– चैतन्य प्रेम

प्रत्येकाकडून जे उत्तम आहे त्याची प्रेरणा घ्यावी, हा पाठ भ्रमरानं शिकवला. फुलाचं सौंदर्य आणि रूप अबाधित राहील, इतपतच त्या फुलातील मध भ्रमर गोळा करतो. त्याप्रमाणे योग्यानंही प्राणधारणेपुरतीच भिक्षा घ्यावी, असं सांगतानाच अवधूत धोक्याचं वळण लक्षात आणून देतो. तो म्हणतो, ‘‘रिघोनि कमळिणीपाशीं। भ्रमरू लोभला आमोदासी। पद्म संकोचें अस्तासी। तेंचि भ्रमरासी बंधन।।९५।। जो कोरडें काष्ठ भेदोनि जाये। तो कमळदळीं गुंतल्या ठाये। प्रिया दुखवेल म्हणोनि राहे। निर्गमु न पाहे आपुला।।९६।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). म्हणजे फुलातला थोडासाच मध वेचून भ्रमर उडून जातो, पण जर तो एखाद्या कमळपुष्पात गुंतला, तर सायंकाळ होताच ते कमळपुष्प मिटतं आणि तो भ्रमर त्या मिटलेल्या पाकळ्यांच्या पाशात अडकतो. ज्या भ्रमरात कोरडी लाकडं सहज कोरून भेदून जाण्याची क्षमता असते, त्याला त्या मुलायम पाकळ्या चिरून मुक्त होण्याचा विचारही शिवत नाही. नव्हे, तसा विचारही त्याचं हृदय विदीर्ण करतो. त्या नाजूक पाकळ्यांना इजा होईल, या जाणिवेनं तो मुक्त होण्याचा मार्ग शोधतही नाही. हे रूपक मांडून, लोकांच्या दातृत्वावर जीवन कंठत असलेल्या माणसाला अवधूत मोठा मार्मिक बोध करतो. तो म्हणतो, ‘‘तैसाचि जाण संन्यासी। एके ठायीं राहे लोलुप्येंसीं। तेंचि बंधन होये त्यासी। विषयलोभासी गुंतला।।९७।।’’ म्हणजे, कमलपुष्पात बद्ध झालेल्या त्या भ्रमराप्रमाणे जर संन्यासी एकाच स्थानी आसक्त झाला, तर त्याला ती जागा आवडू लागते. मग तो तिथे आसक्त होतो. विषयलोभांत रुतून जातो. आता हे विषय कोणते आणि हा विषयांचा लोभ कोणता, हे संत एकनाथ महाराज यांनीच ‘चिरंजीव पदा’त लख्खपणे सांगितलं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे कान, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नाक या पाच इंद्रियांचे पाच प्रिय विषय आहेत. ते साधकाला सहज गळाला लावतात. कसे? एकनाथ महाराज सांगतात, ‘‘जनस्तुति लागे मधुर। म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार। आम्हांलागी जाहला स्थिर। तेणें धरीं फार शब्दगोडी।।१५।।’’ (चिरंजीव पद). अहो हा सामान्य साधक नव्हे! आमचा उद्धार करण्याकरिता जणू हरीच आला आहे, अशी स्तुती कानांना गोड लागते. मग, त्याला नाना मृदू आसनांवर बसवतात, त्याची शुश्रूषा करतात, त्यायोगे तो स्पर्शगोडीत अडकतो. मग त्याला अर्पण केल्या जाणाऱ्या नाना वस्त्र आणि अलंकारांनी रूप विषयाची गोडी लागते. मग त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाऊ घालतात त्यानं रसगोडीत तो अडकतो. विविध सुगंधी फुलं, चंदनाचा लेप आणि सुवासिक धूपांनी त्याचा भवताल असा सुगंधी करतात की तो गंध विषयातही अडकतो. मग जिथं मान मिळत असतो तिथंच साधक गुंतला, तर त्याच्या वाटय़ाला अपमानही येतोच येतो. पण ज्याच्यावर भगवंताची खरी कृपा असेल तोच विरक्त होतो. जिथं मान मिळतो त्या स्थानाचा तो त्याग करतो. सत्संगात निश्चळ राहतो. मानासाठी किंचितही तळमळत नाही. त्याला लोकांच्या प्रापंचिक गोष्टीत गोडी नसते, कुणाशीही निर्थक बोलण्यात रस नसतो, स्वत:च्या योग्यतेचा डांगोरा नको असतो. लोकांकडून चांगलंचुंगलं खाणं, कपडालत्ता वा पैसा जमवणं त्याला जमतच नाही. तेव्हा कमलपुष्पात अडकून प्राणास मुकणाऱ्या भ्रमराकडून कुठेही आशाबद्ध होऊन आपल्या ध्येयपथापासून न ढळण्याचा आणि जगण्याची अनमोल संधी वाया न दवडण्याचा पाठ अवधूत शिकला आहे.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
Story img Loader