या कृष्णाची कीर्ती गाणारं त्याचं नाम हे कानांद्वारे अंत:करणात पोहोचण्याचा अवकाश, की आतील अज्ञानाचा अंधार एकदम गजबजून बाहेर निघून जातो! नाथ सांगतात, ‘‘श्रीकृष्णकीर्तिनामाक्षरें। रिघतांचि श्रवणद्वारें। भीतरील तम एकसरें। निघे बाहेरें गजबजोनि।।२७०।।’’ या कृष्णकथेचा गजर होऊ लागताच अंधाराला कुठे आश्रयच मिळत नाही. मग तो त्या परम दिव्य लीलाचरित्राने दिपून जाऊन सपरिवार निमून जातो. इतका या कृष्णकीर्तीमध्ये परमानंद अंतर्भूत आहे. नाथ सांगतात, ‘‘तंव कृष्णकीर्तिकथागजरीं। तमासि ठावो नुरेचि बाहेरी। धाकेंचि निमे सपरिवारीं। कृष्णकीर्तिमाझारीं परमानंदु।। २७१।।’’ आता अंधार अर्थात अज्ञानाचा ‘परिवार’ कोणता? तर मोह, भ्रम, आसक्ती, द्वेष, मत्सर हा सगळा अज्ञानाचा परिवार आहे. अज्ञानातूनच त्यांचा जन्म आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपोआप नष्ट होतात. ‘मी’च्या कर्तेपणाच्या भावनेतून आपल्याच तुच्छ कर्तृत्वाचा डिंडिम वाजविण्याची असोशी होती, पण कृष्णमयतेचा स्पर्श झाल्यानं कृष्णाच्या प्रतापांच्या स्मरणप्रकाशात जगणंच उजळून निघालं. मग अवघं जगच कृष्णमय भासू लागलं. तो कीर्तिमंत कृष्ण प्रत्यक्ष त्याच्या सहवासात जे आत्मसुख देत होता, तेच सुख त्याची ही कीर्तीही देऊ लागली! म्हणजेच त्याच्या लीलाचरित्राच्या श्रवण आणि पठणानंही तेच आत्मसुख गवसून तृप्ती लाभली. नाथ सांगतात, ‘‘कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशें। संसार कृष्णमय दिसे। कीर्ति कीर्तिमंताऐसें। दे अनायासे निजसुख।। २७२।।’’  हा कृष्ण कसा आहे? त्याचं नुसतं दर्शन घेतलं की नेत्रांना दुसऱ्या विषयाच्या दर्शनाची ओढ उरत नाही. पण हे त्याचं दर्शन अगदी खरं मात्र पाहिजे आणि खरेपणानं घेतलं मात्र पाहिजे. म्हणजेच आपण रस्त्याकडे पाहतो तेव्हा रस्त्यावरच्या अनेक गोष्टी दिसत असूनही आपल्याला जे पाहायचं आहे तेवढंच पाहात असतो नाही का? अगदी या क्षणाचं उदाहरण घ्या. तुम्ही आता हे सदर वाचत म्हणजे पाहात आहात, पण आता तुम्हाला जाणवेल की, तुम्हाला वर्तमानपत्र धरणारा तुमचा हात, वर्तमानपत्राखालील जमीन, आजूबाजूच्या काही गोष्टी यादेखील दिसत आहेत, पण त्या तुम्ही पाहात नव्हता! म्हणजेच सर्व काही दिसत असताना एकाच गोष्टीवर एकाग्र होऊन ती पाहणं माणसाला साधतं. तसंच या जगात वावरत असताना केवळ कृष्णबोधाचंच स्मरण, कृष्णलीलेचं चिंतन-मनन घडत गेलं तर केवळ कृष्णबोधाचाच प्रत्यय जीवनातील प्रत्येक प्रसंगात येऊ लागेल. हे खरं कृष्णदर्शन! असं दर्शन होऊ लागेल तेव्हा इतर काही पाहणंच थांबेल.. नाथ सांगतात, ‘‘जो देखिलिया देखणें सरे। जो चाखिलिया चाखणें पुरे। जो ऐकेलिया ऐकणें वोसरे। जो चिंतितां नुरे चित्तवृत्ति।। २७३।।’’ त्या कृष्णकथेची गोडी ज्यानं चाखली त्याला अन्य रसांत काहीच गोडी उरणार नाही. एकदा त्याची कथा कानी पडली, की इतर काहीच ऐकावंसं वाटणार नाही. त्याचं चिंतन सुरू झालं, की मग चित्तवृत्तीतील अस्थिरताच ओसरून जाईल. अहो, त्या कृष्णाची क्षणोक्षणी आंतरिक भेट होऊ लागली, तर मग ती भेट कधी खंडित होणारच नाही. त्याच्या एकरसात बुडून त्याच्याचविषयी ऐकणं, बोलणं, पाहणं सुरू झालं, की मग परमार्थाचीच मिठी पडेल! नाथ सांगतात,  ‘‘ज्यासि झालिया भेटी। भेटीसी न पडे तुटी। ज्यासि बोलतां गोठी। पडे मिठी परमार्थी।।२७४।।’’

– चैतन्य प्रेम

Story img Loader