– चैतन्य प्रेम

सत्पुरुषाचं सगळं चरित्रच फार मधुर असतं हो. त्यांचं प्रेमही मधुर आणि रागावणंही मधुरच! त्या रागाला स्वार्थाचा स्पर्शही नसतो. केवळ परहिताचीच कळकळ असते. काहीवेळा त्या सांगण्याचा खरा अर्थ आपल्याला लगेच समजत नाही. ते सांगणं त्यावेळी रुचत नाही आणि म्हणून ते कठोर वाटतं. आपण आपल्याच विचार क्षमतेनुसार त्या सांगण्याचा अर्थ लावत असतो. आपली विचारक्षमता ही देहबुद्धीसाठीच राबत असल्यानं आकुंचित झाली असते. त्यामुळे ते बोलणं मनाविरुद्ध वाटलं, तर ती आपल्यावरील टीका वाटते. मग सुधारणं दूरच; आपण आपल्याच संकुचित विचारांना आणि कृतीला चिकटून बसतो.

इथे कोणत्याही मानसिक गुलामगिरीचं समर्थन अभिप्रेत नाही. पण एक उदाहरण घेऊ. आपल्याला ताप येतो. आपण डॉक्टरकडे जातो. आपल्याला तो ताप साधा वाटत असतो. मात्र तो गंभीर आजार आहे, असं डॉक्टर सांगतो. मग तो जी काही औषधं देतो वा उपचार सुचवतो ते स्वीकारणं, ही मानसिक गुलामगिरी ठरते का? मला साधा ताप आहे, याच माझ्या विचारावर मी ठाम राहणार, असा पवित्रा आपण घेतो का? नाही! एक जरूर करावं- डॉक्टर चांगला आहे ना, याची आधी खात्री करून मगच त्याच्याकडे जावं. पण एकदा गेलो की त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं आवश्यकच असतं. तसं सत्पुरुषाला अवश्य पारखून घ्यावं. त्याची वृत्ती कशी आहे, श्रीमंती आणि गरिबीनुसार शिष्यांशी त्याची वागणूक बदलते का, त्याला पैशाचा, शिष्यसंख्येचा मोह आहे का, मोठेपणाचा गर्व आहे का; सगळं तपासावं. एखादा फार उत्तम बोलतो वा लिहितो, हा काही त्याच्या अस्सलपणाचा निकष नव्हे. तो वागतो कसा, हेच महत्त्वाचं आहे. तेव्हा सत्पुरुषाच्या वृत्तीचं बारकाईनं निरीक्षण करावं. मगच त्याचं होऊन जावं. अर्थात त्याचं सांगणं मन लावून ऐकावं, त्यातलं आपल्यासाठी जे आहे ते स्वीकारून आचरणात आणावं. हे करू लागू तेव्हा सत्पुरुषाच्या चरित्रातलं माधुर्य जाणवू लागेल हो! अशा मधुर सत्संगाशिवाय जगण्यात गोडवा नाही बरं. श्रीमहाराज म्हणतात, कोणत्याही गोष्टीला मिठानं चव येते. पण ते योग्य प्रमाणात असलं तरच. ते थोडं जास्त झालं तर पदार्थ खाववतही नाही. अगदी कितीही भुकेला माणूस असू द्या, तोही म्हणेल की, एकवेळ भूक सोसेन, पण हा खारट पदार्थ नको! तीच गोष्ट समुद्राची! समुद्र अथांग पाण्यानं भरलेला आहे. पण सगळा खारट! तहानलेल्या माणसाची तृष्णा तो भागवू शकतो का? कितीही तहानलेला माणूस असू दे, तो समुद्राचं पाणी पिऊन तहान भागविण्याचा विचार तरी करील का? मग अगदी तसाच आसक्तीचं मीठ कालवलेला खारट प्रपंच कसा सुख देऊ शकेल? पण तरीही आसक्तीच्या प्रपंचातली आपली मिठाची भूक आणि तहान काही शमत नाही. ज्याला या भुकेतला धोका कळला तोच सावध होईल. मग जगणं गोड कसं करावं, हे शिकायची त्याला इच्छा असेल तर ज्याच्या प्रत्येक कृतीत आणि उक्तीत आत्मतृप्तीचंच माधुर्य विलसत आहे, त्याच्याकडेच जावं लागेल. त्याच्या बोधानुसार जगण्याचा अभ्यास करावा लागेल.

त्याचा बोध कसा आहे? एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘बोधु साचार पैं त्याचा!’’ तो साचार आहे म्हणजे तो त्या सत्पुरुषाच्यादेखील आचरणात आहे. मग जे तो आचरणात आणतो तेच मलाही आचरणात आणणं साधलं, तर माझंही जीवन त्याच्यासारखं माधुर्यानं भरेल, यात काय शंका?

Story img Loader