– चैतन्य प्रेम
आपलं चिंतन निखळ आध्यात्मिक आहे. त्यात वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणं पूर्णत: टाळलं जातं. याचं कारण वर्तमानावर भाष्य करणं, हा या सदराचा अभिप्रेत हेतूच नाही. निखळ तत्त्वविचार हा शेकडो वर्षांनीही ताजाच असतो, तर वर्तमानावरील भाष्याला शेकडो वर्षांनी संदर्भमूल्य असतं. त्यामुळेच दोनशे वर्षांपूर्वीचा रामकृष्ण परमहंस वा विवेकानंदांचा बोध आजही ताजाच असतो; तर तात्कालिक परिस्थितीवर त्या काळी केल्या गेलेल्या भाष्याला आज ऐतिहासिक संदर्भापुरतं मोल असतं. पण तरीही काही वेळा वर्तमानातील वास्तवाला मनातून पुसता येत नाही. विशेषत: ‘कामिनी’ आणि ‘कांचना’च्या बाधकतेबद्दल बोलताना वर्तमानाकडे पाठ फिरवता येत नाही. ‘कामिनी’ म्हणजे स्त्री नव्हे तर कामासक्ती, हे सूत्र खरंच आहे. पण जे ‘कामिनी’ म्हणजे ‘स्त्री’ हा अर्थच गृहीत धरतात, त्यांनी ‘बंधना’त पडणाऱ्या ‘पुरुषा’सही फटकारले पाहिजे! ‘‘मुलींवर संस्कार केले, तर लैंगिक अत्याचार घडणार नाहीत,’’ अशी प्रतिक्रिया स्त्रीच्याच पोटी जन्मलेल्या पुरुषाच्या तोंडून उमटते तेव्हा कोणाला लाज वाटणार नाही हो? सगळ्या पुरुषांवर संस्कार पूर्ण झाले का आणि झाले असतील तरीही तो जर अत्याचार करीत असेल, तर ते संस्कार तकलादू होते का, हेही मग विचारलं पाहिजे ना? असो. सांगायचा मुद्दा हा की, ‘कामिनी’वर जी टीका होते त्यास, ती वाचणाऱ्या माणसातील अनियंत्रित कामरोगट मनोभावनाही मुख्यत्वे कारणीभूत असते, हे विसरू नये. म्हणूनच एकनाथ महाराजही ‘एकनाथी भागवता’च्या आठव्या अध्यायात सांगतात की, ‘‘माया अजितेंद्रिया बाधी! (८६ व्या ओवीचा प्रथम चरण).’’ ‘स्त्री’ म्हणजे जर माया असेल ना, तर ज्याची इंद्रिये अनावर आहेत त्यालाच ती बाधते! अर्थात, दोष आपल्याकडेच आहे. परमात्म्याचा अंश असलेलं आत्मतत्त्वच सर्वत्र भरून आहे, असं जर आपण म्हणतो; तर मग स्त्री-पुरुषाच्या आत्म्यात लैंगिक भेद आहे का? मग ज्या साधकाच्या दृष्टीत अभेदता असेल, त्याला स्त्री-पुरुष भेद दिसणारच नाही. ही अभेद दृष्टीदेखील भगवंताची कृपाच असते. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘कैशा रीतीं रक्षी भक्त। मुळीं आत्मा आत्मी नाहीं तेथ। स्त्रीरूपें भासे भगवंत। भक्त रक्षित निजबोधें।।८७।।’’ कामासक्तीच्या धोक्यापासून भगवंत भक्ताला कसं वाचवतो? तर, तो स्त्रीच्या जागीही आपलंच दर्शन घडवतो. जर ही दृष्टी नसेल तर, ‘‘वनिता देखोनि गोमटी। विवेकाची होय नष्ट दृष्टी। (८८ व्या ओवीचा पूर्वार्ध).’’ परस्त्रीला पाहून कामरोगट पुरुषातला विवेक नष्ट होतो. पण जर परस्त्रीमधील देवत्वाचीच जाणीव झाली तर तिच्याविषयी वाईट विचार जागणारच नाहीत. इथे एक गोष्टही स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे, साधनेनं माझी दृष्टी अभेद झाली असली तरी समाजाची तशी दृष्टी नाही. प्रत्येकाचीही तशी अभेद दृष्टी असेल, असं नाही. त्यामुळे स्त्रीसाधकांशी मर्यादा पाळूनच व्यवहार झाला पाहिजे. स्त्रीच कशाला, प्रत्येक साधकाबरोबर वागताना मर्यादशीलता पाळली पाहिजे. दुसरा कोणी सूक्ष्म वासनात्मक भावनिक ओढ जोपासत असेल, तर कठोरपणे तो संग तोडलाच पाहिजे. त्याचा खरा लाभ आज ना उद्या त्या व्यक्तीलाही जाणवल्याशिवाय राहणार नाही. जीवन खऱ्या अर्थानं आध्यात्मिक जीवन व्हावं, यासाठी प्रामाणिक प्रयत्न व अभ्यास करणं, हे आपलं एकमेव ध्येय असलं पाहिजे. सद्गुरुबोधानुसार आत्मपरीक्षण आणि स्वसुधारणा हाच त्यासाठीचा एकमेव उपाय आहे.