चैतन्य प्रेम
भागवतधर्माच्या आचरणामुळे देवद्रोही आणि विश्वद्रोहीही तरून जातात! ही एक फार वेगळीच संकल्पना नाथांनी मांडली आहे. त्या काळी भारतवर्ष हे अनेक संस्थानांत नांदत होते आणि राजाशी एकनिष्ठ प्रजा जशी होती, तसाच ‘राजाशी द्रोह’ही कुठे ना कुठे घडत होता. पण मुद्दा तो नाही. एखाद्या धर्माच्या आचरणामुळे माणूस सुधारतो का, हा कळीचा प्रश्न आहे. उलट कट्टर धार्मिक माणूस हळूहळू धर्माधही होण्याचा धोका असतो आणि त्यातून धर्म खरं काय सांगतो, याचंही भान हरपू शकतं. त्यामुळेच धर्माची लिखित तत्त्वं, अनेक धर्मग्रंथ उच्च विचार मांडत असतात आणि त्याच धर्मात जन्मलेली माणसं खुज्या कल्पनांतच अडकून असतात. त्यातूनच अधार्मिकता फोफावत जाते. पण या सर्वाचं मूळ कारण धर्म नाही, तर धर्माचं विपरीत आकलन हेच आहे. माणूस आधी जन्मला आणि मग मानवी जीवनाचा प्रवाह योग्य दिशेनं आणि योग्य मार्गानं वाहाता राहावा, यासाठी शाश्वत तत्त्वांची धारणा बिंबवणारा धर्म जन्माला आला. ‘भागवतधर्म’ या शब्दयोजनेतून काही वेगळा कुठला धर्म अभिप्रेत नाही. तसंच ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला, तो भागवतधर्म आणि एकादश स्कंधात नारदांच्या मुखातून प्रकट होत असलेला भागवतधर्म यात काही भेद नाही. भगवंताच्या म्हणजेच शाश्वत व्यापक तत्त्वाच्या धारणेत जो स्थापित करतो तोच भागवतधर्म आहे. मग तो धर्म कोणत्याही नावानं ओळखला का जात असेना! धर्माच्या मूळ हेतूकडे माणूस जेव्हा प्रामाणिकपणे वळू लागतो तसतसा तो चिंतनशील होत जातो, अंतर्मुख होत जातो. मग त्याची सुरुवात कोणत्याही धर्मापासून का झाली असेना. शुद्ध शाश्वत व्यापक धारणा हा जर धर्माचा पाया असेल, तर ज्यायोगे ती धारणा निर्माण होते तो कोणताही धर्म हाच त्या माणसाच्या आत्मिक विकासाचा खरा आधार होतो. मग तो माणूस प्रथम देवद्रोही का असेना! म्हणजेच आपल्याच आत्मकल्याणाच्या मार्गात खोडा घालून आत्मघात करणारा का असेना. तोही जर भानावर आला तर त्याचं अनवधानानं जगणं थांबतं. अवधानानं तो जगू लागतो. मग ज्याच्या मनातला देवद्रोह अर्थात आत्मद्रोह नष्ट होतो तो विश्वाकडेही त्याच देवाची लीला म्हणून पाहू लागतो. त्या विश्वाचा घात होईल, असं कृत्य त्याच्या हातून होऊ शकत नाही. उलट ज्या विश्वात आपण राहातो त्या विश्वाच्या व्यवस्थेत आपल्या वाटय़ाला जे कार्य आलं आहे ते तो देवाची सेवा म्हणूनच करू लागतो! त्यामुळेच नारद सांगतात, ‘‘हें नवल नव्हे भागवतधर्मा। जो कां देवद्रोही दुरात्मा। अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा। तोही तरे हा महिमा भागवतधर्मी।। ११५।।’’ याचं कारण काय? तर नारद सांगतात की जो हा भागवतधर्म हृदयात धारण करतो, ज्याच्या अंतरंगात हा भागवतधर्म शिरतो त्याच्या अंत:करणातच पूर्णपणे पालट होतो! ‘‘जेथ रिघाले भागवतधर्म। तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म। निंदा द्वेष क्रोध अधर्म। अविद्येचें नाम उरों नेदी।। ११७।।’’ ज्याच्या अंत:करणात या भागवतधर्माचा ठसा उमटतो त्याच्या अंत:करणातून काय करावं, काय करू नये याचाही गोंधळ संपतो. निंदा, द्वेष, क्रोध, अधर्म अर्थात चुकीचे मनोधर्म आणि अविद्या अर्थात अज्ञान पूर्णपणे ओसरून जातं. धर्माच्या नावावरचे मतभेदही तर निंदा, द्वेष, क्रोध, चुकीच्या मानसिक धारणा आणि अज्ञान यामुळेच वाढत असतात आणि धार्मिकतेच्या नावावर अधर्माचरणच कमालीचं वाढवत असतात.