या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

– चैतन्य प्रेम

दु:खाच्या शेजेवर फणफणत पडलेल्या पिंगलेचं लक्ष अनाहूतपणे त्या दु:खाकडेच गेलं, मात्र तिला जाग आली. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणतात की, ‘‘सुख तुम्हाला झोपवतं आणि दु:खं जागवतं!’’ जीवनात वाटय़ाला येणारं सुख कायमचं टिकणारं नसतं. तरी त्या सुखलालसेनं अवघं जीवन व्यापून टाकलेलं असतं. त्या सुखाभासात माणूस मोहनिद्रेच्या अधीन असतो. पण दु:ख वाटय़ाला येतं तेव्हा माणूस त्या मोहनिद्रेतून खडबडून जागा होतो. आपल्या बाबतीत असं घडलंच कसं, हा प्रश्न त्याच्या मनात सर्वप्रथम येतो. त्या दु:खानं तो खचतो, उन्मळून पडतो. पण त्या स्थितीतही खंबीर व्हायला आणि त्या दु:खातून बाहेर पडायला ते दु:खच शिकवतं! बरेचदा काय होतं की, ‘दु:खी’ माणसाला त्या दु:खातून बाहेर काढण्यासाठी आप्तेष्ट धडपडत असतात. त्या प्रयत्नांमागचा त्यांचा भाव काही चुकीचा नसतो बरं. प्रेम आणि आपुलकीपोटी ते जमतील तसं त्या दु:खी जिवाला समजावू पाहात असतात. काही बाबतींत मानसोपचारतज्ज्ञाकडे जावंच लागतं. अगदी अलीकडे ‘एथोज्’ नावाची एक तुर्की मालिका पाहण्यात आली. माणसाच्या मनात अनेक भावना, संवेदना, वेदना असतात. त्यातल्या काही तो दडपून ठेवत असतो. पण दडपल्यानं त्या क्षीण होत नाहीत. उलट त्याच्या वर्तमानातील वर्तनावर त्या असा अंमल गाजवत असतात की, त्यांच्या पकडीतून मन मोकळं झालं नाही तर त्याचा भविष्यकाळही अधांतरी होण्याचा धोका असतो, या सूत्राभोवती ही मालिका फिरते. त्यात लोकांची दु:खं ऐकताना आपला चेहरा निर्विकार ठेवणाऱ्या, पण स्वत:च्या भावनिक आंदोलनांना सामोरं जाताना हतबल झालेल्या मानसोपचारतज्ज्ञ महिलांचंही दर्शन घडतं. तेव्हा खरं पाहता, निव्वळ शब्दांनी दु:खाचे घाव भरून निघत नाहीत. पण अलगद त्या दु:खाशी त्या जिवाचा आंतरिक संवाद सुरू होतो. तो संवादच मनाला बळ देऊ लागतो. किती विलक्षण आहे पाहा, सुख तुम्हाला सुखातला फोलपणा जाणवून देत आपल्या प्रभावातून सोडवत नाही, पण दु:ख तुम्हाला स्वत:तला फोलपणा जाणवून देत स्वत:च्या पकडीतून सोडवतं! आणि जोवर दु:खातून सुटण्याचा विचार माणूस स्वत: करीत नाही ना, तोवर कोणतेही बाह्य़ोपचार, समजावणुकीचे शब्द त्याला दु:खमुक्त करू शकत नाहीत. दु:खाचा स्वीकारच खऱ्या सुखाची वाट दाखवतो! निसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘तुम्हाला दु:ख नको असेल, तर सुखाची इच्छा आणि दु:खाची भीती बाळगणं सोडून द्या!’’ असं पाहा, माणसाला सुखाप्रमाणेच दु:खही स्वीकारावंच लागतं. मग ते सकारात्मक वृत्तीनं स्वीकारलं तर मनाचा त्रागा, आक्रोश, तगमग यांमुळे वाया जाणारी मानसिक, भावनिक शक्ती तरी वाचवता येते. दिवाळीच्या दिवसांत हाताशी जे रंग असतात त्या आधारेच रांगोळी काढली जाते ना? एखाद्दोन रंग नसले तरी त्याचं दु:ख करीत बसून राहिलो, तर रांगोळीच काढता येणार नाही. तसं वाटय़ाला आलेल्या सुख-दु:खाच्या आधारेच जीवनाची रांगोळी सजवावी लागते. दु:ख असल्याचं दु:ख कवटाळून बसलो तर जगण्याची संधीही वेगानं ओसरून जाईल. दु:खच हे शिकवतं. ते जागं करतं, वास्तवाचं भान आणून देतं.

chaitanyprem@gmail.com