– चैतन्य प्रेम
मधमाशीच्या रूपकातून संग्रहात अडकलेल्या माणसाचा कसा घात होतो, हे अवधूतानं यदुराजाला सांगितलं. आता धनाइतकीच म्हणजे कांचनाइतकीच कामिनीही घातक आहे, हे नमूद करताना तो म्हणतो, ‘‘मूळनाशासी जीविता। कनक आणि योषिता। जंव जंव यांची आसक्तता। तंव तंव चढता भवरोगू।।११९।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). म्हणजे, धन आणि कामिनी हे माणसाच्या नाशाचे कारण ठरते. पुरुष जेवढा त्यात आसक्त होतो तेवढा भवरोग वाढतो. आता ‘कामिनी’ म्हणजे निव्वळ स्त्री नाही, हे आपण गेले काही भाग विस्तारानं जाणलं आहे. ‘कामिनी’ म्हणजे ज्या माध्यमाच्या योगानं आपली कामना पूर्ण होईल, असं आपल्याला ठामपणे वाटत असतं, ते माध्यम. सर्व कामनांमध्ये कामवासनेशी निगडित कामनांचा प्रभाव मोठा असल्यानं ‘काम’ म्हटलं की लैंगिक सुखाच्या इच्छाच डोळ्यासमोर येतात. तर, या सुखासाठी तळमळत असलेल्या पुरुषासाठी ‘कामिनी’ जशी स्त्री असते तसंच स्त्रीसाठी पुरुषही ‘कामिनी’च असतो, एवढं लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. तर कामनापूर्तीच्या माध्यमांमध्ये माणूस जितका गुरफटतो वा गुंततो तितका त्याचा भवरोग वाढत जातो, असं अवधूत सांगतो. भवरोग म्हणजे काय? ‘भव’ म्हणजे ‘अमुक व्हावं’ या इच्छेची तीव्र ओढ. ही ओढ अनिवार होत जाणं आणि तिचा मन, शरीर, चित्त आणि बुद्धीवर विपरीत परिणाम होत जाणं हाच तर भवरोग आहे! आणि या इच्छा ज्या अंतकरणात व्याप्त असतात ते अंतकरण म्हणजेच भवसागर! जो साधक अशा इच्छांच्या जाळ्यात अडकतो, आसक्त होतो तसतसा त्याचा भवसागर अत्यंत दुस्तर होतो. त्याचा आत्मनाशच ओढवतो. सर्व शक्ती आणि क्षमता असूनही केवळ या कामओढीनं साधक कसा फसू शकतो, हे हत्तीच्या उदाहरणावरून जाणवलं आणि तो अवधूताचा पंधरावा गुरू झाला. माणसाचा हत्तीसमोर आवाका तरी कितीसा? तरीही तो हत्तिणीचा मोह दाखवून हत्तीला वश करतो. अवधूत म्हणतो, ‘‘पहा पा षष्टिहायन भद्रजाती। त्यापुढें मनुष्य तें किती। ते हस्तिणीचे अंगसंगतीं। बंधन पावती मनुजांचें।।१२२।।’’ हा हत्ती साठ वर्ष जगतो, त्याची ताकद माणसासमोर अफाटच असते, तरी हत्तिणीच्या अंगसंगतिच्या लालसेनं तो सामान्य माणसाच्या बंधनात पडतो. ‘‘जो दृष्टीं नाणी मनुष्यासी। तो स्त्रियीं वश केला मानवांसी। त्याचेनि बोलें उठी बैशी। माथां अंकुशीं मारिजे।।१२३।।’’ जो माणसाला आपल्या डोळ्यासमोरही उभं राहू देत नाही, तोच हत्ती हत्तिणीच्या मोहानं मनुष्याच्या आज्ञेत राहतो आणि वर अंकुशाचा मारही सहन करतो. हत्ती बलाढय़ असतो, पण अतिशय शांतही असतो. तो इतर प्राण्यांप्रमाणे अन्य प्राणी मारून आपलं पोट भरून जगत नाही. हे सगळे गुण जणू संन्याशातही असतात. त्याची शक्ती अपरंपार असते, पण तरी तो अतिशय अंतर्मुख आणि शांत असतो. मात्र तरीही मोहाचं बीज रुजलं, तर हा बलाढय़ संन्यासीही हतबल होऊ शकतो! अशा संन्यासी साधकानं सर्व प्रकारे कामना संगापासून सावध राहावं, दूर पळून जावं, असं अवधूत बजावतो. हा सावधपणा किती टोकाचा आहे? तो म्हणतो, ‘‘पळतां पळतां पायांतळी। आल्या काष्ठाची पुतळी। तेही नातळावी कुशळीं। निर्जीव स्त्री छळी पुरुषातें।।१२६।।’’ पळता पळता लाकडी बाहुली मिळाली तरी तिलाही स्पर्शू नये, कारण निर्जीव ‘स्त्री’सुद्धा मनाला गोवू शकते! यात फार मोठा अर्थ भरला आहे बरं! तो आता पाहू.