– चैतन्य प्रेम

आपण जगात जन्मलो आहोत, जन्मापासून या जगातच आपली शारीरिक, भावनिक आणि मानसिक जडणघडण सुरू आहे. या जगातच आपण सुख आणि दु:ख भोगत आलो आहोत. त्यामुळे सुख जर मिळायचं असेल, तर ते या जगातच मिळेल, सुखासाठी जगाचाच आधार अनिवार्य आहे, अशी आपली सहज स्वाभाविक धारणा आहे. साधनेच्या मार्गावर खरी वाटचाल सुरू झाली की खऱ्या सत्संगामुळे जगाचं खरं स्वरूप, जगाची मर्यादा जाणवू लागते. अर्थात सुख हे आंतरिक स्थितीवर अवलंबून आहे, बाह्य स्थितीवर नाही, हेदेखील पटू लागलं तरी तशी दृढ अनुभूती झालेली नसते. त्यामुळे साधनपथावरही मधेच जगाची ओढ उफाळून येऊ शकते. आता एक नीट लक्षात घ्या. जगाचा प्रभाव मनातून गेला पाहिजे, याचा अर्थ जग संपलं पाहिजे किंवा जग अंतरलं पाहिजे, असा नाही. जगाचा त्याग करून जंगलात जाणं, इथं अभिप्रेत नाही. या जगातच राहायचं आहे, जगातली कर्तव्यं पार पाडायची आहेत, सुख-दु:खाच्या प्रसंगांत जगरीतीप्रमाणे वर्तन ठेवायचं आहे, प्रेम, अनुकंपा, सदिच्छा आदी गुणांचा विकास जगातच साधायचा आहे, जगातील प्राणिमात्रांच्या प्रगतीत यथाशक्ती सहभागीदेखील व्हायचं आहे; पण हे सगळं करताना त्यात आसक्त न होण्याचा अत्यंत प्रामाणिक अभ्यासही करायचा आहे. लोकेषणेची परीक्षा लोकांमध्ये वावरतानाच होते तशी जगातील आसक्तीची परीक्षा जगात वावरतानाच होते. त्यामुळे जगातच आनंदानं राहात आंतरिक अवधान कसं टिकेल, हे साधकानं सांभाळलं पाहिजे. त्यासाठीच संत एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘सावधान अहोरात्र। चित्तें लक्षावें चिन्मात्र। हेंचि परमार्थाचें सूत्र। अति पवित्र निजनिष्ठा।।’’ (‘भावार्थ रामायण’). कोणत्याही क्षणी साधकानं गाफील न राहाता, आपल्या आंतरिक स्थितीचं सूक्ष्म अवलोकन न सोडता सद्गुरू बोधाचं अनुसंधान टिकवणं, हेच परमार्थाचं सूत्र आहे! असा परमार्थ हाच खरा पुरूषार्थ आहे. या पुरुषार्थासाठी आपल्याकडे साधन आहे ते मनच! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘मनें मना सावधान। मनें मना निर्दाळण। मनें मना अनुसंधान। या नांव पूर्ण पुरुषार्थ।।७८।।’’ (‘भावार्थ भागवत’, बालकांड). मनानंच मनाला सतत सावध करीत राहिलं पाहिजे, मन जर भ्रममोहाला भुलून आडवाटेला घसरत जाऊ लागलं, तर त्याला थोपवलं पाहिजे. आपल्या बहुतांश चुका या अनवधानामुळे, बेसावधपणामुळेच होतात. अवधान आलं, सावधपणा आला की वर्तनातील चुका टळू शकतील. त्यामुळे मनानंच मनाला सावध करीत राहिलं पाहिजे. मनात उत्पन्न होत असलेल्या भ्रामक गोष्टीचं निर्दालनही मनानंच केलं पाहिजे. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘ज्या गोष्टी मनानं निर्माण केल्या आहेत त्यांचा नाशही मनच करू शकतं!’ तेव्हा मनानंच निर्माण केलेल्या, मनानंच जपलेल्या आणि जोपासलेल्या भ्रम-मोहाचं निर्दालन मनच करू शकतं! तेव्हा अशा रीतीनं मन सावध झालं, मनाचं अवधान टिकू लागलं की पुढची पायरी येते अनुसंधानाची! अवधान म्हणजे मनातल्या अशाश्वत विचारतरंगांबाबत जागृत होणं आणि अनुसंधान म्हणजे शाश्वताच्याच विचारानुरूप तरंग मनात उमटू लागणं! तेव्हा मनानंच मनातलं अनुसंधान सतत जागं ठेवलं पाहिजे. मनातल्या भ्रमाचं निर्दालन आणि अनुसंधान साधलं तरच मग मनोरचनेत, मनोधारणेत बदल होऊ लागेल.

Story img Loader