– चैतन्य प्रेम
अशाश्वताच्या ओढीत अडकलेल्या आपल्याच भावना आपल्या आड येत असतात. भौतिकातली कर्तव्यं पार पाडतानाही त्या जशा बाधक ठरतात, तशाच त्या अध्यात्माच्या मार्गावरील वाटचालीची गतीही मंदावत असतात. त्यामुळे जोवर मनातली ही अवास्तव भावनांची वावटळ ओसरत नाही तोवर परमार्थासाठीची शुद्ध भावना जागृत होत नाही. एका अभंगात संत एकनाथ महाराज म्हणतात की, ‘‘बाह्य़ शत्रूंचें अल्प दु:ख। मन:शत्रूंचे वर्म अशेख।। आसनीं शयनीं एकान्तीं। जपीं अथवा ध्यानस्थिती।। ऐशिया मनातें न जिंकितां। देवपण न ये हातां।।’’ म्हणजे जे दु:ख बाहेरचे शत्रू देतात ते, आतल्या म्हणजे अंत:करणातल्या शत्रूंकडून होणाऱ्या दु:खाच्या तुलनेत फार अल्प असतं! कारण अंत:करणातले शत्रू; म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद हे सदोदित आपल्या बरोबरच असतात ना! ‘मी’च्या प्रत्येक ऊर्मीबरोबर ते कमी-अधिक प्रमाणात उसळत असतात. मग आपण निवांत बसलो असू, पहुडलो असू किंवा जप-ध्यानात असू, तरी हे आंतरिक शत्रूंनी आंदोलित होणारं मन जोवर सोबत आहे तोवर ‘देवपण न ये हाता’ असं एकनाथ महाराज सांगतात. अर्थात जे दिव्यत्व आहे ते जगण्याच्या कृतीतून व्यक्त होत नाही. सद्गुरूंच्या बोधानुसार जगणं हेच खरं दिव्यस्पर्शी जगणं असतं. पण अंतर्शत्रूंच्या पकडीत असलेल्या मनावर तो बोध ठसतच नाही. मग तो जीवनात उतरणार तरी कसा? पण तरीही असा साधक ‘एकनाथी भागवता’सारख्या ग्रंथाचा आधार घेत त्या ग्रंथातील बोध जीवनात उतरविण्याचा अभ्यास सुरू करील, तर एक एक पाऊल टाकायला सद्गुरूच पाठबळ देतील. त्यासाठी मनाचा एकच निर्धार मात्र हवा. तो कोणता? संत एकनाथ महाराज एका अभंगात सांगतात, ‘‘मना सांडीं विषयखोडी। लावीं विठ्ठलेंशी गोडी।। आणिक न लगे साधन। एकलें मन करी उन्मन।।’’ हे मना, विषयांची खोडी सोडून दे आणि सद्गुरूची गोडी लाव. त्या गोडीनं काय होईल? तर, मनाचं उन्मन होईल! आता विषयखोडीनं म्हणजे विषयांच्या गोडीनं त्यांच्या खोडय़ात मन अडकलं आहे. ती विषयखोडी थोपविण्यासाठी सद्गुरूंची गोडी लागली पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंची खरी संगती लाभली पाहिजे. त्या संगतीनं गोडी निर्माण होईल. त्या गोडीनं मन उदात्त, उन्नत होईल. सद्गुरूंच्या बोधाची आंतरिक संगत जितकी मिळत जाईल आणि जीवनात भिनत जाईल तितकी जीवनातली विसंगती दूर होऊ लागेल. मग खरं ज्ञान होऊन खरं अखंड सुख लाभेल. या सद्ग्रंथाच्या वाचनानं आणखीही एक मोठं फळ मिळणार आहे, अशी जनार्दन स्वामींची ग्वाही आहे. हा लाभ कोणता? तर, ‘‘ये ग्रंथीं ज्या अनन्यभक्ती। निदाद्वेष नुपजे चित्तीं। रामनामीं अतिप्रीती। सुनिश्चितीं वाढेल।।५४३।। ऐसे देवोनि वरदान। हृदयीं आलिंगी जनार्दन। म्हणे या ग्रंथीं ज्याचें भजन। त्याचें भवबंधन मी छेदी।।५४६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय ३१). म्हणजे, या ग्रंथावर ज्यांची अनन्यभक्ती जडेल त्यांच्या चित्तात निंदा, द्वेष उपजणार नाहीत. रामनामावर त्यांचं निरतिशय प्रेम जडेल. स्वत: हे वरदान देऊन जनार्दन स्वामींनी एकनाथांना हृदयाशी कवटाळलं! मग म्हणाले, या ग्रंथाचं जो भजन करील ना, त्याच्या अंत:करणातला भवाचा बंध समूळ नष्ट करीन! सद्गुरूनं हृदयाशी कवटाळणं म्हणजे ‘या हृदयीचें ते हृदयीं’ ओतणंच आहे. हाच तो क्षण असू शकतो ज्या क्षणी ‘आपणासारिखे करिती तात्काळ’ हे साधणार आहे. भक्ताला सद्गुरू अखंड अभेद दृष्टी देणार आहेत.