चैतन्य प्रेम
जगावर प्रेम करण्यात काय चूक आहे, असा प्रश्न आपल्या मनात सहज उमटतो. लहानपणी तर आपल्या मनावर ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे,’ हा संस्कार झाला असतो. जगावर शुद्ध प्रेम करणं, हाच खरा धर्म आहे, अशी व्याख्याही आपण ऐकली असते. आणि त्यामुळेच जगावर प्रेम करण्यात गैर काय, असं आपल्याला वाटतं. त्यासाठी थोडी आपल्या ‘प्रेमा’ची तपासणी करायला हवी. जगावर आपण जे ‘प्रेम’ करतो आणि जगही आपल्याशी जो ‘प्रेमा’चा व्यवहार करतं, त्याला खरं प्रेम तरी म्हणावं का, याची सूक्ष्म छाननी झाली पाहिजे. त्या छाननीनं लक्षात येईल की या ‘प्रेमा’मागे दोन्ही बाजूंनी कमी-अधिक स्वार्थच कारणीभूत असतो. ज्यांच्या योगे आपला स्वार्थ साधला जातो त्यांच्यावर आपलं प्रेम असतं आणि आपल्यामुळे ज्यांचा स्वार्थ साधला जातो त्यांचंही आपल्यावर प्रेम असतं. याचा अर्थ जगातलं प्रेम हे हेतूनिष्ठ असतं. मग या जगात नि:स्वार्थी, निर्हेतुक प्रेम कुणाचंच नसतं का? तर अशा प्रेमाचाही प्रत्यय येतो, पण गेल्याच भागात म्हटल्याप्रमाणे असं प्रेम या जगात अभावानंच आढळतं. असं शुद्ध प्रेम नात्यांमध्ये आणि समाजात असावं, असं आपल्यालाही वाटतं, पण आपणही तसं प्रेम करण्यात कमीच पडत असतो! खरं पाहता, असं नि:स्वार्थ, निर्हेतुक प्रेम खरा सत्पुरुषच करतो आणि त्यानं देह ठेवल्यावरही त्या प्रेमसंस्कारांचा प्रत्यय इतका जिवंत असतो की म्हणूनच त्यांच्या समाधीकडेही लोकांचा ओढा असतो! तसंच जे अशा सद्गुरूशी एकरूप झालेले असतात, ज्यांच्या जीवन व्यवहारात त्यांच्या बोधाशी असलेल्या निष्ठेचंच दर्शन घडतं, अशा सत्वशील व्यक्तीच्या सहवासातही अशा निर्हेतुक प्रेमाचा प्रत्यय येतो. तेव्हा जगावर अवास्तव प्रेम करणं भगवंताला आवडत नाही, याचं कारण ना ते प्रेम करणाऱ्याचं म्हणजे आपलं प्रेम खरं नि:स्वार्थ असतं, ना ते प्रेम तो ज्या जगावर करतो त्या जगाचं प्रेम निरपेक्ष असतं. स्वार्थ साधणं हाच सुप्त हेतू त्यामागे असतो. अनेकदा आपल्या अंतरंगातील वासनात्मक ओढींतून आपण दुसऱ्यावर प्रेम करतो. त्या ओढींना प्रतिसाद मिळाला तर ते प्रेम आपल्याला खरं वाटतं, शुद्ध वाटतं. त्या प्रेमात मग आपण गुंतून पडतो. त्या प्रेमात आपलेपणा मानतो. या आपलेपणामागे उभय बाजूंनी अनेकदा स्वार्थपोषक हेतूच प्रधान असतात. त्यामुळे स्वार्थपूर्तीत अडथळा येतो तेव्हा असं प्रेम हे क्षणार्धात ओसरतं. मग आपल्या मनावर त्याचा आघात होतो आणि श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘आघात जगाचे नसतात, आपलेपणाचे असतात!’’ जग आघात करीत नाही. त्या जगावरचा आपल्याच मनातला अपेक्षाबद्ध आपलेपणा त्या आघाताला कारणीभूत होतो. तेव्हा जगावर अवास्तव, अप्रमाण प्रेम करू नये. याचा अर्थ जगाचा दुस्वास करावा, असा नव्हे! तर त्या जगातील माणसांबाबत आपल्या वाटय़ाचं जे कर्तव्य आहे ते करीत मुख्य कर्तव्य असलेल्या परमार्थावर खरं प्रेम करावं! जिवानं त्याच्या अंत:करणरूपी मडक्यात प्रेमाचं लोणी राखलं आहे. या लोण्याचा जगाच्या बाजारात व्यवहार करून भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी, अशी जिवाची धडपड असते. त्यामुळे त्या प्रेमरूपी लोण्याची चोरी करून भगवंत ते फस्त करतो. कारण शुद्ध निर्हेतुक प्रेम ज्या जगात अगदी अभावानंच आढळतं त्या जगावर अवास्तव प्रेम करीत राहाणं प्रेमावताराला पटतंच नाही! श्रीकृष्णाच्या लीलांमागे हेच रहस्य आहे.