– चैतन्य प्रेम

या जगात वावरायचं असेल, व्यवहार करायचा असेल, तर त्यासाठी देह हेच अनिवार्य माध्यम आहे. तो देह सुदृढ, निरोगी असणंही आवश्यक आहे. त्या देहव्यवहारासाठी सर्व इंद्रियं कार्यरत राहणं आवश्यक आहे. जिव्हेनं अन्नपदार्थाचं सेवन बंद केलं, कानांनी ऐकणं थांबवलं, डोळ्यांनी पाहणं थांबवलं, तर देहाद्वारे जगात वावर कसा होणार? तेव्हा इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयाचा ‘आहार’ आवश्यक आहेच. म्हणजे डोळ्यांना पाहू देणं, कानांना ऐकू देणं आदी. तसंच शरीर सुदृढ हवं असेल, तर त्या शरीराला पोषक असं अन्नही मिळालं पाहिजे. पण गंमत अशी की, हा ‘आहार’ मिळाल्यावर इंद्रियं अशी वाहावत जातात की जीवनध्येयाकडे वाटचालच खुंटावी. म्हणजे डोळ्यांनी आवश्यक ते पाहिलं जातंच; पण अनावश्यकही बरंच पाहिलं जातं. मनाची आवड म्हणून कानांनीही निर्थक असं बरंच काही ऐकलं जातं, मुखानं व्यर्थ बोललं जातं. अगदी त्याचप्रमाणे भूक भागल्यावरही मनाच्या ओढीपायी अनावश्यक खाल्लंही जातं. हे चित्र पालटायचं तर रसनेवर, इंद्रियांवर ताबा हवा. ते साधत नाही तोवर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दौर्बल्य दूर होणार नाही. या रसनाजयाचं, इंद्रियजयाचं, मनोजयाचं मूळ जोवर उकलत नाही, तोवर भवदु:ख काही ओसरत नाही. ते मूळ समजलं, तो उपाय उमजला आणि अमलात आला तर आणि तरच सगळी दु:खं मावळतील, असं अवधूताचं सांगणं आहे. त्याचबरोबर अवधूत हेही बजावतो की, इतर इंद्रियं आवरली, पण रसना आवरली नाही, तरी उपयोग नाही. उलट ही रसना अधिकच उद्दाम होईल. अवधूत सांगतो, ‘‘इंद्रियांसी आहाराचें बळ। तीं निराहारें जालीं विकळ। तंव तंव रसना वाढे प्रबळ। रसनेचें बळ निरन्नें।।१८२।। निरन्नें इंद्रियें जिंतिलीं। तीं जिंतिलीं हे मिथ्या बोली। अन्न घेतांचि सरसावलीं। सावध जालीं निजकर्मी।।१८३।।’’ म्हणजे, इंद्रियांना आहारामुळे बळ मिळतं हे खरं, पण आहार जर कमी घेतला आणि इंद्रियांची शक्ती क्षीण झाली, तर उलट रसना खवळते. तेव्हा निराहार राहून, कठोर उपवास करून, अन्नच वर्ज्य करून इंद्रियांवर ताबा मिळवता येतो हे खोटं आहे. तसंच निराहारानंतर खाऊ लागताच इंद्रियांना अधिकच जोर येतो. तेव्हा रसनेच्या ओढीचं नियमनच आवश्यक आहे. पू. बाबा बेलसरे यासंबंधात म्हणतात की, ‘‘आहाराचा आणि माणसाच्या वृत्तीचा फार निकट संबंध आहे. अन्नाने शरीर धारणा होत असल्याने शरीरातील देहबुद्धीचे विकार अन्नावर अवलंबून असतात. शरीर आणि मनाच्या परस्पर क्रियाप्रतिक्रिया अंत:स्रवी पिंडाच्या स्रावावर फार अवलंबून असतात. त्यामुळे ज्या प्रकारचे आणि जितके अन्न आपण खातो तितके आपले मन आणि विकार कमी-जास्त प्रमाणात स्वाधीन राहतात.’’ पुढे बाबा सांगतात की, अन्न रांधणारा आणि वाढणारा यांच्या सूक्ष्म वासनांचे परिणाम अन्नावर होतात. म्हणून बाबा बजावतात की, ‘‘साधकाने जरूर तेवढेच, जरूर त्या ठिकाणीच, जरूर त्या वेळीच आणि जरूर त्याच्या हातचेच अन्न खाण्याची सवय ठेवावी.’’ आता आपण कामामुळे फिरतीवर असलो, परगावी गेलो असलो, तर हे सगळे नियम पाळणं शक्य होईलच असं नाही. अशा वेळी जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढंच अन्न आधी मनानं सद्गुरूंना वा भगवंताला अर्पून नंतर आपण प्रसाद समजून ग्रहण करावं. श्रीगोंदवलेकर महाराज सांगत की, ‘‘ज्यानं जीभ जिंकली त्याला निम्मा परमार्थ साधला!’’ खाणं आणि बोलणं यावर नियंत्रण आलं की परमार्थाची खरी वाटचाल सुरू होते, यात काय शंका?

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtra CM Devendra Fadnavis Attends Shaurya Diwas Program In Panipat
…तर देशाचा इतिहास वेगळा असता! पानिपतमध्ये मराठा शौर्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे योद्ध्यांना अभिवादन
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
lokmanas
लोकमानस: उद्याोग हवे तर अणुऊर्जा अपरिहार्य
Terrifying Video hospital employess were seen dragging dead body
मृत्यूनंतरही यातना संपेनात! कर्मचाऱ्यांनी जनावराप्रमाणे मृतदेह नेला ओढत अन्…, माणुसकीला लाजवेल असा VIDEO
Story img Loader