– चैतन्य प्रेम
नरदेहाची अंतर्गत रचना कशी आहे ते संत एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवता’च्या आठव्या अध्यायातील २३३ ते २४१ या ओव्यांत सांगितले आहे. या ओव्या मुळातूनच वाचाव्यात, अशा आहेत. विस्तारभयास्तव त्या इथे देत नाही. पण नाथ सांगतात की, या नरदेहरूपी घराच्या आढे आणि पाख्या हाडांच्या आहेत आणि ते ओल्या कातडय़ानं वेढलं आहे. माणसाच्या रोमारोमांत स्वार्थ आणि लोभ भरून असतो म्हणतात ना? तर या लोभानं भरलेल्या रोमाचे खिळे सर्वागावर ठोकले आहेत. हाडे, मांस, त्वचा घट्ट बांधून त्यांचे सांधे बसवले आहेत. रसास्वादासाठी जिव्हा, वायूचे श्वास आणि उच्छ्वास राखण्यासाठी प्राण आणि अपानाचे झरोके व माथ्यावर केसांची रोपे लावली आहेत. आतली पोकळी भरून नऊ नाडय़ा बांधून टाकल्या आहेत. या देहातच विष्ठामूत्राची पोतडी आहे आणि नऊ द्वारांतूनही मळच बाहेर पडत असतो. म्हणजे मूत्र आणि शौच बाहेर टाकणारी द्वारं आहेतच, पण प्रत्येकी दोन नेत्र, कान, नाकपुडय़ा आणि एक तोंड यातूनही मळ बाहेर पडतोच ना? आणि निर्मळ जलानं कितीही धुतली तरी ही द्वारं कायमची स्वच्छ होऊच शकत नाहीत. नव्हे, या द्वारांनी मळ टाकणं थांबवलं ना, तर शरीर रोगग्रस्तच होईल. देहाचं हे रूप पाहून पिंगला म्हणते, ‘‘अस्थिमांसाचा कोथळा। विष्ठामूत्राचा गोळा। म्यां आलिंगिला वेळावेळां। जळो कंटाळा न येचि।।२४१।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). ही हाडामांसाची पोतडी मी वेळोवेळी आलिंगली आणि मला त्याचा कंटाळाही आला नाही! आणि खरंच आहे, अगदी देहाची चिरफाड करणारा, शस्त्रक्रिया करणारा शल्यचिकित्सक असो की शवाची उत्तरीय तपासणी करणारा कर्मचारी असो, त्या देहावर अंत्यसंस्कार करणारा, ते मंत्र म्हणणारा शास्त्रविधींचा जाणकार असो; देहाची नश्वरता यांच्याइतकी कोण सतत जवळून पाहतो? पण तरीही सर्वसामान्य माणसाप्रमाणेच कामसुखाच्या क्षणी देहाची नश्वरता विस्मरणात जातेच ना? त्या क्षणांतच देहसाफल्याची भावना दाटून येते ना? किंबहुना स्वदेहाचासुद्धा त्या क्षणी विसर पडतो. इतका हा मायेचा प्रभाव आहे. एका अभंगात श्रीएकनाथ महाराज म्हणतात, ‘‘नाशिवंत देह नाशिवंत माया। नाशिवंत काया काय काज।।१।। यमाचा पाहुणा जाणार जाणार। काय उपचार करूनी वायां।।२।।’’ हा देह नाशिवंत आहे आणि त्या देहाची- देहाच्या आधारे वाढणारी, विस्तारणारी मायाही नाशवंत आहे. माणूस शेवटी यमाचा पाहुणा आहे. या मृत्युलोकातला पाहुणा आहे. तो जायचं तेव्हा जाणारच. त्याला न जाऊ देण्याचे सर्व उपचार व्यर्थच ठरतात. पुढे म्हणतात, ‘‘पाहुणा हा देह जाईल टाकुनी। एका जनार्दनीं काय दु:ख।।’’ हा देह टाकून पाहुणा जाणारच आहे हो, पण एका जनार्दनी म्हणजे एका सद्गुरूमध्येच ज्याचा देहभाव विलीन झाला आहे, अशाला देह राहण्याचं वा न राहण्याचं काय दु:ख? पिंगलेच्या मनात जागृतीचं बीज पडलं होतं. त्याचा शेवट अशाच ऐक्यभावात होतो. तिला वाटू लागलं, ‘‘ये विदेहाचे नगरीं। मूर्ख मीचि एक देहधारी। हृदयस्थ सांडूनि श्रीहरी। असंता नरी व्यभिचारू।।२४२।।’’ देहात असूनही देहभावात न राहण्याची संधी या मनुष्य जन्मानं मला दिली. ती अमोलिक संधी दुर्लक्षून मी हृदयस्थ श्रीहरीला सांडलं. समस्त भवदु:खाचं हरण करणाऱ्या श्रीहरीला गमावून मी नश्वर देहाच्या आसक्तीत रुतले, हा माझाच मूर्खपणा आहे.. नश्वरात आसक्त होणं हा ईश्वराशी व्यभिचार आहे!