– चैतन्य प्रेम
आपण न मागता दु:ख वाटय़ाला येतं. ते टाळण्याची कितीही धडपड केली तरी दु:ख कायमचं टळत नाही. एखादा दुखभोग संपल्यावर, आता यापुढे जीवनात दु:ख कधीच भोगावं लागणार नाही, अशी छातीठोक ग्वाही कुणी देऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे सुखदेखील अवचित वाटय़ाला येतंच. थोडक्यात, जीवन हे सुख-दु:खाचं मिश्रण आहे. तरीही माणूस दु:ख टाळण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी नको इतकी धडपड करतो. याउलट त्यानं सुख आणि दु:ख या दोन्हीचा प्रभाव कमी करणाऱ्या परमार्थाकडेच लक्ष दिलं पाहिजे, असं अवधूत सांगतो. सुखाची आशाच मनात दु:खाचं बीज रोवत असते. कारण खरं सुखाचं काय, हेच नेमकेपणानं माहीत नसल्यानं अवास्तव सुखकल्पनांमागे धावत माणूस दु:खाचाच धनी होत असतो. म्हणून अवधूत यदू राजाला सांगतो की, अटळ दु:ख टळणार नाही आणि अटळ सुख मिळाल्यावाचून राहणार नाही, असं असताना, ‘‘ऐसें असोनि उद्योगु करितां। तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा। यालागीं सांडूनि विषयआस्था। परमार्था भजावें।।२३।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे सुखप्राप्तीच्या आणि दु:ख टाळण्याच्या धडपडीत जन्म निघून जातो. त्यापेक्षा खरा पुरुषार्थ हा परमार्थासाठीच केला पाहिजे. ‘भावार्थ रामायणा’च्या ‘बालकांडा’त श्रीएकनाथ महाराजांनी नरदेहाचा खरा लाभ परमार्थ हाच असल्याचं स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात, ‘‘नरदेहा ऐसें गोमटें। शोधितां त्रलोक्यीं न भेटे। आणि देहा ऐसें वोखटें। अत्यंत खोटें आन नाहीं।।६६।।’’ नरदेहाइतकी सुंदर आणि हितकर गोष्ट तिन्हीं लोकांत नाही आणि या देहाइतकी घातक आणि खोटी वस्तू जगात दुसरी नाही! का? तर हा देह परमार्थासाठी सर्व क्षमतांनिशी साह्य़ करू शकतो, पण तोच घातक आणि खोटा का? तर तो मिथ्या गोष्टींत गुंतवू शकतो. पण.. ‘‘वोखटें म्हणोनि त्यागावें। तरी मोक्षसुखा नागवावें। गोमटें म्हणोनि भोगावें। तैं अवश्य जावें अध:पाता।।६७।।’’ खोटा म्हणून देह त्यागावा, तर मोक्षसुख दुरावतं. चांगला म्हणून भोगावा, तर तो अध:पातही घडवू शकतो! मग काय करावं? तर, ‘‘हें भोगवे ना त्यागवे। निजपुरुषार्थ लाघवें। भगवन्मार्गी लावावें। तरीच पावावें परमसुख।।६८।।’’ म्हणजे हा देह त्यागूही नये की केवळ भोगांत गुंतवूही नये, तर निजपुरुषार्थ साधण्यासाठी तो भगवंताच्या मार्गाकडे वळवावा! त्या पुरुषार्थाची सुरुवात कुठून आहे? तर, ‘‘त्या पुरुषार्थाचें लक्षण। अशुभ वासना त्यागून। परमार्थी दृढ राखावें मन। हें मुख्य लक्षण परमार्थाचें।।६९।।’’ अशुभ वासना त्यागून मन परमार्थात दृढ राखावं! ‘श्रीरामगीते’त भगवान रामचंद्रांनी हनुमंताला सांगितल्यानुसार, माणसाचं मन एकतर अशुभ वासनेत लिप्त असतं, नाहीतर शुभ वासनेनं प्रेरित असतं. अशुभ वासनेपासून परावृत्त होताच मन शुभ वासनेकडेच वळतं आणि शुभ वासनेचं बोट सुटताच अशुभ वासनेकडेच घसरतं!
chaitanyprem@gmail.com