– चैतन्य प्रेम
विषयमोहात फसून माणूस मरणाला कवटाळून आत्मघात करून घेतो, हे कपोत पक्ष्याच्या उदाहरणावरून अवधूत शिकला. त्यामुळे कपोत हा त्याचा आठवा गुरू ठरला. हे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवत अवधूत म्हणतो की, ‘‘नरदेहाऐसें निधान। अनायासें लाधलें जाण। सांडीं सांडीं अभिमान। तेणें समाधान पावसी॥६४४॥’’ (एकनाथी भागवत, अध्याय सातवा). नरदेहासारखा मोठा ठेवा अनायासे लाभला असताना आता त्याचा खरा लाभ का घेत नाहीस? आता समस्त अहंभाव सोड. त्यायोगेच खरं समाधान लाभेल. या जन्मी साधलं नाही, तर पुढच्या जन्मी नक्कीच साधून घेऊ, या भ्रमातही कुणी राहू नका! कारण अवधूत म्हणतो, ‘‘पुढती नरदेहाची प्राप्ती। होईल येथ नाहीं युक्ति। यालागीं सांडूनि विषयासक्ती। भावें श्रीपति भजावा॥६४५॥’’ पुढचा जन्म माणसाचाच मिळेल, याचा काही भरवसा नाही. समजा तो मिळालाच तरी त्या जन्मी साधनेकडे मन वळेल, याचाही काही भरवसा नाही. बरं पुण्यकर्मांनी स्वर्ग जरी लाभला तरी तिथंही विषयसुखाचा सापळा आहेच! उकिरडय़ावरचं डुक्कर असो की स्वर्गातला इंद्र; दोघांच्या अनुभवकक्षेत येणारं आणि दोघांना गुंतवणारं विषयसुख सारखंच आहे. त्या विषयगोडीत आणि प्रभावात कोणताही फरक नाही, हे स्पष्टपणे मांडत अवधूत म्हणतो, ‘‘भोगितां उर्वशीसी। जें सुख स्वर्गी इंद्रासी। तेंचि विष्ठेमाजीं सूकरासी। सूकरीपासीं निश्चित।।१८।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). तेव्हा जे साधायचं आहे ते याच जन्मी, याच मनुष्य देहात साधून घेतलं पाहिजे. पुढे अवधूताच्या निमित्तानं नाथ नामसाधनेची थोरवी, सदगुरूंची मातब्बरी मांडतात. ते म्हणतात, ‘‘कलियुगीं सुगम साधन। न लगे योग याग त्याग दान। करितां निर्लज्ज हरिकीर्तन। चारी मुक्ति चरण वंदिती॥ ६४६॥’’ (अध्याय सातवा). कलियुगात योग, याग, त्याग, दान यापेक्षा सहज सोपं साधन आहे ते म्हणजे लोकलाज सोडून हरिकिर्तनात दंग व्हावं! आता याचा अर्थ योग, त्थाग, दानाला कमी लेखलं आहे, असा नव्हे. पण कलियुगाचा प्रभावच असा आहे की माणसाचं मन, चित्त, बुद्धी पटकन अशुद्ध होऊ शकते. त्थामुळे खरा शुद्ध योग, खरा त्याग, खरं दान न घडता ढोंग आणि दिखाऊपणाला वाव मिळू शकतो. खरा योग सदगुरू बोधाचा संग, खरा यज्ञ म्हणजे त्या संगातून अहंभाव स्वाहा करणं. खरा त्याग हा ‘मी’/‘माझे’ या द्वैतपसाऱ्याचा त्याग आहे आणि खरं दान म्हणजे कर्तृत्वभावाचंच दान आहे. हे साधत नसेल तर ‘लोक काय म्हणतील,’ ही लाज सोडून अर्थात जगाचं दडपण, जगाची लाचारयुक्त ओढ सोडून स्वत:ला सद्गुरू चिंतन, स्मरणात लीन करणं आणि त्यांच्या बोधानुरूप कर्तव्यकर्मरत राहणं, हाच एकमेव उपाय आहे. तसं झाल्यास सद्गुरू शिष्याला एकरूप करून टाकतात. मग सोनं नि सोन्याचा अलंकार इतपतच दोघांमध्ये दृश्यात्मक फरक उरतो. (एका जनार्दना शरण। तंव जनार्दनु जाला एक एकपण। जैसें सुवर्ण आणि कंकण। दों नांवीं जाण एक तें॥६४९॥). हे भान कपोतामुळे लाभल्यानं तो गुरू ठरला आहे. आता नवव्या गुरूची माहिती अवधूत सांगू लागतो. हा गुरू आहे ‘अजगर’!