– चैतन्य प्रेम
समुद्र आणि योगी यांच्यातलं साधर्म्य अवधूत सांगत आहे. गंभीरत्व आणि निर्मळपणा ही दोन लक्षणं समुद्र आणि योगी यांच्यात समान आहेत. निर्मळपणाचा अर्थ आपण पाहिला तो म्हणजे वाटय़ाला येणाऱ्या कशाचाच अव्हेर न करता आणि त्या स्वीकारानंतरही स्वत: न पालटता ज्याला स्वीकारलं त्याला आपल्यासारखं करून टाकणारी अभेदवृत्ती म्हणजे खरा निर्मळपणा आहे. आता या स्वीकारातही एक फरक आहे. त्यात जे बाहेरून येतं त्यानं मिसळून जाणं घडलं पाहिजे! जे मिसळून जातं ते स्वीकारलं जातं. गढूळ पाणी समुद्रात सहज मिसळतं, पण माणूस जी टाकाऊ वस्तूंची घाण समुद्रात फेकतो ती लाटांसरशी पुन्हा किनाऱ्यावर फेकली जाते! जे मिसळतं, ते असं परत केलं जात नाही! थोडं विषयांतर वाटेल, पण ते आवश्यक आहे. अध्यात्माचं वा जगण्याचं जे सहज ज्ञान आहे ना, ते अनपेक्षित माध्यमांतूनही प्रकटतं बरं! हिंदी वाहिनीवर एक नृत्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यात एका सहभागी स्पर्धकाच्या घरच्या गरिबीचं आणि त्याच्या जीवनसंघर्षांचं वर्णन सुरू होतं. ते ऐकताना एक परीक्षक दिग्दर्शक उद्गारले की, ‘‘कमी पैशात जीवन सुखानं जगणं थोडं कठीण असतं, पण जास्तीत जास्त पैशात तर ते सुखानं जगणं अशक्यच असतं!’’ किती मोठी गोष्ट सहजपणे त्यांच्याकडून प्रकट झाली! तसं शब्दांचं मोल उलगडून दाखवणारा एक प्रसंग एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात ऐकायला मिळाला. कवि ग्रेस यांचं ‘ती गेली तेव्हा रिमझिम..’ हे गीत प्रसिद्धच आहे. त्याचे मूळ शब्द होते, ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात मिसळली किरणे हा सूर्य सोडवित होता’- गाणं ध्वनिमुद्रित झालं तेव्हा ‘मिसळली’ या शब्दाऐवजी ‘अडकली’ शब्द वापरला गेला. आता संगीतकार पंडित हृदयनाथ हे शब्दांबाबत अतिशय काटेकोर. एखादं गीत तीन मिनिटांचं असतं, पण त्यावर त्यांचं चिंतन फार सखोल; तरी हा शब्दबदल झाला. ग्रेस यांना काही तो रुचला नाही. कुणीतरी म्हणालं की, ‘अहो मिसळणं आणि अडकणं, यात काय मोठा फरक आहे?’ ग्रेस ताडकन म्हणाले, ‘‘अहो अडकलेली गोष्ट सोडवता येते, मिसळलेली नव्हे! जे एकदा मिसळलं ते मिसळलं! ते वेगळं करता येतच नाही!!’’ तसं गढूळ पाणी समुद्रात मिसळलं की मिसळलं. ते समुद्र दूर सारत नाही. पण माणसानं टाकलेल्या वस्तूंचा कचरा तो पुन्हा किनाऱ्यावर टाकतो. का? कारण तो मिसळलेला नसतो. तरंगत असतो. अवधूत सांगतो, ‘‘मळु न राहे सागरीं। लाटांसरिसा टाकी दुरी। तैसाचि मळु योगियाभीतरी। ध्यानें निर्धारीं न राहे।।४९।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). समुद्र जसा जगानं त्याच्यात फेकलेला कचरा लाटांबरोबर पुन्हा जगाच्या किनाऱ्यावर आणून टाकतो तसा योगीही आपल्या अंत:करणाच्या भावसमुद्रात मळ राहू देत नाही. ध्यानानं ज्या आनंदलाटा उसळतात त्या सर्व हा कचरारूपी अविचार बाहेर टाकून देतात. मग अवधूत सांगतो, ‘‘जो समुद्रामाजीं रिघोनि राहे। तो नाना परींचीं रत्नें लाहे। योगियांमाजीं जो सामाये। त्याचे वंदिती पाये चिद्रत्नें।।५१।।’’ म्हणजे, जो समुद्रात वारंवार बुडी मारतो त्याच्या हाती रत्नं लागतात. समुद्रात रत्नं असतात म्हणून त्याचं एक नाव रत्नाकरही आहे. तसा जो योग्याशी समरस होतो, त्याचे पाय वंदितो म्हणजे ज्या वाटेनं त्या योग्यानं वाटचाल केली त्या वाटेनं त्याच्या बोधानुरूप जो चालतो त्याच्या हृदयात सद्भावाची रत्नं सहज झळकू लागतात!