– चैतन्य प्रेम
अध्यात्म बोधात काही कथाही येतात. या कथांतून तत्त्वविचारच बिंबवला जात असतो. पण बरेचदा त्या कथा केवळ कथा म्हणून पाहिल्या जातात. त्यामागचा तत्त्वविचार दुर्लक्षित होतो. पिंगलेच्या कथेचे दोन्ही स्तर आपण एकाच वेळी पाहणार आहोत. ही पिंगला कोण आहे? तर ते वासनात्मक ओढीत गुंतलेलं आपलंच अंत:करण आहे. अर्थात जीवाचं संकुचित मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार आहे. ही पिंगला कुठे राहात होती? तर अवधूत सांगतो, ‘‘पूर्वी विदेहाचे नगरी। पिंगलानामें वेश्या वास करी। तीशीं आसनिरासेंवरी। वैराग्य भारी उपजलें ।।१८९।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). ही कथेतील देहविक्रय करणारी पिंगला विदेह राजाच्या नगरीत राहात होती. देहबुद्धीपायी जग-ओढीच्याच सेजेवर ज्याचं अंत:करण विलसत आहे असा जीव पूर्वी म्हणजे खरं तर मूळचा विदेही आहे म्हणजे आत्मस्वरूप आहे! अवधूत सांगतो की, देहविक्रय करणारी ही पिंगला रूपवान होती. साजशृंगारानं त्या सौंदर्यात भर घातली होती. अशी ती एके सायंकाळी विलासोत्सुक होऊन उत्तम पुरुषाची वाट पाहात उभी होती. पुरुषाचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिनं नेहमीचे सगळे उपाय करून पाहिले. कुणाला खडा मारून नेत्रकटाक्ष टाक, कुणाला विडा खायला बोलाव, कुणास कामुक इशारे कर. पण, ‘‘ठेऊनि संकेतीं जीवित। ऐसे नाना संकेत दावित। पुरुष तिकडे न पाहात। येत जात कार्यार्थी।।१९५।।’’ प्राण ओतून ती खुणावत होती. नेहमी या खुणा काम करीत, पण आज कुणी तिच्याकडे लक्षही दिलं नाही. जो-तो आपापल्या कामांत गुंतला होता. अशा वेळी दुसरा उपाय म्हणजे अहंकाराला डिवचणं! तोही पिंगलेनं केला. काय केलं तिनं? तर, ‘‘गेल्या पुरुषातें निंदित। द्रव्यहीन हे अशक्त। रूपें विरूप अत्यंत। उपेक्षित धिक्कारें।।१९६।।’’ तिनं थेट निंदा केली. यांच्याकडे पैशाचं बळच नाही, माझ्या रूपाशी बरोबरी करील असं रूपच नाही, हे अशक्त आहेत; असा धिक्कार तिनं केला. यात दोन हेतू होते. एक म्हणजे स्वत:ची समजूत घालावी आणि दुसरा म्हणजे जर ही निंदा कानावर पडून कुणी डिवचला गेलाच तर त्यानं माझ्याकडे यावं! तरी काही उपयोग झाला नाही. खरं तर जीवात अपार क्षमता मूळच्याच असतात त्यात भर म्हणून तो भौतिक बुद्धीचा साजशृंगार करतो. त्यायोगे जग आपल्या कह्यात येईल, आपलं मनोरथ, कामना पूर्ण करील, असा त्याचा भाव असतो. त्यामुळे जगाला लुभावण्याचे सर्व प्रयोग तो करून पाहतो. पण अशी एक वेळ अवचित येतेच जेव्हा जग प्रतिसाद देत नाही, तुमचं मन राखत नाही, तुमच्या विपरीत वागतं. मग त्या पिंगलेप्रमाणे जीवाला धक्का बसतो. ‘‘न होता मनासारिखे दु:ख मोठे,’’ ही गत होते. हे ‘दु:ख’ दूर व्हावं, जगानं माझ्या मनाजोगतं व्हावं, हे आक्रंदन जीव करू लागतो. पण भगवंताला जेव्हा तुम्हाला आंतरिक जागृतीचं दान द्यायचं असतं ना तेव्हा तुमचं हे ‘दु:ख’ तो दूर करीत नाही. त्या वेळी जीव किती कळवळून साद घालत असतो! ‘‘देवा, आता तूच एकमेव आशा आहेस,’’ असं म्हणत असतो. मी आजवर किती चांगला वागलोय, याची उजळणी उगाळत असतो. पण तरी ‘दु:ख’ तसूभरही दूर होताना दिसत नाही. काय करावं सुचत नाही. मग माणूस स्वत:ची समजूत घालतो की, आता माझ्या मनासारखं घडेल, मनासारखी माणसं आयुष्यात येतील. त्या पिंगलेलाही वाटलंच की, ‘‘आतां येईल वित्तवंत। अर्थदानीं अतिसमर्थ। माझा धरोनिया हात। कामआर्त पुरवील।।१९७।।’’