– चैतन्य प्रेम

अशाश्वत गोष्टींच्या संग्रहाची ओढ साधकाला असू नये. ही ओढ कधी कधी आत्मघातकही ठरते. हे दोन पाठ माशी आणि मधमाशीकडून अवधूत शिकला. त्यामुळे माशी त्याचा १३ वा, तर मधमाशी १४ वा गुरू ठरली. पू. बाबा बेलसरे लिहितात की, ‘‘माशी व मधमाशी या दोन गुरूंचे वर्णन करताना नाथांनी निर्लोभाचे तत्त्व मुख्यत: सांगितले आहे. प्रपंचात राहणाऱ्या माणसाला संग्रह अवश्य आहे यात शंका नाही. पण तो किती असावा याला काही मर्यादा आहे. आपण स्वत:, आपल्या कुटुंबातील माणसे आणि आला-गेला यांच्या अन्न, वस्त्र, औषधपाणी, अडीअडचणी भागातील इतका पैसा व इतर वस्तू संग्रहात असणे गैर नाही. परंतु संग्रह करण्याचा नाद एकदा लागला आणि सुदैवाने पैसा हाताशी असला म्हणजे सामान्य माणूस भलतीकडे वाहात जातो आणि नुसता संग्रह करीत सुटतो. अमक्या वस्तूशिवाय आपले चालतच नाही अशी खोटी कल्पना करून आपल्या जीवनाला तो कृत्रिमता आणतो. कृत्रिम जीवन जगणाऱ्या माणसाला परावलंबित्व येते. असा माणूस कधीही भगवंताच्या आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही. अगदी कमीत कमी संग्रह करून मनुष्य कसा आनंदात जगू शकतो हे प्रत्यक्ष पाहायला मिळावे म्हणून नाथांनी माशी व मधमाशी यांचे वर्णन केले आहे (‘भावार्थ भागवत’, पृ. ३४३).’’ माशीकडून आपण कोणता बोध ग्रहण केला हे नमूद करताना अवधूत यदुराजाला सांगतो की, घरातली साधी माशी पाहा. ती साखरेच्या कणावर बसली की एकेक कण तोंडात घालते. पण नंतर खाता येईल, या विचारानं काही साठवत नाही. अवधूत म्हणतो, ‘‘हे होईल सायंकाळा। हे भक्षीन प्रात:काळां। ऐसा संग्रहो वेगळा। नाही केला मक्षिका।।१०९।। तैशी योगसंन्यासगती। प्राप्तभिक्षा घेऊनी हातीं। तिशीं निक्षेपु मुखाप्रती। संग्रहस्थिति त्या नाहीं।।११०।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, साखरेचे हे कण आज सायंकाळसाठी साठवते, हे कण उद्या पहाटेसाठी होतील, असा वेगळा संग्रह काही माशी करीत नाही. संन्यासीदेखील अशाच वृत्तीचा असतो. तो जी भिक्षा मिळाली ती ग्रहण करून टाकतो. त्या भिक्षेतला वाटा तो राखून ठेवत नाही. अवधूत पुढे फार सुंदर शब्दांत सांगतो की, ‘‘भिक्षेलागी पाणिपात्र। सांठवण उदरमात्र। या वेगळें स्वतंत्र। नाही घरपात्र सांठवणे।।१११।।’’ ‘पाणि’ म्हणजे हात. ‘पाणिपात्र’ म्हणजे हाताचे पात्र! तर पसरलेली हाताची ओंजळ हेच त्याच्या भिक्षेचं पात्र असतं आणि उदर म्हणजे पोट हेच ती भिक्षा साठविण्याचं एकमेव कोठार असतं! या हात आणि पोटाव्यतिरिक्त भिक्षा घेण्यासाठी आणि साठविण्यासाठी वेगळं पात्र वा कोठार नाही! हाताचं भिक्षापात्र आणि पोटाचं कोठार, ही रूपकं फार सूचक आहेत बरं. म्हणजे ओंजळभरच घ्यायचं आहे आणि तेवढंच पोटात ढकलायचं आहे. अधिकाची इच्छाच नाही तिथं. जर संग्रहातच मन गुंतलं, तर काय होतं? अवधूत सांगतो, ‘‘सायंकाळ प्रात:काळासी। भक्ष्यसंग्रह नसावा भिक्षूसी। संग्रहे पावती नाशासी। येविषीं मधुमाशी गुरू केली।।११२।।’’ मधाचा संग्रह करीत गेल्यानं मधासह मधमाशी नाश पावते, हे पाहून अधिकचा संग्रह अखेरीस आपल्यावरच कसा उलटतो, हे कळलं. त्यामुळे मधमाशीला मी गुरू केलं, असं अवधूत सांगतो. मधमाशी किती कष्टानं मध गोळा करते, पण तो संग्रहच तिच्या घाताचं कारण ठरतो. असं संग्रहाची पर्वा न करता जगणं सर्वसामान्यांना शक्य आहे का? आणि ते शक्य नसेल, तर या रूपकांतून आणि बोधातून सर्वसामान्य माणसाला एकनाथ महाराज नेमकं काय सांगू पाहात आहेत?

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?