– चैतन्य प्रेम

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

पिंगला दु:खानं जागी झाली. तिला वाटलं, ‘‘मिथ्या मोहाचा विस्तार। म्यां वाढविला साचार। माझ्या मूर्खपणाचा पार। पाहतां विचार पांगुळे।।२१६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). जो आज आहे, पण उद्या ओसरून जाणार आहे असा देह, त्या देहाचं कालांतरानं सुरकुतणारं रूपसौंदर्य आणि त्या देहरूपाच्या आधारे मिळत असल्याचं भासणारा, त्या देहाइतकाच अशाश्वत पैसा या सगळ्याच्या मोहानं मला भुरळ घातली होती. मोहाचं ते बीज हृदयात मी जोपासलं आणि पाहता पाहता अज्ञानाची पानं, भ्रमाची फुलं आणि लोभाची फळं यांनी या मोहवृक्षाचा विस्तार झाला. या मोहवृक्षाच्या आसक्तीची मुळं हृदयभूमीत खूप खोलवर पसरली. त्यामुळे जोवर हृदयातील ‘चिज्जड ग्रंथी’रूपी ही दृढ मुळं नष्ट होत नाहीत तोवर वरवरची पानं, फुलं, फळं तोडून काही उपयोग नाही! पिंगलेला जाणवलं की, या मोहवृक्षाचा मीच विस्तार केला आहे. पुढे ती म्हणते, ‘‘माझ्या मूर्खपणाचा पार। पाहतां विचार पांगुळे!’’ माझ्या मूर्खपणाला अंत नाही हो! त्यापुढे माझे विचारही पांगळे होतात. आता झाडाचं रूपक लक्षात घेतलं ना, तर ‘मूर्खपणाचा पार’ हे रूपकही अगदी चपखल बसतं बरं! कसं? तर मोहाचा वृक्ष मीच जोपासला, पण त्याला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून मी मूर्खपणाचा पारही त्याच्याभोवती बांधून टाकला! मूढ, मूर्ख मनच मोहाचं समर्थन करतं. आणि मग काय? पारावरच्या गप्पा म्हणजे इतरांची उणीदुणी काढणं, निंदानालस्ती करणं! पाहता विचार पांगुळे!! एकदा अविचाराची गोडी लागली की, सद्विचाराची क्षीण आशाही उरत नाही. मग ती म्हणते, ‘‘नाहीं अंत:करणासी नेम। अपार वाढविला भ्रम। असंतपुरुषांचा काम। मनोरम मानितां।।२१७।।’’ अंत:करणाला सांभाळणारा नेम मी कधी जपलाच नाही. असत्पुरुषाची कामना हीच मनोरम मानून भ्रम मात्र अपार वाढविला. ‘पिंगला’ म्हणजे जर तुम्ही-आम्हीही असू तर ‘असत्पुरुषाचा काम’ कोणता? तर जे असत् आहे, अशाश्वत आहे त्याचीच कामना जो जोपासतो अशा जीवाची ती कामना आपल्यालाही योग्य वाटणं, मनोरम वाटणं आणि अशाच पुरुषांच्या संगतीसाठी मन आतुर असणं म्हणजे, ‘‘असंतपुरुषांचा काम। मनोरम मानितां,’’ हे भ्रम वाढविणं आहे. ‘सुसंगति सदा घडो’मागचा हेतूही हाच आहे. संगती अटळच असते हो, पण सु-संगती असेल तर जगण्यातल्या विसंगती दूर होतात आणि त्यापायी प्रसवणारी दु:खं कमी होतात. त्यामुळेच तर शाश्वतावर विशुद्ध प्रेम असलेल्या जनांची संगती मागताना तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती!’’ समर्थ रामदास म्हणतात, ‘‘सज्जनसंगति दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम!’’ हे भगवंता, मला सज्जनांची संगती दे आणि असत् जनांपासून अलिप्त ठेव! या अशाश्वतावर प्रेम असलेल्या पुरुषांच्या संगतीनं काय घडलं? तर जे खरं आहे, अखंड आहे, सत् आहे त्याचं मोलच समजलं नाही आणि जे खोटं आहे, बेगडी आहे त्याचीच ओढ उरली. पिंगलेच्या हृदयातील सल शब्दरूप धारण करीत ओघळला.. ‘‘जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे। तरी जवळील पुरुष न लाहिजे। हेंचि मूर्खपण माझें। सदा भुंजे असंता।।२१८।।’’ स्त्रीला परुष हवासा वाटणं स्वाभाविक आहे; पण अगदी जवळच्या, अंत:स्थ परमपुरुषाचा, आत्मस्वरूपाचा संग मला नकोसा वाटला आणि असत्, भ्रमपोषक पुरुषांचा संग सदोदित हवासा वाटला, हा माझाच मूर्खपणा! वाक्य वाचायला सोपं आहे, पण ‘पिंगले’च्या जागी स्वत:ला ठेवल्याशिवाय त्याचा खरा रोख लक्षात येणार नाही.