– चैतन्य प्रेम
अध्यात्माच्या वाटेवर जसे साधनरत योगी वाटचाल करीत असतात, तसेच भौतिक जगात भौतिक क्षेत्रातही काही ‘योगी’ आढळून येतात. या ‘योग्यां’ची बाह्य़दशा अध्यात्माच्या क्षितिजावर तळपत असलेल्या योग्यांशी बरीचशी मिळतीजुळती असते. उदाहरणार्थ, साधनमग्न योग्याला जसं आहारभान नसतं, त्याप्रमाणे एखाद्या संशोधनासाठी धडपडत असलेल्या शास्त्रज्ञालाही खाण्यापिण्याचं भान नसतं. योग्याच्या मनात भौतिक प्रगतीबाबत जशी ओढ नसते, त्याचप्रमाणे भौतिकातील या ‘योग्यां’नाही स्वत:च्या भौतिक प्रगतीची तळमळ नसते. त्याच्या अंत:करणात त्या शोधविषयापल्याड कशाला अस्तित्वच नसतं! तोही भौतिकात मिळेल ते स्वीकारतो, जे मिळत नाही त्याचं दु:ख उगाळत नाही; पण तो सर्वार्थानं आणि सर्वागानं त्या शोधविषयाला समर्पित असतो. आता या योग्यानं ठरवलं तर तो भौतिकात प्रगती करू शकणार नाही का? अध्यात्मपथावरील योग्याच्या शक्तीचीही आपल्याला कल्पना नसते. तसंच भौतिकात जो सूक्ष्म संशोधनानं मोठमोठे शोध लावू शकतो, तो ती बुद्धी भौतिक सुखसाधनांच्या प्राप्तीसाठी नाही का वळवू शकत? अवधूत सांगतो, ‘‘अजगरासी बळ उदंड। देहो पराक्रमें प्रचंड। परी न करी उद्योगाचें बंड। पसरूनि तोंड पडिलासे।।३७।। तैसाचि योगिया केवळ। शरीरीं असे शारीर बळ। बुद्धिही असे अतिकुशळ। इंद्रियबळ पटुतर।।३८।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, अजगरात उदंड बळ असतं, पराक्रम अंगी बाणलेला असतो, पण तरी तो लालसेनं धडपड सुरू करीत नाही. अगदी योग्याचीही हीच स्थिती असते. त्याच्या शरीरात बळ असतं, त्याची बुद्धीही कुशल असते, इंद्रियेही सक्षम असतात. पण म्हणून तो जगाच्या ओढीनं अस्थिर होत नाही. अवधूत सांगतो, ‘‘आहारालागीं सर्वथा। हेतु स्फुरों नेदी चित्ता। कायावाचा तत्त्वतां। नेदी स्वभावतां डंडळू।।३९।।’’ ‘आहार’ म्हणजे इंद्रियांद्वारे बाह्य़ जगातून देहबुद्धीला सुखावणाऱ्या गोष्टींच्या प्राप्तीची तळमळ! त्या ‘आहारा’साठी या योग्याला कधी स्फुरण येतच नाही. तो देहानं वा वाणीनं लाचार होत नाही! आता मुद्दा असा की, योग्याची ही आंतरिक अलिप्त दशा वाचून सामान्य माणसाला नेमका काय लाभ होतो? एका वाचकानं अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की, हे सारं आध्यात्मिक चिंतन वाचायला खूप आवडतं, मनाला बरंच काही नवं गवसल्यासारखं वाटतं, पण ते आचरणात येत नाही. किंबहुना ते आचरणात येणं अशक्यच असतं! मग वाटतं, हे वाचायला आवडणं म्हणजे निव्वळ बौद्धिक मनोरंजन आहे का? अगदी प्रामाणिक प्रश्न आहे हा. आणखी एकानं खूप मागे विचारलं होतं की, सगळं वाचून तेवढय़ापुरतं मनाला शांत वाटतं, पण काही वेळात मनाची स्थिती पूर्ववत होते. मग हे लिहून वा वाचून काय लाभ? वृत्तीत पालट होणार नसेल, तर मग का दररोज असं काही वाचावं? आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहू. आपण रोज घरातला केर काढतो ना? टेबल, कपाटं वगैरेंवरील धूळ पुसतो ना? आज केर काढला, धूळ पुसली, तरी उद्या पुन्हा केर होतोच, धूळ बसतेच. मग एकदा केर काढूनही तो परत-परत होतोच, तर तो काढून काय उपयोग, असा विचार आपण करतो का? एकदा धूळ पुसूनही ती परत बसतेच, मग रोज धूळ पुसून काय उपयोग, असा प्रश्न आपण करतो का? नाही! आपण रोज केर काढतो, रोज धूळ पुसतो. तसा मनातला केरही सतत काढला पाहिजे, मनातली धूळ पुसली पाहिजे.