या तत्त्वानुसार प्रारब्ध साचत असतं आणि ते संपूर्ण भोगून संपविल्याशिवाय जीवनाला पूर्णविराम मिळत नाही. त्यामुळेच जन्म-मृत्यू-जन्म हे चक्र अविरत सुरू राहातं. याचाच अर्थ माणूस खऱ्या अर्थानं स्वतंत्र नाही. तो प्रारब्धाच्या आधीन आहे. हे जग एक तुरुंग आहे, असं संत मानतात ते त्याचमुळे आणि याच जगात सद्गुरूही अवतरतो. हेच रूपक जणू कृष्णजन्मातही आहे! कृष्णाचा जन्मही तुरुंगातच झाला, पण जन्मत:च तो मायेवेगळा झाला आणि यशोदा-नंदाच्या घरी नंदपुत्र म्हणून त्याचं लीलाकार्य सुरू झालं. यशोदेनं त्याला दोरखंडानं बांधू पाहिलं तर तिथंही त्यानं हेच दाखवलं की मला कोणी बळानं बांधू शकत नाही, केवळ प्रेमानंच बांधू शकतो. या बाललीलांमध्ये त्यानं कित्येकांचा उद्धार केला आणि तोही कसा? तर हसतखेळत! कालियाच्या मस्तकी चिमुकल्या पावलांनी नर्तन करीत त्यानं त्या कालियाला डोहातून जायला लावलं. माणसाच्या मनाच्या डोहातही असाच अनंत विकारांचा कालिया कधीपासून नांदत आहे. अहंकार हे त्याचं मस्तक आहे. या सहस्त्रफण्यांच्या अहंरूपी कालियाला गुरूपादुकाच जेव्हा शिरोधार्य होतात तेव्हाच अंतरंगाचा डोह निर्विष होतो. भगवंतानं वामनाचा अवतार घेतला. त्याचं ते बटुरूप इतकं मनोहर होतं की बळीची कन्या रत्नमालाचा ऊर भरून आला. असा पुत्र माझा असता तर त्याला वात्सल्यानं न्हाऊ घातलं असतं, अशी शुद्ध प्रामाणिक ऊर्मी तिच्या मनात उसळून आली. वामनरूपातील भगवंतानं केवळ तिच्याकडे मंद स्मित करून कटाक्ष टाकला. तुम्ही उच्चरवानं काय सांगता, हे भगवंत सहसा ऐकतच नाही. तुम्ही नि:शब्द होऊन हृदयातून काय बोलता, यातला शब्दन् शब्द तो ऐकतो! रत्नमालाची ती इच्छा कृष्णावतारात पूर्ण झाली. रत्नमाला हीच पुतना झाली आणि जन्म-मृत्यूच्या चक्राची अखेर बालरूपातील भगवंताला छातीशी कवटाळूनच झाली आणि तिला मोक्षपदाची प्राप्ती झाली. कित्येक राक्षस उग्र रूप धारण करून लहानग्या कृष्णाकडे आले. मग कुणी मारकुटय़ा बैलाचं रूप धारण करून का येईना, गोपाळ कृष्णानं त्यालाही मुक्त केलं. गंमत अशी की एवढी अचाट कृत्यं जगासमोर उघडपणे करूनही त्यानं आपलं बाळपणाचं रूप काही सोडलं नाही! जणू काही जे घडलं ते आपल्या गावीही नाही, असा धूर्तमूढ भाव त्यानं आपल्या निरागस चेहऱ्यावर तरळू दिला. यशोदेकडे लोण्यासाठी हट्ट करणाऱ्या बालकृष्णाला पाहून एका गोपीला वाटलं, ‘‘माझ्या घरी आहे ते सगळं लोणी नंदलालाला खाऊ घालावं. पण ही प्रार्थना करावी कशी? मी तर एक सामान्य गोपी आणि हा नंदराजाचा मुलगा म्हणजे आमचा राजपुत्रच!’’ कृष्णानं ही आंतरिक इच्छा जाणली आणि तिच्या घरी बालगोपाळांसह जाऊन आढय़ाला टांगलेलं मडकं फोडून यथेच्छ लोणी खाल्लं. हीच इच्छा इतर गोपींच्या मनात आली आणि त्यांच्याही घरी लोण्याची चोरी झाली! साक्षात परब्रह्म असून ही चोरी! जिवानं आपल्या चित्तरूपी मडक्यात प्रेमाचं लोणी राखलं आहे. भगवंत ते फस्त करतो. कारण शुद्ध निर्हेतुक प्रेम ज्या जगात अगदी अभावानंच आढळतं त्या जगावर अवास्तव प्रेम करीत राहाणं प्रेमावताराला पटतंच नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा