– चैतन्य प्रेम
जीवाला जर माझ्याशी एकरूप व्हायचं असेल म्हणजेच मद्रूप व्हायचं असेल, तर ध्यान हा एकमेव मार्ग आहे, असं भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात. हे ध्यान मात्र अगदी पक्कं हवं! माणसाची अपरंपार क्षमता खरं तर अशी आहे की तो ज्या गोष्टीचं पक्कं ध्यान करतो त्या गोष्टीशी तो तद्रूप होतो. आता हे ‘पक्कं’ ध्यान म्हणजे कसं, हे स्पष्ट करीत प्रभू सांगतात की, ‘‘काया वाचा आणि मन। पुरूषें एकाग्र करून। जे जे वस्तूचें करी ध्यान। तद्रूप जाण तो होय।।२३६।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय नववा). माणसाच्या सर्व शारीरिक आणि मानसिक क्रिया ज्या गोष्टीच्या स्मरणात पार पडत असतील, मुखातून व्यावहारिक बोलणं सुरू असतानाही त्याची वाणी ज्या गोष्टीच्या स्मरणानं स्पर्शित असेल, त्याच्या आचार, उच्चार आणि विचाराचा आंतरिक अनुबंध ज्या गोष्टीशी जोडलेला असेल त्याच गोष्टीशी माणूस तद्रूप होतो! हेच पक्कं ध्यान. पुढे भगवंत जणू मानसशास्त्रच सांगतात की, ‘‘स्नेहें द्वेषें अथवा भयें। दृढ ध्यान जेणें होय। तेणेंचि तद्रूपता लाहे। उभवूनि बाहे सांगतु।।२३७।।’’ म्हणजे हे ‘ध्यान‘ प्रेमानं होवो, द्वेषानं होवो की भीतीनं होवो! जी गोष्ट माणसाच्या काया, वाचा, मनाचा ठाव घेते, या तिन्ही गोष्टीना व्यापून टाकते त्याच गोष्टीशी तो एकरूप होतो! एखाद्या गोष्टीचं पराकोटीचं प्रेम त्याला प्रेमविषयात बुडवून टाकतं. जशी कृष्णमय झालेली राधा वा मीरा. एखाद्या गोष्टीचा पराकोटीचा द्वेषही त्या द्वेषविषयाचं अहोरात्र ध्यान घडवतो, जसा राममय झालेला रावण वा कृष्णमय झालेला कंस! आणि एखाद्या गोष्टीचं पराकोटीचं भय माणसाचं जीवन भयानं कसं व्यापून टाकतं, याचा दाखला आपल्या जीवनात तसंच अवतीभवती आपण घेतलाच असेल. मग कोणत्याही कारणानं का होईना परम तत्त्वाच्या ध्यानात निमग्न झालो, तर परम लाभच होईल ना? चुकून का होईना, पण अमृतानं भरलेल्या विहिरीत पडलो तरी लाभच होईल ना? मग ध्यान करायचंच असेल, तर ते श्रेष्ठ गोष्टीचं का करू नये? कारण संकुचितानं परम व्यापकाचं ध्यान केलं, तरी तो परम व्यापकच होतो. मग ही संधी का साधू नये? या मुद्दय़ाच्या मांडणीत भगवान भिंगुरटीचं म्हणजे कुंभारीण माशीचं रूपक योजतात. ते सांगतात की ही भिंगुरटी एक अळी धरून आणते आणि तिला भिंतीशी बांधलेल्या घरटय़ात डांबते. मग ती अळी मरणभयानं पछाडून त्या भिंगुरटीचं इतकं तीव्र ध्यान करते की ती स्वत:च भिंगुरटी होऊन जाते! (तेणें तीव्रध्यानें ती कीटी। होऊनि ठाके भिंगुरटी।). मग जर भिंगुरटीच्या तीव्र ध्यानानं अळीची भिंगुरटी होते, तर माझाचं अंश असलेला जीव माझ्या ध्यानानं मीच का होणार नाही, असा प्रश्न भगवंत करतात! ते म्हणतात, ‘‘भगवद् ध्यान नव्हे तैसें। ध्याता भगवद्रूपचि असे। ध्यानें भ्रममात्र नासे। अनायासे तद्रूप।।२४४।।’’ माझं ध्यान करणारा खरे तर माझ्याशी एकरूप असतोच, पण केवळ भ्रमानं स्वत:ला वेगळा मानत असतो. ध्यानानं तो भ्रम नाहीसा होतो आणि तद्रूपता अनायासे कायम होते! आता आपल्या मनात येईल ‘नामलौकिक’ सुरू असताना एकदम हा ‘ध्यानलौकिक’ कुठून आला? तर हा ध्यानलौकिक खरंतर नामलौकिकच उच्चरवानं गाणारा आहे!