– चैतन्य प्रेम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एकनाथी भागवत’ का वाचावं? खरं तर या सदराच्या प्रारंभीच्या भागात या प्रश्नाला स्पर्श करीत आपण ग्रंथाची फलश्रुती जाणून घेतली होती. फलश्रुती म्हणजे ग्रंथाचं फळ काय, ग्रंथ वाचल्यानं काय घडतं, याचं प्रकटीकरण. मग या ग्रंथाची फलश्रुती ३१व्या अध्यायात दोन ओव्यांत सांगितली आहे. ती अशी की, ‘‘ग्रंथ सिद्धि पावेल यथार्थी। येणें सज्ञानहि सुखी होती। मुमुक्षु परमार्थ पावती। साधक तरती भवसिंधु।।५३७।। भाळे भोळे विषयी जन। याचें करितां श्रवण पठण। हरिभक्त होती जाण। सन्मार्गी पूर्ण बहुत होती।।५३८।।’’ ही फलश्रुती म्हणजे जनार्दन स्वामींनी स्वमुखानं दिलेला वर आहे. या ग्रंथाचे पाच अध्याय ऐकताच हे आशीर्वचन त्यांच्या मुखातून प्रकटलं. ते उद्गारले की, ‘‘हा ग्रंथ सहज पूर्णत्वास जाईल. जे भोळेभाबडे संसारी जन आहेत त्यांनी जर या ग्रंथाचं पठण वा श्रवण केलं, तर ते हरीचे भक्त होतील आणि सन्मार्गाला लागतील. जे मुमुक्षू आहेत त्यांना शुद्ध परमार्थ कळू लागेल. जे साधना करीत आहेत ते भवसागर तरून जातील आणि जे ज्ञानी आहेत ते सुखी होतील.’’ बघा हं, या ग्रंथाचा आधार घेतला, तर प्रत्येकाला काही ना काही लाभ हा होईलच होईल, असं साक्षात सद्गुरू जनार्दन स्वामी यांनीच स्पष्ट म्हटलं आहे! पण बरेचदा होतं काय की, लाभ काय मिळणार हे आपण पटकन वाचतो; पण काय केल्यानं तो मिळणार आहे हे नीट जाणूनच घेत नाही की तशी कृती करीत नाही. भोळेभाबडे जन या ग्रंथामुळे हरीचे भक्त होतील आणि सन्मार्गाला लागतील, हा लाभ आहे खरा; पण त्यासाठी या ग्रंथाचं खरं पठण व खरं श्रवण आवश्यक आहे! पठण म्हणजे नुसतं वाचणं नव्हे, तर त्यात जो पाठ सांगितला आहे तो आचरणात आणण्याचा प्रयत्नही झाला पाहिजे. श्रवण म्हणजेही नुसतं ऐकणं नव्हे. जोवर ऐकल्यानुसार कृती केली जात नाही, तोवर ऐकलं गेलं, हे मानलंच जात नाही. आता कुणी म्हणेल की, या ग्रंथात आचरणात आणण्यास योग्य असं नेमकं काय आहे, हे सर्वसामान्य माणसाला नुसतं वाचून वा ऐकून समजणं सोपं आहे का? तर ते सोपं नसलं तरी अशक्यही नाही. जर मन लावून नीट ग्रंथ वाचला आणि जे वाचलं त्यावर थोडा विचार केला तर सामान्य माणूस, मुमुक्षू, साधक आणि ज्ञानी या चारही पातळींवरच्या माणसाला याच काय, कोणत्याही सद्ग्रंथातून काही ना काही अंतर्मनात पेरण्यायोग्य, रुजविण्यायोग्य, जोपासण्यायोग्य आणि अनुभवण्यायोग्य हाती लागतंच. इतकंच नाही, तर जो ज्या पातळीवर असेल त्या पातळीवर त्याला ग्रंथाचं काही ना काही आकलन होतंच आणि वाचलेल्यातलं काही मनाला भिडतंदेखील. आता ‘‘आशा तेथ नाही सुख। आशेपाशी परम दु:ख।’’ (अध्याय आठ), ‘‘आयुष्याची अर्ध घडी। वेंचितां न मिळे लक्ष कोडी। तेणें आयुष्यें परमार्थ जोडी।’’ (अध्याय तीन), ‘‘मुखीं नामनिर्वाह व्हावा। यालागीं करावी साधुसेवा।’’ (अध्याय २८), ‘‘जेणें भूतांसी होय उपकार। ते ते करी देहव्यापार।’’ (अध्याय २९) आदी ओव्या या सामान्य माणसालाही भिडतातच की. आशेत गुंतल्यानं आपल्याच मनाला दु:ख होतं, आयुष्यातला गेलेला क्षण लाखो रुपये दिले तरी परत भोगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण आयुष्याचं सार्थक करणारा, आयुष्याला परम अर्थ देणारा असावा, भगवंताची भक्ती होण्यासाठी साधुसंतांची सेवा घडावी, इतरांचं हित साधेल अशी कृत्यं हातून घडावीत; ही सदिच्छेनं व सत्प्रेरणेनं भरलेली सूत्रं सामान्य माणसाच्या अंत:करणात ठसतील, अशीच आहेत ना? पण ती उमगण्यासाठी ग्रंथ आधी नीट मनापासून वाचला आणि ऐकलाही गेला पाहिजे!

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 446 abn