– चैतन्य प्रेम
समुद्रातील अनेक लक्षणं अवधूताला योग्यातही आढळली. पण इतर अनेक बाबतींत समुद्र तोकडाच पडला! अवधूत म्हणतो, ‘‘समुद्रलक्षणें साधिता। अधिक दशा आली हाता। ते योगियाची योग्यता। परीस तत्त्वता सांगेन।।५५।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, ‘हे यदुराजा, समुद्र आणि योगी यांच्यात मला साधर्म्य दिसलं, मात्र तरीही योगी जास्त योग्यतेचा दिसला. कसं ते ऐक..’ मग अवधूत सांगतो की, ‘‘समुद्रामाजीं जळ। लाटांखालीं अतिचंचळ। योगियां अंतरीं अतिनिश्चळ। नाही तळमळ कल्पना।।५६।। समुद्र क्षोभे वेळावेळे। योगिया क्षोभेना कवणें काळें। सर्वथा योगी नुचंबळे। योगबळें सावधु।।५७।।’’ म्हणजे, ‘समुद्राच्या लाटांखाली पाणी अतिशय चंचल असतं, योग्याचं अंत:करण मात्र अतिशय निश्चल असतं. त्याच्या अंत:करणात कल्पना नसतात आणि त्यामुळेच तळमळही नसते! भरती, ओहोटी आणि वादळामुळे समुद्र क्षोभल्यागत भासतो. पण योग्याच्या मनात अशी भरती-ओहोटी नसते की वादळही नसतं. तो कशानंही क्षुब्ध होत नाही. तो सदोदित सावध असतो.’ आता याचा थोडा विचार करू. समुद्रात सदोदित लाटा उसळत असतात, भरती आणि ओहोटी होत असते आणि याचा संबंध चंद्राशी आहे! चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. अर्थात, चंद्रामुळे जशी समुद्रात सतत भरती-ओहोटी आणि त्यामुळेच लाटांचं नर्तन सुरू असतं, तसं सर्वसामान्य माणसाच्या मनात उसळत असलेल्या नवनव्या कल्पना, वासनांमुळे त्याच्या अंत:करणात सतत इच्छा, ऊर्मीच्या लाटा उसळत असतात. त्यामुळे तो चटकन अशांत, अस्वस्थ होऊ शकतो. योग्याच्या मनात कल्पनाच नसतात, त्यामुळे तळमळही नसते. आता कल्पना ही मोठी क्षमता आहे; पण माणसाच्या बहुतांश कल्पना या देहबुद्धीतून प्रसवणाऱ्या आणि त्यामुळेच अवास्तवही असतात. भ्रम, मोह आणि आसक्तीनं माखलेल्या या कल्पना प्रत्यक्षात उतरणं शक्य नसतं. त्यामुळे माणसाचं मन सदोदित अशांत असतं. योग्याला देहबुद्धीच नसल्याने त्याच्या अंत:करणात कल्पनांचा गुंता नसतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अवधूत सांगतो, ती म्हणजे-योगी हा ‘योगबळे सावधु’ असतो! जो सावध तोच साधक, अशी साधकाची फार मार्मिक व्याख्या आहे. हा सावधपणा कशाबद्दलचा आहे? तर ध्येयापासून आपण तसूभरही ढळत नाही ना, याबाबतचा आहे. योग्याला भगवत्प्रेमाचा योग साधलेला असतो आणि त्या बळावर तो सदोदित सहज सावध असतो. त्याच्यात अवास्तव कल्पनांची भरती आणि परमज्ञानाची ओहोटी कधीच घडत नाही. उलट त्याचं जीवन म्हणजे आत्मसुखाची भरती आणि देहभावातून निपजणाऱ्या भवदु:खाची ओहोटी, असंच असतं. पुढे अवधूत सांगतो की, पौर्णिमा आणि अमावास्येला समुद्राला पूर्ण भरती येते, पण योग्याच्या जीवनात पूर्णज्ञानाचा पूर्णचंद्र सदैव डोलत असल्याने त्याच्या जीवनात सदैव आत्मतृप्तीच विलसत असते.
chaitanyprem@gmail.com