विषयसुखाला ज्यानं जन्मापासून अग्रक्रम दिला आहे तो विषयसुखात अडचणी आल्यावरच जागा होऊन त्या अडचणी दूर करण्याचा उपाय म्हणून भक्तीच्या मार्गाकडे वळत असतो. पण ही प्रारंभिक वाटचाल सकाम असते. अर्थात आपल्या अडचणी दूर होत आहेत की नाही, याकडे अधिक लक्ष ठेवणारी असते. त्यात भक्तीसाठीची खरी अनन्यता, तळमळ, कळकळ बहुतांश नसतेच. त्यामुळे या प्रारंभिक वाटचालीत आपण भौतिक कसं मिथ्या आहे, विषयकल्पना कशा घातक आहेत, त्यापासून मुक्त होणं कसं आवश्यक आहे, यावर बरंच काही वाचतो, ऐकतो; पण आपला त्याला ठाम दुजोरा नसतोच किंवा आपली कृती त्या बोधाशी सुसंगत अशी नसतेच. त्यातून ‘भक्ती’ किंवा ‘साधने’चा दिखाऊ पसारा वाढवण्याचीही आवड असली, तर दिसायला खूप साधना सुरू असते, पण त्या साधनेनं अंतरंगात किंचितही पालट घडत नसतो. पण तरीही संत कळकळीनं आपल्याला या मार्गाचं मोल मनाशी निश्चित करायला सांगतात. आपल्या जगण्याकडे जागेपणानं आणि जाणतेपणानं लक्ष द्यायला सांगतात. अखंड सुख मिळावं, यासाठी आपण आजवर किती धडपड केली, पण ते सुख हाती लागलं का? ते जर लागलं नसेल, तर मग निदान आपल्या प्रयत्नांचा पुन्हा विचार करायला हवा, असं ते सुचवतात. जनक राजाच्या निमित्तानं नवनारायणांतील कविदेखील साधकांनाच हा बोध करीत आहे की, इंद्रियांचं दमन करून वैषयिक ओढींचं दमन होत नाही. ते एखाद्या योग्यालाच साधू शकतं. पण आपण काही योगी नाही. योग्याच्या चित्ताचं, मन-बुद्धीचं जे समत्व आहे ते काही आपल्यात नाही. मग बळानं इंद्रियांचं दमन करून काय उपयोग? तेव्हा तसं न करता तेच विषय भक्तीकडे वळवणं चांगलं, असं कविचं सांगणं आहे. तो म्हणतो, ‘‘इंद्रियें कोंडावीं न लगती। सहजें राहे विषयासक्ती। एवढें सामथ्र्य हरिभक्तीं। जाण निश्चितीं नृपवर्या।।२९५।।’’ हे राजा, या भक्तीमध्ये इंद्रियं कोंडावी लागत नाहीत आणि विषयासक्तीही आपोआप थांबते एवढं अद्भुत सामथ्र्य या हरीभक्तीत आहे, असं कवि सांगतो. योगी इंद्रियांचं दमन करतो आणि विषयांचा त्याग करतो, तेच विषय भक्त हा हरीभक्तीकडे वळवतो आणि त्या इंद्रियांचा वापरही त्या भक्तीसाठीच करतो, असं कवि सांगतो. आणि हे सारं करीत असताना प्रपंच सोडायला नको, प्रपंचानुसार यथाप्रमाण असलेले विषयभोगही सोडायला नकोत, केवळ जे काही कर्म आपण करीत आहोत त्यात ईश्वराचं स्मरण तेवढं ठेवायचं आहे. यात विकल्प आणू नका, हे नमूद करीत कवि सांगतो, ‘‘हें नव्हे म्हणती विकल्पक। याचिलागीं येथें देख। ‘कायेन वाचा’ हा श्लोक। अर्पणद्योतक बोलिजेला।।२९८।।’’ म्हणजे विकल्पी लोक हे कसं शक्य आहे, असं विचारतील, तर त्यांना ‘कायेन वाचा मनसेंद्रिर्यैवा। बुद्धय़ात्मना वा प्रकृतिस्वभावात। करोमि यद्यत्सकलं परस्मै। नारायणायेति समर्पयामि।।’ हा श्लोक आहे. आपणही हा श्लोक कितीवेळा वाचलाय, म्हटलाय! काया, वाचा आणि मन, इंद्रियांनी मी जे जे काही करीन ते नारायणाला समर्पित असो! हा त्याचा आशय आपण अनेकदा उच्चारातूनं व्यक्त केलाय, पण तशी वृत्ती झाली का? ती वृत्ती घडवणं हे भक्तीमार्गाचं कार्य आहे आणि म्हणूनच कविच्या निमित्तानं तो वृत्ती घडविण्याचा अभ्यास सांगितला जात आहे.
– चैतन्य प्रेम