वसुदेवानं नारदांना भागवतधर्म विचारला आणि नारद भावविभोर झाले. जे तिन्ही त्रिकाळ सर्वत्र संचार करीत असतानाही अखंड भगवंताच्या नामघोषातच तल्लीन असत त्या नारदांची आंतरिक भावस्थिती कुणाला कशी कळावी? त्या नारदांना जेव्हा आपल्याच स्थितीची ओढ असलेला कुणी क्वचित आढळलाच तर परमानंदाचं भरतं येत असे. आज वासुदेवानं जणू त्यांची अंतरंगातली भक्तीतारच छेडली होती. इतकंच नव्हे, तर नारदांची ती स्थिती सांगताना शुकदेवही भावविभोर झाले होते. शुद्ध भागवतधर्म कोणता ते मला सांगा, हा वसुदेवांचा प्रश्न ऐकून त्या प्रश्नाच्या उत्तरांच्या ज्या लाटा नारदांच्या मनात उचंबळू लागल्या त्या लाटांमध्ये साक्षात भगवंतच प्रकट होऊ लागले. त्यामुळे चित्ताला सुख देणाऱ्या त्या दर्शनात बुडून गेलेल्या नारदांचे अष्टसात्त्विक भाव जागृत झाले. नारद काय म्हणाले आणि त्याक्षणी त्यांची भावस्थिती कशी झाली?  नाथ सांगतात, ‘‘परिसतां हा तुझा प्रश्न। चित्सुखें प्रगटे नारायण। ऐसें बोलतां नारद जाण। स्वानंदें पूर्ण वोसंडला।। १०६।। रोमांच उचलले अंगीं। स्वेद दाटला सर्वागीं। आनंदाश्रु चालिले वेगीं। स्वानंदरंगीं डुल्लतु।। १०७।।’’ स्वानंदरंगात डुलत नारद उद्गारले, ‘‘नारद म्हणे सात्वतश्रेष्ठा। वसुदेवा परमार्थनिष्ठा। धन्य धन्य तुझी उत्कंठा। तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी।। ११०।। ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें। हें विश्व अवघेंचि उद्धरे। हें विचारिले तुवां बरें। निजनिर्धारें श्रीकृष्णजनका।। १११।। तुझेनि प्रश्नोत्तरें जाण। साधक निस्तरती संपूर्ण। साधकांचें नवल कोण। महापापी पावन येणें होती ।। ११२।।’’ नारद म्हणाले, ‘‘हे यादवश्रेष्ठा परमार्थनिष्ठ वसुदेवा, तुझ्या या उत्कंठेनं मला धन्य वाटतं. भागवतधर्म हा माणसाला व्यापक करणारा, त्याच्या मूळ आत्मध्येयाकडे वळवणारा आहे. तो धर्म जाणून घेण्याविषयीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं म्हणूनच आंतरिक जागृती साधणारी आहेत. या संवादानं अवघ्या विश्वाचाच उद्धार होणार आहे. तुझ्या या प्रश्नोत्तरानं महापापीदेखील पावन होतील, मग साधक उद्धरून जातील, यात काय आश्चर्य!’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मग नारद या भागवत धर्मानं कोणाकोणाचा कसाकसा उद्धार होतो, तेही सांगतात. कुणी हा धर्म नुसता ऐकून उद्धरतो, कुणी त्याच्या पठणानं उद्धरतो तर कुणी त्याच्या ध्यानात रमून उद्धरतो. (भागवतधर्माचेनि गुणें। एक उद्धरती श्रवणें। एक तरती पठणें। एक निस्तरती ध्यानें संसारपाश।। ११३।। ). इतकंच नव्हे, तर या धर्माच्या चर्चेत रंगलेला वक्ता आणि श्रोते यांना पाहूनदेखील काहींच्या मनात भावजागृती होते. त्यांनाही आनंदाचं भरतं येतं. ज्यांच्या मनातला शुद्ध भाव जागा होतो आणि जे या संवादाचं गुणगान गातात, ते शुद्ध मनाचे लोकही उद्धरून जातात. (एक श्रोतयां वक्तयांतें। देखोनि सुखावती निजचित्तें। सद्भावें भलें म्हणती त्यांतें। तेही तरती येथें भागवतधर्मे।। ११४।।). इतकंच नव्हे, तर, ‘‘हें नवल नव्हे भागवतधर्मा। जो कां देवद्रोही दुरात्मा। अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा। तोही तरे हा महिमा भागवतधर्मी।। ११५।।’’ जे देवद्रोही असतात म्हणजेच जे आत्मकल्याणासाठी भगवंतानं दिलेला मनुष्यजन्माचा खरा लाभ उपेक्षून स्वत:च स्वत:चा घात करत असतात ते आणि विश्वद्रोही म्हणजे ज्या विश्वात आपण वावरतो त्या विश्वाच्या कल्याणाच्या मार्गात जे खोडा घालत असतात तेही या भागवतधर्माच्या आचरणपंथाला लागले, तर तरून जातात.

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmatayog