चैतन्य प्रेम

श्रीकृष्णाच्या मनात आलं की, माझ्या बळानं अतिप्रबळ झालेले हे यादव मी अवतार समाप्त केल्यानंतर अधिकच बलशाली होतील. मग ना देव त्यांना आवरू शकतील, ना दानव त्यांना हरवू शकतील. मग त्यांच्या निर्दालनासाठी मलाच पुन्हा यावं लागेल. तेव्हा हे कार्य मीच आधी केलं पाहिजे, असं कृष्णाच्या मनात आलं. थोडक्यात यादवांचा नाश आता अटळ आहे आणि त्यासाठी कृष्णांनी परमधामास जाण्याची तयारी केली आहे, हे सूचित केल्यानंतर २३९पासूनच्या ३८ ओव्यांमध्ये नाथांनी कृष्णाच्या दिव्य रूपाचं आणि दिव्य कर्तृत्वाचं वर्णन केलं आहे आणि मग त्याच्या नुसत्या स्मरणानं जी परमप्राप्ती होते, तिचं भावतन्मयतेनं परमोच्च असं वर्णन केलं आहे. आता इथं प्रश्न असा पडतो की, यादवकुळाच्या नाशाचा संकेत दिल्यानंतर अचानक कृष्णमाहात्म्य का सांगितलं आहे? तर त्यामागेही एक रहस्य आहे आणि ते कोणतं ते आपण यातील काही ओव्यांचा संक्षिप्त मागोवा घेतल्यानंतर पाहणार आहोत. या काही ओव्यांमधील तत्त्वदर्शन अद्भुत म्हणावं, असंच आहे. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘नवल तयाचा पदक्रम। पाहतां पारुषे कर्माकर्म। मग कर्म कर्ता क्रियाभ्रम। करी निभ्र्रम पदरजें।।२६०।। पहातां पाउलांचा माग। तुटती कर्माकर्माचे लाग। कर्माचें मुख्य माया अंग। तिचा विभाग उरों नेदी।। २६१।। गाईमागिल कृष्णपाउलें। पाहतां कर्म कर्तेनिसीं गेलें। अकर्म म्हणणें नाहीं उरलें। ऐसें कर्म केलें निष्कर्म।।२६२।।’’ या ओव्यांचा शब्दार्थ असा : ‘‘त्याचा पदक्रम म्हणजे पावलांचा क्रम पाहता कर्माकर्म लयाला जाते आणि मग कर्म, कर्ता आणि क्रिया हा भ्रम त्याच्या पदरजाने निभ्र्रम होऊन जातो. त्याच्या पावलाचे ठसे पाहिले की कर्माकर्माचे बंध तुटून जातात. कारण कर्माचं मुख्य अंग म्हणजे माया. तिचा अल्पांशसुद्धा राहू देत नाही. गाईच्या मागे उमटलेली कृष्णाची पावले पाहिली की कर्त्यांसह कर्म नाहीसे होते, अकर्म असे म्हणणेसुद्धा उरत नाही. याप्रमाणे कर्माचे निष्कर्म होऊन जातं.’’ नवल तयाचा पदक्रम! हा जो सद्गुरू आहे त्याचा पदक्रम म्हणजे त्याची जगण्याची रीती, त्याचा जीवन व्यवहार, इतकंच नव्हे, तर माझ्याही जीवनात त्याच्या बळावर घडणारं कर्तृत्व हे सारं नवल वाटावं असंच आहे.   त्यांचं पदरज धारण केलं, म्हणजेच त्यांच्या सांगण्यानुसार चालू लागलो, तर त्यानं काय होतं? तर, ‘‘मग कर्म कर्ता क्रियाभ्रम। करी निभ्र्रम पदरजें।।’’ म्हणजेच मी कर्ता आहे, मी कर्म करतो हा सारा क्रियाभ्रमच निभ्र्रम होऊन जातो. कर्तेपणाचा भ्रमच संपतो. कारण कर्म जरी माझ्याकडून होत असलं, तरी माझ्या क्षमतेबाहेर ते होत आहे, ही जाणीव स्पष्टपणे होऊ लागते. मग त्यांच्या चरणांवर केवळ लक्ष ठेवलं, म्हणजे ते ज्या मार्गानं चालतात त्या मार्गावर आणि ते जसं चालतात त्या चालण्यावर लक्ष ठेवलं, तर आपलीही चाल तशीच होऊ लागते आणि मग कर्माचे बंध तुटून पडतात! ‘‘पहातां पाउलांचा माग। तुटती कर्माकर्माचे लाग।’’ का? तर कर्मबंधाचं मुख्य कारण मायाच आहे आणि त्या मायेमुळे कर्तेपणाची भावना दृढ होत असते. कर्तेपण माझं नाही, ही जाणीव स्पष्टपणे होऊ लागल्यावर ती मायाच ओसरते आणि मग कर्मबंधनही निष्प्रभ होतं. हे कशानं शक्य आहे? तर ‘‘पहातां पाउलांचा माग।’’केवळ त्या चरणांकडे, त्यांच्या चालीकडे आणि ती चरणं ज्या शुद्ध रस्त्यांवर आहेत त्या रस्त्याकडे लक्ष मात्र पाहिजे!

Story img Loader