– चैतन्य प्रेम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
समुद्राची दोन लक्षणं अवधूत सांगतो. ती म्हणजे गांभीर्य आणि निर्मळपणा. या शब्दांचा शाब्दिक अर्थ आपल्याला समजतो. पण त्यांचा स्थितीतून प्रकटणारा अर्थ जाणवत नाही. कारण गंभीरत्व आणि निर्मळता या गुणांशी आपला खरा परिचय नाही. गंभीर म्हणजे लांबट चेहरा करून बसणारा, रुक्ष माणूस नव्हे. गंभीर तो असतो जो स्वरूपापासून ढळत नाही. निर्मळ म्हणजे ज्याच्या चित्तात मलीनता नसते तो, असं आपण मानतो. तर, जो वाटय़ाला येणाऱ्या कशाचाच अव्हेर करीत नाही, पण त्या स्वीकारानंतरही जो स्वत: न पालटता ज्याला स्वीकारलं त्याला आपल्यासारखं करून टाकतो, असा अभेदवृत्तीचा माणूस खरा निर्मळ असतो. थोडा आणखी विचार करू. समुद्रात नद्यांचं पाणी येऊन मिळतं तसंच नाल्यांचं पाणीही मिळतं. तरीही समुद्र कोणालाच अव्हेरत नाही. कुठूनही कसंही पाणी येऊन मिसळलं तरी समुद्राच्या स्वरूपात फरक पडत नाही. अवधूत म्हणतो, ‘‘मीनल्या सरितांचे समळ जळ। समुद्र डहुळेना अतिनिर्मळ।’’ (४३व्या ओवीचा पूर्वार्ध, एकनाथी भागवत, अध्याय आठवा). काही नद्यांचं पाणी गढूळ असलं, तरी समुद्र ते अव्हेरीत नाही की समुद्राचं पाणी गढूळ होत नाही. पावसाळ्यात दुथडी भरून नद्या सागराला येऊन मिळतात आणि उन्हाळ्यात त्या कोरडय़ा पडून पाण्याचा ओघ आटतो. तरी समुद्राच्या पातळीत फरक पडत नाही. अवधूत म्हणतो, ‘‘वर्षांकाळीं सरिता सकळ। घेऊनि आल्या अमूप जळ। तेणें हर्षें हरुषेजेना प्रबळ। न चढे जळ जळाब्धी।।६३।। ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती। सरितांचे यावे राहती। ते मानूनियां खंती। अपांपती वोहटेना।।६४।।’’ आता समुद्राचे हे गुण अवधूताला योग्यातही दिसतात. तो म्हणतो, ‘‘समुद्र सदा सुप्रसन्न। योगी सदा प्रसन्नवदन। केव्हांही धुसमुशिलेपण। नव्हे जाण निजबोधें।।४२।।’’ समुद्र सदोदित प्रसन्नच भासतो. समुद्रकिनारी बसताच मनावरचा ताण अलगद कमी होतो. समुद्राचं ते भव्यविस्तीर्ण रूप, लाटांचं तालबद्ध नर्तन अनुभवताना मन मौनावतं, डोळे सुखावतात, कान तृप्त होतात. यानं एक वेगळीच शांती मनात पसरते. या समुद्रासारखाच योगीही सदा सुप्रसन्न असतो. त्याच्या सहवासातही मनातील चिंता त्या वेळपुरत्या तरी ओसरतात. एका वेगळ्याच शांतीचा अनुभव येतो. मग अवधूत सांगतो, ‘‘जळें गंभीर सागर। योगिया स्वानुभवें गंभीर। वेळा नुल्लंघी सागर। नुल्लंघी योगीश्वर गुरूआज्ञा।।४४।।’’ अनंत बाजूंनी येत असलेल्या जलओघांचा स्वीकार करणारा समुद्र त्याच्या सर्वसमावेशक भावामुळे गंभीर असतो, तसा योगी अनुभवानं गंभीर अर्थात स्थिरचित्त झाला असतो. कितीही नद्यांचं पाणी आलं तरी समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. त्याचप्रमाणे योगीही गुरूआज्ञेच्याच मर्यादेत सदोदित राहतो. जीवन कसं जगावं, जगण्यात नेमका कोणत्या गोष्टीला अग्रक्रम द्यावा, कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यावा, हे माणसाला नेमकेपणानं ठरवता येतंच असं नाही. बरं एक वेळ ठरवता आलं, तरी ते आचरणात उतरतंच, असंही नाही. कृती आणि उक्तीतली मर्यादा अनेकदा सुटते. बोलू नये, ते बोललं जातं. वागू नये तसं वागलं जातं. का? तर मर्यादेचं महत्त्व उमगलेलं नाही. मर्यादेत सौंदर्य असतं, सुखदपणा असतो. रांगोळी आकारबद्ध असते तेव्हा नेत्रसुखद भासते. तसं जीवनाला गुरूआज्ञेची चौकट असेल, तर जगण्यात सौंदर्य, शांती, तृप्ती भरून जाते. आता या आज्ञासुद्धा जगावेगळ्या नसतात; उलट माणूस म्हणून घडविणाऱ्या असतात.