– चैतन्य प्रेम
मधमाशी किती कष्टानं मध गोळा करते, पण तो संग्रहच तिच्या घाताचं कारण ठरतो. अवधूत म्हणतो, ‘‘रिघोनि नाना संकटस्थानांसी। मधुसंग्रहो करी मधुमाशी। तो संग्रहोचि करी घातासी। मधु न्यावयासी जैं येती।।११३।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). माणूसही भौतिक जीवनात कष्टानं प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत असतो. आर्थिक सुबत्ता असणं, गरजेच्या वेळी पैसा अपुरा न पडणं हा त्या प्रगतीचा सोपा- सर्वमान्य मापदंड असतो. आपल्याला शेवटपर्यंत काही कमी पडू नये, अशी सर्वसामान्य माणसाची अगदी स्वाभाविक अशी इच्छा असते. साधकही त्या इच्छेपासून मुक्त नसतो.
मग प्रश्न असा की, हाताची ओंजळ हेच भिक्षापात्र आणि पोट हेच कोठार मानणं आणि संग्रहाची पर्वा न करता जगणं सर्वसामान्यांना शक्य आहे का? तर निश्चितच नाही! मग तरीही अवधूत हे रूपक सांगत आहे कारण, अशा योग्याची आंतरिक स्थिती तरी आपल्याला समजावी, हा त्याचा हेतू आहे.
स्वामी विवेकानंद अमेरिकेकडे जाण्याआधी भारतभ्रमण करीत होते तेव्हाची गोष्ट. त्या वेळी त्यांना एका श्रीमंत गृहस्थानं विचारलं की, ‘‘स्वामीजी, आध्यात्मिक ज्ञानाचा विचार करता आपण फार बुद्धिमान आहात, पण व्यवहाराबद्दल बोलायचं तर आपल्याला तो समजत नाही, असं दिसतं. व्यवहारात आम्ही जसं बुद्धी वापरून चार पैसे मिळवतो आणि टिकवतो, तसं तुम्ही करत नाही. त्यामुळे तुम्हाला किती कष्टात जगावं लागत आहे पाहा!’’ स्वामीजी हसून म्हणाले, ‘‘अहो, खरे कष्टात तुम्हीच आहात! तो पैसा कमवायला आणि टिकवायला तुम्ही किती कष्ट करता. हे सारं दोन वेळा पोट भरता यावं, यासाठीच ना? मग माझ्याकडे पाहा, मी भूक लागली की पोटावर हात बडवतो आणि कुणी तरी मला खाऊ घालतं! मग मी सुखात आहे की तुम्ही?’’ आता याचा अर्थ स्वामीजी निष्क्रिय वा ऐतखाऊ होण्याची प्रेरणा देत होते, असं मानू नका. स्वामींसारख्या सत्पुरुषांच्या उत्तुंग कार्यामुळेच या देशाच्या परंपरेचा आदर जग करू लागलं, हे विसरू नका. पण मग याचा अर्थ काय घ्यावा? तर जो खरा शुद्ध आत्मविचारात निमग्न असतो ना, त्याचं मन व्यवहाराचं आकलन करू शकत नाही. त्याचा व्यवहार इतका व्यापक आणि निरपेक्ष असतो की तो अव्यवहारीच वाटावा! तो उद्याचा नव्हे, तर आतापुरता विचार करतो आणि आताची गरज भगवंतच जाणतो आणि भागवतो, हे तो अनुभवतो. असा योगी तुरटीप्रमाणे समाजमनाचं गढूळपण नष्ट करीत समाजाचं मानसिक आरोग्य टिकवत असतो. त्या आधारावरच तर समाजाला आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक प्रयत्नांसाठीचं मनोधैर्य आणि बळ मिळत असतं. योग्याच्या या सूक्ष्म कार्याचं मोल कसं मोजावं?
ते मोल तर उमजत नाहीच, पण सगळं गढूळपण शोषून घेणाऱ्या तुरटीनं पक्वान्नासारखं गोडही लागावं, ही आपली अपेक्षा असते! अशा आपल्याला सत्पुरुषाचा जीवन व्यवहार समजावा, यासाठी हा रूपकात्मक बोध आहे.
chaitanyprem@gmail.com