– चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंद्रियांच्या अधीन राहून विषयज्वरातून सुटका होणार नाही. ती होईल एका ‘नारायणा’मुळेच, असं म्हटलं. पण या ‘नारायणा’चा अर्थ जाणून घेतला पाहिजे. नारायण म्हणजे भगवान विष्णू, असा सीमित अर्थ नव्हे. तर ‘नर+अयन’ म्हणजे ‘नारायण’ आहे. ‘अयन’ म्हणजे घर. तर नरदेह हा ज्याचा निवास आहे, नरदेह हे ज्याचं घर आहे तो नारायण! आता कोणताही मनुष्य वा देहधारी ‘नारायण’ झाला का? तर नाही. कारण तो देहभावात, मनुष्यभावातच रुतून आहे. ‘देह म्हणजेच मी’ या दृढ धारणेत तो आहे. त्यामुळे जो देहभावापासून लेशमात्रही मोकळा नाही, तो देहाला घर कसं मानेल? त्यापासून अलिप्त कसा होईल? मग खरा ‘नारायण’ कोण आहे? तर जो देह हे आपलं तात्पुरतं घर आहे, असं मानून जगात वावरत असतानाही देहभावात कधीच जगत नाही असा ‘नारायण’ म्हणजे केवळ सद्गुरूच असू शकतो! किंवा जो सद्गुरूमय भक्त आहे, तोही ‘नारायण’भावात असू शकतो. माणसाचा देह मोठा विलक्षण आहे यात शंका नाही. माणसाचं मनही सूक्ष्म आणि अत्यंत शक्तिवान आहे. मात्र त्या मनाची सतत बाह्य़ जगाकडे धाव सुरू आहे. त्यामुळे त्याची इंद्रियंही सतत बहिर्मुख आणि चांचल्य वाढविणारी असतात. केवळ कामसुखाच्या वेळी सर्व इंद्रियं एकाच विषयाशी तद्रूप होतात; मन आणि इंद्रियांची अस्थिरता त्यामुळे कमी होते आणि त्यानं जे मनावरचं तणावाचं ओझं काही क्षणांपुरतं का होईना उतरतं, त्यामुळे मनाला तृप्तीचा ओझरता अनुभव मिळतो. त्या अंतर्मुखतेतून गवसत असलेल्या या अनुभवाची माणसाला खरी ओढ असल्यानं आणि सहजप्राप्य भासणाऱ्या कामसुखानं हा अनुभवही सहजप्राप्य भासत असल्यानं माणूस कामवासनेत गुरफटतो. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे, असा विचार त्याच्या मनाला शिवतही नाही. जेव्हा तो शिवतो तेव्हा त्यासाठीचा उपाय काही केल्या उमजत नाही. मग त्याला वाटतं की, कामसुख पूर्ण घेत गेलो की त्यासाठीची इच्छा ओसरत पूर्ण शमेल आणि आपण तिच्या जोखडातून मुक्त होऊ. तो समज धुडकावत एकनाथ महाराज राजा पुरूरवाचा दाखला देतात. ऊर्वशीच्या मोहानं कामासक्त झालेला पुरूरवा राजा जेव्हा भानावर आला तेव्हा आपली दशा आणि काममोहात निघून गेलेलं मोलाचं आयुष्य जाणून कष्टी झाला. आपला स्वानुभव मांडत तो म्हणाला की, ‘‘कामभोगान्तीं विरक्ती। ऐसें मूर्ख विवेकी बोलती। ते अध:पातीं घालिती। हे मज प्रतीति स्वयें झाली।।१६६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय २६). कामभोगांची पूर्ती झाली म्हणजे विरक्ती येते, असं जर कुणी म्हणत असेल, तर तो मूर्खपणा आहे. उलट, कामसुखाच्या पूर्तीच्या धडपडीत अध:पातच होतो. मग हा अध:पात रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे, ‘‘भावें हरीसी रिघाल्या शरण। हृदयीं प्रकटे नारायण। तेव्हां सर्व काम सहजें जाण। जाती पळोन हृदयस्थ।।१९१।।’’ हरीला संपूर्ण भावनापूर्वक शरण गेलो तर हृदयात नारायण प्रकटतो, मग त्या हृदयातून सर्व कामना ओसरतात. आता ‘हृदयात नारायण प्रकटतो’ म्हणजे आपल्या अंत:करणातील देवत्व आणि दिव्यत्व प्रकटतं! पण हा बराच लांबचा पल्ला आहे. त्यात कामभावनेकडे असलेली सहज ओढ रोखणं, मग त्या भावना हरीकडे वळवणं, मग हृदयातलं आत्मतत्त्व जागं होऊन कामभाव लोपणं, ही प्रक्रिया अपेक्षित आहे. यात शंभर टक्के यशाची हमीही नाही! कारण मुळात ना हरी माहीत आहे, ना शरणागती माहीत आहे. हृदयस्थ नारायणही कल्पनेच्या कक्षेत येत नाही! मग काय करावं?