– चैतन्य प्रेम
माणसाची सगळी धडपड सुखासाठी असते. या सर्व सुखांमध्ये कामसुख माणसाला अधिक भावतं. याचं खरं कारण कामविषयात समस्त इंद्रियं गोळा होऊन, तल्लीन होऊन मन त्या क्षणापुरतं तरी चिंतेच्या ओझ्यातून मुक्त होतं. माणसाला खरी ओढ या एकाग्र स्थितीत अनुभवास येणाऱ्या शांती-तृप्तीची आहे. त्यामुळे वारंवार सहजप्राप्य भासणाऱ्या कामसुखात माणूस अधिक गुंतून जातो. स्वर्ग असो की उकिरडा, हे कामसुख दोन्हीकडे सारखंच गुंतवणारं आहे. मग हा गुंतणारा पशू असो की देवांचा राजा इंद्र, असं मोठं बेधडक विधान अवधूतानं केलं आहे. म्हणून साधूजन या विषयात मन अडकूच देत नाहीत, असंही अवधूत म्हणतो. आता सगळं जग काही साधूंनी भरलेलं नाही. या जगात विकारशरण माणसांची संख्याही साहजिकच जास्त आहे. त्यांना काही विषयसुखाला झिडकारणं साधणारं नाही. मग याला उपाय काय? तर विवाह बंधन स्वीकारून कामभावनेला वाट देत साधनामार्गावर एक एक पाऊल टाकणं, हेच बहुतांश जनांसाठी आदर्श आहे. आता विवाहाला ‘बंधन’ हा शब्द जोडला आहे, तो विवाहाला कमी लेखण्यासाठी नव्हे. बंधन म्हणजे मर्यादा! श्री गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे ना? की, घराला दारं, खिडक्या, झरोके असतात. पण जर झरोक्यांना आणि खिडक्यांना वाटलं की, आम्हीच का लहान राहायचं? आम्हीही दरवाजाइतके मोठं का होऊ नये? तर ते बरोबर होईल का? खिडक्या, दारं, झरोके आपापल्या आकाराच्या मर्यादेतच चांगल्या भासतात आणि उपयुक्तही ठरतात. तर माणसालाही काळवेळ, परिस्थिती, वय आणि जबाबदाऱ्यांची मर्यादा सांभाळावीच लागते. प्रपंच आणि विवाह हे बंधनात राहून आत्मिक विकास साधण्याचा पाठ शिकवतात आणि म्हणून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी चांगला आहे. पण तरीही एक पेच उरतोच. तो असा की, इंद्रियविषयांचं सुख मर्यादशील राहून उपभोगलं तरी ते माणसातली अतृप्ती आणि हाव वाढवत नेऊ शकतं. मग त्या खोडय़ात अडकल्यावर अन्य कशाचंही भान उरत नाही किंवा इतर गोष्टींचं महत्त्व कमी लेखलं जातं. तारुण्यात ते सहज भासतं, पण वय वाढत गेलं की त्या विषयप्रभावातून बाहेर पडण्याची मनाची शक्ती कमी होते. तेव्हा केवळ देह वा कामसुखच नव्हे, तर जीवनातल्या समस्त सुख-दु:खाकडे, ते सुख मिळवण्यासाठी आणि दु:ख टाळण्यासाठी आपली जी तगमग सुरू असते, त्या तगमगीकडे, धडपडीनंतरही न गवसणाऱ्या सुखाकडे आणि न टळणाऱ्या दु:खाकडे आपण तटस्थपणे पाहिलं पाहिजे. हे सुख-दु:ख कसं आहे? अवधूत यदु राजाला सांगतो की, ‘‘जैसें न प्रार्थितां दु:ख। प्राणी पावताति देख। तैसें न इच्छितां इंद्रियसुख। भोगवी आवश्यक अदृष्ट।।२१।। मज दु:खभोगु व्हावा। हें नावडे कोणाच्या जीवा। तें दु:ख आणी अदृष्ट तेव्हां। तेवीं सुखाचा यावा अदृष्टें।।२२।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, दु:ख वाटय़ाला यावं यासाठी कोणी भगवंताची विनवणी करीत नाही, तरी दु:ख येतंच. त्याप्रमाणे इंद्रियसुखाची इच्छा केली नाही तरी अदृष्टातून- अर्थात प्रारब्धानं योजलेलं सुख वाटय़ाला येतंच. दु:ख कोणाला आवडतं का? दु:खप्राप्तीसाठी कुणी तळमळतं का? झुरतं का? तरीही अदृष्ट म्हणजे प्रारब्ध माणसाच्या पदरात दु:ख टाकतंच. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही मागा वा न मागा, सुखाचं मापही असंच तुमच्या प्रारब्धानं तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही!