– चैतन्य प्रेम

जोवर अवधान आणि अनुसंधान साधत नाही, तोवर खरा परमार्थ सुरू होत नाही. माझ्या दोषांचं अवधान येत नाही आणि शाश्वत जे आहे, सत्य जे आहे, परमहिताचं जे आहे त्याचं अनुसंधान साधत नाही, तोवर आचरण सुधारत नाही. विवेक आणि वैराग्य बाणत नाही. काय योग्य, हिताचं, स्वीकारार्ह आणि काय अयोग्य, अहितकर, त्याज्य; ते उमजणं म्हणजे विवेक. वैराग्य म्हणजे जे अयोग्य आहे, अहिताचं, त्याज्य आहे त्याबाबतची ओढ खुंटणं. नुसता विवेक आहे, पण वैराग्यच नाही, तर काही उपयोग नाही. म्हणजे काय योग्य, काय शाश्वत ते कळत आहे, पण त्यानुसार वर्तन घडत नाही, मनाला मिथ्या गोष्टींची, अशाश्वताची असलेली ओढ काही कमी होत नाही, तर काय उपयोग? एकनाथ महाराज ‘चतु:श्लोकी भागवत’ या लघुप्रकरण ग्रंथात म्हणतात की, ‘‘विवेकाविण वैराग्य आंधळे। वैराग्याविण विवेक पांगुळें।’’ (ओवी ७४, पूर्वार्ध). शेकडो वर्षांपूर्वीच्या ग्रंथातील काही रूपकं आज खटकू शकतात. कारण आज अपंगत्वाला उणीव मानलं जात नाही. वैद्यकीय प्रगती, आधुनिक उपचार, विकसित झालेली जीवन-व्यवहारपूरक साधने आणि समान हक्कांची वाढत चाललेली जाण; यामुळे अपंगत्वावर मात केली जात आहे. पण शेकडो वर्षांपूर्वीच्या, कोणतीही वैद्यकीय साधनं नसलेल्या आणि समाजात सहज वावरता येईल अशा साधनांची कल्पनाही कोणी केली नसलेल्या काळात अंध, मूकबधिर, अपंग माणसांच्या वाटय़ाला आलेल्या दु:खाची आज नीटशी कल्पनाच करता येणार नाही. त्या स्थितीतील दाहकता श्रोत्यांपर्यंत या रूपकांतून पोहोचत होती. तर नाथ म्हणतात की, विवेकाशिवाय वैराग्य आंधळं असतं आणि वैराग्याशिवायचा विवेक हा पांगळा असतो. म्हणजे काय? तर नुसतं वैराग्य आहे, पण विवेकच नसेल तर ते वैराग्य साधनेच्या पथावर टिकू शकत नाही! म्हणजे भावनेच्या भरात त्याग केला जातो, पण विवेकाअभावी त्या त्यागात सुख नसतं! मन वारंवार जे त्यागलं त्या अशाश्वताचीच ओढ लावत असतं. मग मोहाचा अंधार पसरून साधनेचा पंथ दिसेनासाच होतो! आणि आता विवेक आहे, पण वैराग्यच नाही; तर अशा साधकाचं मनही पांगळं ठरतं. म्हणजे काय? तर, काय योग्य आणि काय अयोग्य, हे पक्कं माहीत असतं, पण अयोग्य गोष्टींचा मोह सोडवत नाही. मग साधनापथावर चालण्याचं बळ उरत नाही. तेव्हा विवेक आणि वैराग्य असेल, अवधान आणि अनुसंधान असेल, तर आहे त्या परिस्थितीचा स्वीकार साधक करू शकतो. आता अशा अनासक्त, परमार्थरत साधकाचं जगणं कठीणच नव्हे, तर अशक्यही असेल, असं सर्वसामान्य माणसाला वाटू शकतं. अवधूतही यदुराजासमोर सर्वसामान्यांच्या मनातली हीच भीती मांडताना म्हणतो की, ‘‘केवळ झालिया परमार्थपर। म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर। येच निर्धारीं साचार। गुरू अजगर म्यां केला।।२४।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे केवळ परमार्थाकडेच माणसाचं लक्ष लागलं, तर त्याचा देहव्यवहार कसा चालणार? या प्रश्नाचं उत्तर मला, काही न करता आनंदात असलेल्या अजगराकडे पाहून उमजलं. म्हणून अजगर हा चोवीस गुरूंमधला माझा नववा गुरू झाला! आता आपल्याला वाटेल की, अजगराचं जिणं आणि स्वतंत्र भावक्षमता, विचारक्षमता लाभलेल्या माणसाचं जगणं, यांत काही फरक आहे की नाही? विशेषत: आजच्या अत्यंत प्रगत, पण अत्यंत अनिश्चित अशा काळात हा सल्ला मनावर आघातच करीत नाही का?

Story img Loader