आपली अवतारसमाप्ती झाल्यानंतरही जनांना भवसागर तरून जाण्यासाठी श्रीकृष्णानं आपल्या कीर्तीची नौका मागे ठेवली, असं नाथ सांगतात! (स्वधामा गेलिया चक्रधरू। मागां तरावया संसारु। कृष्णकीर्ति सुगम तारूं। ठेवून श्रीधरु स्वयें गेला।। २६५।।) अवतार हा देहात अवतरित होतो आणि त्याला काळाचे सर्व नियम मग लागू होतात. त्यामुळे हा दिव्य देहदेखील अस्तंगत होणारा असतो. पण सामान्य जनांना भवसागरातून तरून जाण्यास साह्य़भूत होणं, हा अवताराचा मूळ हेतू अवतारसमाप्तीनंतरही कायम असतो. त्यासाठीच अवतारकार्यातील लीलाचरित्राची नौका तो मागे ठेवून जातो. दिव्य पुरुषाचं चरित्र हे त्याच्या स्मरणात विलीन करून टाकतं. त्याच्यावर भावभक्तीचे संस्कार करतं. ही नौका कल्पांतीदेखील बुडणारी नाही उलट अनेकानेक श्रद्धाळूंना तारणारी आहे. (नवल त्या तारुवाची स्थिती। बुडवूं नेणे कल्पांतीं। श्रवणें तरले नेणों किती। पुढेंही तरती श्रद्धाळू ।। २६६।। ) त्या नौकेचा नुसता स्पर्श होताच भवसागर आटून जातो आणि कोरडय़ा पावलांनी चालत तो पार केला जातो, असंही नाथ सांगतात. (श्रीकृष्णकीर्तीचें तारूं। घालितां आटे भवसागरू। तेथें कोरडय़ा पाउलीं उतारू। श्रवणार्थी नरु स्वयें लाहे।। २६७।।) आता हे वर्णनही मोठं गूढ आहे. हा भवसागर म्हणजे काय? तो दृश्यातला सागर आहे का हो? तर नाही. तो अदृश्य आहे आणि म्हणूनच अथांग आणि अमर्याद आहे! कारण हा देहभावनेचा अंत:करणातला सागर आहे! म्हणूनच तो ओलांडण्याची शक्ती देहभावानं जगणाऱ्या माणसाच्या आवाक्यात नाही. माणूस भौतिकातली अनेक संकटं सहज भोगेलंही, पण त्याच्या भावनेला तडा देणारी लहानशी गोष्टही त्याला सोसता येत नाही. इतकी त्याची देहभावना चिवट आणि खोलवर गेलेली आहे. पण या देहभावाच्या भवसागरात जेव्हा देवभावाची कृष्णकीर्तिची नौका प्रवेशते तेव्हा ही देहभावनाच हळूहळू विरू लागते. जोवर ‘मी’ आणि ‘माझे’ याच भावानं जीवन व्यतीत होत असतं तोवर या भवसागरात भावनांचा झंझावात सुरू असतो. अनंत विकारांच्या मगरींचा वावर सुरू असतो. वासनेच्या लाटा उसळत असतात. पण जेव्हा कृष्णकीर्तिची नौका या भवसागरावर विराजमान होते तेव्हा तिच्या स्पर्शानं  अज्ञानाचा निरास होऊ लागतो. मग हा भवसागरच ओसरू लागतो. त्यावरून कोरडय़ा पावलांनी सहज चालत जाता येतं. मग नाथ सांगतात, ‘‘जे कृष्णकीर्ति करिती पठण। त्यांच्या संसारासि पडे शून्य। कीर्तिवंत ते अतिपावन। त्यांतें सुरगण वंदिती।। २६८।। आदरें पढतां श्रीकृष्णकीर्ति। पायां लागती चारी मुक्ति। त्यांचेनि पावन त्रिजगती। परमनिर्वृत्ति हरिनामें।। २६९।।’’   श्रीकृष्णाच्या या लीलाचरित्राचं जे पठण करतात त्यांच्या अंत:करणातील प्रपंचभय शून्यवत होऊन जातं. मग त्यांना साक्षात देवीदेवताही वंदन करतात. ते कीर्तिवंत आणि अतिपवित्र होऊ लागतात. अहो, या श्रीकृष्णाची कीर्ति गाणारं चरित्र जो आदरानं आत्मसात करतो त्याच्या पायी चारही मुक्ती लोळण घेतात. मग त्यांच्या संपर्कात येणारे उच्च, मध्यम आणि नीच असे तिन्ही लोकांचे अंत:करण पावन होऊ लागते. हरि म्हणजे सर्वदु:खाचं हरण करणाऱ्या सद्गुरूस्मरणानं ते परम निर्वृत्त होतात!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com